Mon, Aug 19, 2019 04:56होमपेज › Ahamadnagar › कळसपिंप्रीत 2 गटांतील हाणामारीत एकाचा खून

कळसपिंप्रीत 2 गटांतील हाणामारीत एकाचा खून

Published On: Aug 30 2018 1:15AM | Last Updated: Aug 29 2018 11:36PMपाथर्डी : शहर प्रतिनिधी

वनविभागाच्या जागेवरील खोदाईवरून कळसपिंप्री येथे दोन गटांत मंगळवारी (दि. 28) सशस्त्र हाणामारी झाली होती. या हाणामारीतील 12 जखमींना उपचारासाठी नगर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यातील कंस लक्ष्मण पवार (वय 65)  यांचा उपचारादरम्यान बुधवारी (दि.29) मृत्यू झाला. 

कळसपिंप्री गावालगत वनविभागाची जमीन आहे. गेल्या दहा वर्षांपासून या जमिनीवर काही कुटूंब राहत आहेत. याच जमिनीत पेरणी करून पिके घेतली जातात. या जमिनीवर जलयुक्त शिवाराचे काम चालू करण्यात आलेले आहे. मात्र, अतिक्रमणामुळे ते बंद ठेवावे लागले आहे. मंगळवारी दुपारी या जमिनीवरून अतिक्रमण करणारे कुटुंबीय व ग्रामस्थांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. खडाजंगीचे रूपांतर तुफान हाणामारीत झाले. या जोरदार हाणामारीत महिनाबाई विठ्ठल बर्डे, शोभा शिवाजी बर्डे, बाळू अर्जून गायकवाड, कंस लक्ष्मण पवार, बद्रीनाथ भगवान येडे, संदीप रावसाहेब मिसाळ, विश्‍वनाथ नारायण बुळे हे गंभीर जखमी झाले. मंगळवारी सायंकाळी त्यांना उपचारासाठी नगर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 

संदीप शिवाजी मिसाळ, भगवान सीताराम सोनवणे, कमलाकर गणपत गाडे, दादासाहेब बन्सी झिरपे, ज्ञानेश्वर गोवर्धन मिसाळ यांच्यावर पाथर्डीत किरकोळ उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.  कंस पवार यांचा बुधवारी जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. त्यांचे दोन्ही हात व एक पाय फॅक्चर झाला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिस उपनिरीक्षक वैभव पेठकर हे फिर्याद घेण्यासाठी रात्री उशिरापर्यंत ‘सिव्हिल’मध्ये होते.