होमपेज › Ahamadnagar › कोपरगावात भीषण अपघातात दोन ठार 

कोपरगावात भीषण अपघातात दोन ठार 

Published On: Jun 09 2018 1:32AM | Last Updated: Jun 09 2018 12:29AMकोपरगाव : प्रतिनिधी

कोपरगाव तालुक्यातून जाणार्‍या नागपूर-मुंबई या द्रुतगती मार्गावर संवत्सर गावाजवळील गोदावरी नदी पुलावर दोन मालवाहू ट्रकची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. त्यात एका ट्रकमधील चालक व क्‍लीनरचा जागीच मृत्यू झाला. तर दुसर्‍या ट्रकचा चालक गंभीर जखमी झाला आहे. काल (दि.8) सकाळी सहाच्या सुमारास हा अपघात झाला.

अन्वरभाई (42) व क्‍लिनर ओबामा (22, दोघेही रा.औरंगाबाद) अशी अपघातात मृत्यूू झालेल्यांची नावे आहेत. नागपूर-मुंबई द्रुतगती मार्ग तयार झाल्यापासून या रस्त्याची आतापर्यंत एकदाच किरकोळ स्वरूपात डागडुजी करण्यात आलेली आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे या रस्त्यावर अनेक ठिकाणी अपघात होवून वाहनधारक, मोटारसायकल चालक व साईबाबा यात्रींचा मृत्यू झाला आहे. काल नाशिककडून कपडे व इतर माल घेवून मालट्रक (क्र. एम. एच. 20 ई. जी 870) औरंगाबादकडे चाललेला होता. त्याच  दरम्यान औरंगाबादकडून बियाणे घेऊन मालट्रक (क्र.युपी 63-1515) हा नाशिककडे जात होता. 

या दोन्ही ट्रकची समोरासमोर धडक झाल्याने औरंगाबादकडे जाणार्‍या ट्रकमधील चालक व क्‍लिनर जागीच ठार झाले. अपघातात या ट्रकच्या कॅनीचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे मृत चालक व क्‍लिनर यांना बाहेर काढण्यात मोठ्या अडचणी आल्या. त्यामुळे दोन्ही बाजूंची वाहतूक खोळंबली होती. दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या गोदावरी नदीच्या पुलावर दोन्ही बाजूने मोठमोठे खड्डे आहेत. जेथे अपघात घडला तेथून जवळच एका शेतातून दुसर्‍या शेतात पाण्याची पाईपलाईन गेलेली आहे. ही पाईप लाईन मोठ्या प्रमाणात लिकेज आहे. त्यामुळे रस्त्यावर पाणी साठून मोठा खड्डा पडला आहे. तो दोन्ही बाजूने प्रवास करणार्‍या वाहनधारकांना दिसत नाही. परिणामी, अपघातांची मालिका सुरु आहे. या रस्त्याचे राज्य रस्ते विकास महामंडळाने डांबरीकरण करणे गरजेचे आहे. मात्र, त्याकडे संबंधित खात्याचे मंत्री व अधिकारी यांचे दुर्लक्ष झालेले आहे. त्यामुळे या रस्त्यावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे.