Fri, Jul 19, 2019 18:29होमपेज › Ahamadnagar › नगर : अॅटोरिक्षाच्या आगीत तीन चिमुरड्यांचा मृत्यू

नगर : अॅटोरिक्षाच्या आगीत तीन चिमुरड्यांचा मृत्यू

Published On: Jan 09 2018 1:08PM | Last Updated: Jan 09 2018 1:08PM

बुकमार्क करा
नेवासा : पुढारी ऑनलाईन 

नेवासा तालुक्यातील प्रवरासंगमजवळ सोमवारी मध्यरात्री अ‍ॅटोरिक्षाला लागलेल्या आगीत तीन चिमुरड्यांचा होरपळून मृत्यू झाला. तर दोन जण गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

तालुक्यातील चांदा येथील कुरेशी यांच्या नातेवाईकांचा सोमवारी संध्याकाळी साखरपुडा होता. त्यासाठी कुरेशी कुटुंबीय औरंगाबादहून चांदा येथे आले होते. रात्री कार्यक्रम संपल्यानंतर रिक्षा (क्र. एम.एच.२०-ईएस ०७२२) मध्ये चालक समीर हनिफ कुरेशी, रफिक हाजिजाफर कुरेशी (वय ५५), जुनेद शाफिक कुरेशी (वय १३), नमिरा शाफिक कुरेशी (वय ८), महेविश आतिक कुरेशी (वय ७) (सर्व रा़ संजयनगर नं-५ औरंगाबाद) हे रात्री ११ वाजण्याच्या सुमारास औरंगाबादला जाण्यासाठी निघाले होते. 

प्रवरासंगम जवळील पेट्रोल पंपासमोर त्यांची रिक्षा आली असताना रिक्षाने पेट घेतला. त्यामध्ये नमिरा शाफिक कुरेशी (वय ८), महेविश आतिक कुरेशी (वय ७) या दोन चिमुरड्यांचा होरपळून जागेवरच मृत्यू झाला. तर जखमींना पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविण्यात आले आहे. यातील जुनेद शाफिक कुरेशी (वय १३) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत नेवासा पोलिस ठाण्यात शफिक रफिक कुरेशी (रा. संजयनगर नं-५ औरंगाबाद) यांनी माहिती दिली आहे.