Sat, Aug 24, 2019 21:52होमपेज › Ahamadnagar › आ. कर्डिलेंसह 17 जणांची न्यायालयीन कोठडीत रवानगी

आ. कर्डिलेंसह 17 जणांची न्यायालयीन कोठडीत रवानगी

Published On: Apr 14 2018 1:43AM | Last Updated: Apr 13 2018 11:29PMनगर : प्रतिनिधी

पोलिस अधीक्षक कार्यालयातील तोडफोड प्रकरणी अटकेत असलेल्या भाजप आ. शिवाजीराव कर्डिले यांच्यासह 17 जणांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. तर गुरुवारी (दि.12) रात्री उशिरा अटक झालेल्या चौघांना न्यायालयाने 16 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

गुरुवारी आ. कर्डीले यांच्या पोलिस कोठडीत न्यायालयाने एक दिवसाची वाढ केली होती. काल (दि. 13) दुपारी त्यांच्यासह 17 आरोपींना न्या. एस. डी. पाटील यांच्यासमोर हजर करण्यात आले. सहाय्यक पोलिस निरीक्षक डॉ. शरद गोर्डे व सरकारी वकील अ‍ॅड. ज्योती लक्का यांनी युक्तिवाद केला. त्यांनी आरोपींकडून गुन्ह्यातील अधिक नावे निष्पन्न व्हायची असल्याने तसेच वाहने हस्तगत करावयाची असल्याने पोलिस कोठडी वाढवून देण्याची मागणी केली. यावेळी आरोपींच्या वकिलांनी सरकारी पक्षाचा युक्‍तिवाद खोडून काढत पोलिसांनी चार दिवसांच्या पोलिस कोठडीत तपास पूर्ण केला आहे.

बहुतांशी नावे निष्पन्न झाली आहेत. त्यामुळे पोलिस कोठडी न देण्याची मागणी न्यायालयाकडे केली. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने आ. कर्डिले, अफजल शेख, सुरेश लक्ष्मण बनसोडे (रा. निखिल रो हौसिंग सोसायटी, बोल्हेगाव), सारंग ऊर्फ सागर अंबादास पंधाडे (रा. मोहनबाग, दिल्लीगेट), शुभम राजेंद्र राजवाळ (रा. कायनेटीक चौक), नगरसेवक फैय्याज शेख (रा. मुकुंदनगर), माजी नगरसेवक संजय गाडे (रा. फकीरवाडा), अवधूत जाधव (रा. सावेडी), धनंजय गाडे (रा. फकीरवाडा), अंकुश मोहिते (रा. सिद्धार्थनगर), एजाज ख्वाजा सय्यद ऊर्फ एजाज चिची (रा. झेंडीगेट), सागर सुभाष ठोंबरे, किशोर माणिक रोहकले, वैभव मच्छिंद्र म्हस्के, विकास पोपट झरेकर, गहिनीनाथ किसन दरेकर, सागर मुधकर डांगरे यांना 27 एप्रियलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.
तोडफोड प्रकरणी पोलिसांनी गुरुवारी रात्री उशिरा काशिनाथ बबन शिंदे, मयुर राजेंद्र कटारिया, सिद्धार्थ राजेंद्र शेलार, संजय हरिभाऊ दिवटे यांना अटक केली होती.

त्यांना काल न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता 16 एप्रिलपर्यंत त्यांची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली. दरम्यान, न्यायालयीन कोठडी मिळालेल्या आरोपींकडून जामिनासाठी वरिष्ठ न्यायालयात अर्ज दाखल करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. मात्र, काल सायंकाळपर्यंत अर्ज दाखल झाला नसल्याची माहिती मिळाली. तोडफोड प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपी अलका मुंदडा यांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पाटील यांच्याकडे जामिनासाठी अर्ज केला होता. तो न्यायाधीश पाटील यांनी फेटाळून लावला.

Tags : Ahmadnagar,  17, people, sent,  judicial, custody, along,  MLA Kardile