Sun, May 26, 2019 21:40होमपेज › Ahamadnagar › 17 विद्यार्थ्यांना एरंडाच्या बियांमुळे झाली विषबाधा

17 विद्यार्थ्यांना एरंडाच्या बियांमुळे झाली विषबाधा

Published On: Sep 01 2018 1:44AM | Last Updated: Aug 31 2018 10:54PMटाकळी ढोकेश्वर : वार्ताहर

पारनेर तालुक्यातील काळेवाडी (देसवडे) येथील प्राथमिक शाळेतील इयत्ता पहिली ते चौथीतील 17 विद्यार्थ्यांनी एरंडाच्या बिया खाल्ल्याने त्यांना विषबाधा झाली आहे. त्यांना पुढील उपचारासाठी लोणी प्रवरा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना गुरूवारी (दि.30) दुपारी चार वाजण्याच्या दरम्यान मधल्या सुट्टीत घडली. उपचारांनंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. 

या विद्यार्थ्यांमध्ये धनश्री दत्तात्रय तोडकर, ज्ञानेश्वर पांडुरंग गुंड, समृद्धी पांडुरंग गुंड, ज्ञानेश्वर संतोष शेलार ,ओंकार विठ्ठल टेकुडे, यश नवनाथ दाते, यश विनायक तिकडे, सिद्धार्थ बंडू औटी, राणी भाऊसाहेब दाते, महेश भानुदास तोडकर, अक्षय शिवाजी गुंड, चित्रा सुरेश शिंदे, आदित्य रोहिदास दाते, श्रावणी संतोष टेकुडे, लंकेश जिजाभाऊ टेकुडे यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांना पोखरी व खडकवाडी येथील प्राथमिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु, या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्याने त्यांना साकूर व लोणी प्रवरा येथे नेण्यासाठी पालकांना धावपळ करावी लागली. त्यामुळे बेजबाबदार शिक्षकांसह खडकवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी पालक वर्गातून होत आहे.

गुरुवारी दुपारी चार वाजता एरंडाच्या बिया खाल्ल्याने या 17 विद्यार्थ्यांना जुलाब, उलट्याचा त्रास होऊ लागला. त्यामुळे पालकांनी तातडीने शाळेमध्ये धाव घेऊन या मुलांना पोखरी येथील खासगी रुग्णालयात व खडकवाडी येथील प्राथमिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंत,ु खडकवाडी येथे वैद्यकीय अधिकारी नसल्याने त्यांना साकूर येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी न्यावे लागले. परंतु, या विद्यार्थ्यांची गंभीर स्थिती पाहून नंतर त्यांना दोन रुग्णवाहिकांमधून लोणी प्रवरा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर शुक्रवारी (दि.31) सकाळी या सर्व विद्यार्थ्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे.