Sat, Aug 17, 2019 17:12होमपेज › Ahamadnagar › परवानगी पुण्यातील, विक्री पारनेरची!

परवानगी पुण्यातील, विक्री पारनेरची!

Published On: Jan 18 2018 1:48AM | Last Updated: Jan 17 2018 11:08PM

बुकमार्क करा
पारनेर : प्रतिनिधी

पुण्याच्या धर्मादाय आयुक्तांची खेड (जि. पुणे) येथील देवस्थानची मालमत्ता विक्रीची परवानगी व महसूल विभागातील कर्मचार्‍यांना हाताशी धरून तयार करण्यात आलेले बनावट फेर याच्या आधारे नगर जिल्ह्यातील ढवळपुरी येथील तब्बल 137 एकर जमीन पुण्याच्या लँड माफीयाच्या घशात घालण्यात आल्याचे उघड झाले आहे! जमीन विक्रीचे खरेदीखत करताना सादर करण्यात आलेल्या दस्तावेजांमध्ये अनेक संशयास्पद बाबी असतानाही पारनेरच्या दुय्यम निबंधकांनी मात्र हे दस्तावेज मुकाट्याने नोंदविल्याचेही स्पष्ट झाले आहे.

या व्यवहाराच्या खरेदीखताच्या अवलोकन केले असता, खरदीखत लिहून देणाराच्या रकाण्यात सात-बारा उतार्‍यास चुकीने लक्ष्मीनारायण विष्णू मंदिर संस्थान, खेड वहिवाटदार असे आले असल्याचे स्पष्टपणे लिहिण्यात आलेले असतानाही पुढे विष्णू मंदिर खेड (ता. खेड, जि. पुणे) यांच्यातर्फे पद्मनाथ शास्त्री गुरुहरिशास्त्री ऊर्फ पद्मनाभ गुरुहरिशास्त्री हे लिहून देत असल्याचा उल्लेख आहे. एकीकडे खेडच्या देवस्थानचे नाव चुकीने लागले असल्याचे नमूद करण्यात येऊन या देवस्थानच्या नावाने खरेदीखत करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे देवस्थान जमिनींबाबत शासनाने स्वतंत्र अध्यादेश पारित करून कब्जेदार सदरी असलेली देवस्थानची नावे इतर हक्कात टाकावीत किंवा कमी करावीत, असे सक्त आदेश तलाठी तसेच मंडलाधिकार्‍यांना दिलेले आहेत. असे असतानाही ढवळपुरीचा तत्कालीन तलाठी तसेच मंडलाधिकार्‍यांनी तशा पद्धतीचे बनावट फेर तयार केलेले आहेत. महसूल कर्मचार्‍यांंनी ही चूक केलेली असताना देवस्थान जमीनींबाबत शासनाच्या आदेशाची कल्पना असतानाही दुय्यम निबंधकांनीही त्याकडे साईस्करपणे दुर्लक्ष केले आहे. 1019, 1012 व 1674 हे तिन बनावट फेर या गट नंबरसाठी तयार झालेले आहेत. महसूल विभागाने त्याची सखोल चौकशी केल्यास या रॅकेटचा पदार्फाश होण्यास वेळ लागणार नाही.  शेतजमीन खरेदी करणारी व्यक्ती शेतकरी असावी असा दंडक असताना ज्यांनी ही जमीन खरेदी केली, ते शेतकरी असल्याचा कोणताही पुरावा खरेदीखतासोबत जोडण्यात आलेला नाही.

महसूल विभागातील जुन्या दस्तांचा अभ्यास केला असता या जमीनी देवस्थान इनाम असल्यासंदर्भातील नोंद एलिनेशन रजिष्टरमध्ये नाही. केवळ विष्णू नारायण देवस्थान इतकीच नोंद असताना, या देवस्थानचा खेड येथील देवस्थानशी काही सबंध असल्याबाबत एकही पुरवा नसताना खेड येथील देवस्थानच्या कागदपत्रांचा अधार घेऊन या जमीनी हडप करण्यात आल्या. नगर जिल्ह्यातील देवस्थानच्या जमिनींची विक्री करायची असेल तर त्याच जिल्ह्यातील सक्षम महसूल अधिकार्‍याची परवानगी असणे बंधनकारक आहे. तशी परवानगीही कोणत्याही अधिकार्‍याने दिलेली नाही. 

घसघशीत स्टॅम्प ड्युटीसाठी !

तब्बल 137 एकर जमिनीची बेकायदा विक्री झाल्याचे उघड झाल्यानंतर या जमीन कसणार्‍या कुळांनी दुय्यम निबंधक कार्यालयावर बुधवारी धडक देत दुय्यम निबंधक  राठोड यांच्यावर प्रश्‍नांची सरबत्ती करताच त्यांना अक्षरशः घाम फुटला! शासनास 20 लाख 85 हजारांची घसघशीत स्टॅम्प ड्युटी मिळणार होती. म्हणून हा दस्त नोंदविल्याचे उत्तर त्यांनी दिले! खरेदीखतामधील अनेक दस्त संशयास्पद असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर ते तपसण्याचे काम आमचे नाही, असे सांगण्यासही ते संकोचले नाहीत. 

एजंटांचे दबावतंत्र 

जमीन विक्री करण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून प्रयत्नशील असणार्‍या तिघे एजंट या जमीन कसणारे जागे झाल्यानंतर त्यांच्यावर दबाव आणू लागले आहेत. त्यासाठी दमदाटी, पैशांचे आमिष दाखविण्यात येत आहे. पुढाकार घेणार्‍यांना तुम्हाला तुमची जमीन देतो, अशिक्षीतांचे नेतृत्व करू नका, असेही सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार एक राज्यमंत्री व त्यांच्या खाजगी सचिवांचा या व्यवहारास वरदहस्त असून मंत्रालय स्तरावरून अधिकार्‍यांवर दबाव आणण्यात येत असल्याचीही माहिती आहे.