Sat, Apr 20, 2019 16:35होमपेज › Ahamadnagar › व्यावसायिकाला २ कोटींचा गंडा

व्यावसायिकाला २ कोटींचा गंडा

Published On: Feb 13 2018 2:05AM | Last Updated: Feb 13 2018 12:37AMनगर : प्रतिनिधी

व्यवहाराचा आभास करून नायजेरियन फ्रॉडद्वारे श्रीरामपूर येथील व्यावसायिकाला 2 कोटी 4 लाख रुपयांना गंडविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. परदेशात जनावरांच्या लसीकरणासाठी वापरले जाणारे लिक्विडच्या खरेदी-विक्रीच्या जाळ्यात अडकवून ही फसवणूक करण्यात आली आहे.

याप्रकरणी काल (दि. 12) नगर सायबर पोलिस ठाण्यात जेनी मेरी, डॉ. जॉन शेफर्ड, राकेश अमीन व अज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणूक व भारतीय तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी श्रीरामपूर येथील व्यावसायिक विपीन चुडीवाल यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, चुडीवाल यांचे फार्मासिटिकल वस्तूंचा पुरवठा करणारे स्टोअर आहे. त्यांच्या मित्राला 13 जून 2017 रोजी जेनी मेरी या महिलेचा ई-मेल आला. तिने झोनो ग्रो-ग्रीक कंपनीमध्ये प्रॉडक्शन मॅनेजर म्हणून काम करीत असल्याचे सांगितले. त्यांच्या कंपनीस जनावरांच्या लसीकरणासाठी लागणारे टोनिफाब्रिन लिक्विड कुणाल रेड्डी पुरवत होते. रेड्डी हे लिक्विडची गुजरातमधील राजू मॅन्युफॅक्‍चरिंग येथून खरेदी करीत होते. परंतु, रेड्डी यांचे निधन झालेले आहे. तुम्ही हे लिक्विड गुजरातमधून खरेदी करून झोनो ग्रो-ग्रीक कंपनीस पुरविल्यास एका गॅलनमागे 25 लाख रुपयांचा नफा मिळेल, असे सांगितले. त्यानंतर चुडीवाल हे व्यवहारास तयार झाले.

नमुना म्हणून एक लिटर लिक्विड पाठविण्यास सांगितले. चुडीवाल यांनी राजू मॅन्यु फॅक्‍चरिंगला 3 लाख 94 हजार रुपये ‘आरटी जीएस’द्वारे पाठविले. त्यानंतर एक लिटर लिक्विड घेऊन ते मुंबई येथे जाऊन झोनो ग्री-ग्रीकचा प्रतिनिधी असल्याचे सांगणार्‍यास दिले. त्यानंतर तो नमुना पास झाल्याचे चुडीवाल यांना कळविण्यात आले व कंपनीला 100 गॅलनची ऑर्डर दिली. त्यापैकी 10 गॅलन तात्काळ खरेदी करून देण्यास सांगितले. त्यावरून चुडीवाल यांनी 3 जुलै ते 16 ऑगस्ट 2017 दरम्यान राजू मॅन्युफॅक्‍चरिंगच्या वेगवेगळ्या बँकांच्या 18 खात्यावर 1 कोटी 94 लाख 400 रुपये आरटीजीएसद्वारे पाठविले. त्यानंतर दोन अ‍ॅल्युमिनिअमच्या कॅनमध्ये 10 गॅलन लिक्विड घरपोहोच देण्यात आले.

ग्रीक कंपनीच्या डॉ. जॉन शेफर्ड यांना फोन करताच त्यांनी मुंबई बी. के. सी. येथे 10 गॅलन आणून देण्यास सांगितले. त्याप्रमाणे चुडीवाल हे मुंबई येथे लिक्विड घेऊन गेले. परंतु, तेथे कोणीच लिक्विड घेण्यासाठी आले नाही. त्यानंतर डॉ. शेफर्ड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अजून 5 गॅलनची आवश्यकता असल्याचे स्पष्ट केले. 15 गॅलन एकत्र आणून द्या, असे सांगताच चुडीवाल यांनी पुन्हा 10 लाख 25 हजार रुपये राजू मॅन्युफॅक्‍चरिंग कंपनीच्या खात्यावर भरले. त्यानंतर चुडीवाल यांनी त्यांच्याकडे 15 गॅलन तयार केले. 

हे लिक्विड कोठे पाठवायचे, यासाठी डॉ. जॉन शेफर्ड, जेनी मेरी यांच्याशी संपर्क केला. परंतु, संपर्क झाला नाही. राजू मॅन्युफॅक्‍चरिंगचे राकेश अमीन यांच्याशीही संपर्क होऊ शकला नाही. चुडीवाल यांची तब्बल 2 कोटी 4 लाख 84 हजार 400 रुपयांची फसवणूक झाल्याचे स्पष्ट होताच त्यांनी सायबर पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस निरीक्षक सुनील पवार हे करीत आहेत.