Fri, Mar 22, 2019 02:01
    ब्रेकिंग    होमपेज › Ahamadnagar › व्यंकटेश पतसंस्थेत २ कोटींचा अपहार

व्यंकटेश पतसंस्थेत २ कोटींचा अपहार

Published On: Feb 02 2018 1:33AM | Last Updated: Feb 02 2018 12:12AMसोनई : वार्ताहर

नेवासा तालुक्यातील सोनईच्या व्यंकटेश पतसंस्थेत 1 कोटी 93 लाख रुपयांचा अपहार झाल्याच्या लेखापरिक्षकांच्या फिर्यादीवरुन संस्थेचा व्यवस्थापक श्यामकुमार शंकर खामकर, लिपीक गणेश हरिभाऊ गोरे आणि रोखपाल गणेश अंबादास तांदळे या तिघांविरूध्द अपहाराचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

हा गुन्हा काल (दि. 1) पहाटे 1 च्या सुमारास दाखल करण्यात आला असून, तिन्ही आरोपी पसार आहेत. सनदी लेखापरिक्षक सुविद्या सुविजय सोमाणी यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. या बाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पतसंस्थेचा व्यवस्थापक श्यामकुमार खामकर याने संस्थेत बेकायदा व्यवहार करुन वसूलपात्र रकमेच्या खाते क्रमांक 01532, सोनेतारण कर्ज खाते क्र. 0342, पगार अग्रीम, ठेवींचे खाते क्र. 1533 या खात्यांतील रकमांचा अपहार केला असून, चार कर्जदारांना बेकायदा दाखले दिले आहेत. यातून खामकर याने एकूण 645 लाख 4 हजार 470 रुपये स्वत:च्या फायद्यासाठी वापरले आहेत. 

लिपीक गणेश गोरे याने कर्ज खाते क्र. 1566, 0227, 1463, 0301, 0235, 0348, बचत खाते, पगार अग्रीम आदी खात्यांवरुन 27 लाख 13 हजार 302 रुपये स्वत:च्या वैयक्‍तीक फायद्यासाठी वापरे आहेत. संस्थेचा रोखपाल गणेश तांदळे याने कर्ज खाते क्र. 1569, 0509, 0263, पगार अग्रीम खाते, बचत खाते आदींमधून 20 लाख 56 हजार 921 रुपये वैयक्‍तीक फायद्यासाठी वापरले आहेत. 

ही सर्व रक्कम वसुलपात्र आहे. या संदर्भातील फिर्यादीत सोमाणी यांनी पुढे म्हटले आहे की, खामकर, गोरे, तांदळे यांनी संनमताने वसुली खर्च, कलम 101 नुसारची कारवाई, र कारवाई, कलम 91, कलम 138 पोटी 44 लाख 73 हजार 049 रुपये वेळोवेळी स्वत:च्या नावे व खासगी वापरासाठी बनावट सही शिक्क्यांचा वापर करुन संस्थेतून काढल्याचे निदर्शनास आले आहे. दि. 23 नोव्हेंबर 2017 रोजी तपासणीकामी लॉकर उघडण्यात आले. तेव्हा सोने तारण कर्ज खाते तपासले असता, 86 हजार 150 रुपयांचा अपहार झाल्याचे निदर्शनास आले. 

मुदत ठेव कर्ज वाटप अधिकारी व्यवस्थापक खामकर याच्याकडे होते. तपासणी करताना 27 मुतद ठेव पावत्यांवर कर्ज बाकी ठेवून त्या परत केल्या. या मध्ये 34 लाख 73 हजारी 514 रुपयांचा अपहार झाल्याचे निदर्शनास येते. सर्व बाबींचा विचार करता 1 कोटी 93 लाख 7 हजार 406 रुपयांचा अपहार झाला आहे. या बाबी लेखापरिक्षणात स्पष्ट झाल्या आहेत. 

गेल्या आठवड्यात ठेवीदारांनी व्यंकटेश पतसंस्थेच्या कार्यालयाबाहेर उपोषण केले आहे. तेव्हा नेवाशाचे उपनिबंधक नागरगोजे यांनी लेखी आश्‍वासन दिल्याने ते मागे घेण्यात आले होते. या प्रकरणी आरोपी, व्यवस्थापक श्यामकुमार खामकर, लिपीक गणेश गोरे व रोखपाल गणेश तांदळे यांच्याविरूध्द भारतीय दंड संहितेच्या कलम 406, 420, 468, 471, 120 (ब) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक किरण शिंदे करीत आहेत.