होमपेज › Ahamadnagar › तेराशे शाळांना ठोकणार टाळे!

तेराशे शाळांना ठोकणार टाळे!

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

नगर : प्रतिनिधी

राज्यातील जिल्हा परिषदा चालवित असलेल्या शाळांपैकी पटसंख्या कमी असणार्‍या तसेच शैक्षणिक गुणवत्ता ढासाळलेल्या तेराशे प्राथमिक शाळा बंद करण्याचा इशारा राज्याच्या शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी दिला. जिल्ह्यातील ढासळत्या शिक्षण परिस्थितीबद्दल त्यांनी चिंता व्यक्त करत शिक्षण विभागाचा पाणउतारा केला.

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातर्फे आयोजित प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाच्या आढावा बैठकीत प्रधान सचिव नंदकुमार बोलत होते. यावेळी विद्या प्राधिकरणचे संचालक सुनील मगर, शिक्षण संचालक सुनील चौहान, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी विश्‍वजीत माने, जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे, अर्चना गाडे, शोभा खंडारे, शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे, यांच्यासह मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी, गट शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी असा अधिकारी वर्ग उपस्थित होते.

शाळा बंद करण्याविषयी नंदकुमार म्हणाले की, ज्या शाळांची पटसंख्या खालवत चालली आहे, अशा शाळा बंद करण्यात येणार आहेत. बंद करण्यात येणार्‍या शाळा ह्या चांगली पटसंख्या असणार्‍या शाळांमध्ये समायोजित करण्यात येतील. शाळा बंद करण्यामागे शासनाचा पैसा वाचवणे हा उद्देश मुळीच नाही. ज्या पालकांना शाळेच्या गुणवत्ता कमी होत असल्याचे लक्षात येते ते पालक  त्यांच्या पाल्याला त्या शाळेतून काढून दुसर्‍या शाळेत घालतात. ज्या पालकांना हे कळत नाही, त्या पालकांच्या पाल्यांचा पालक हा प्रधान सचिव नंदकुमार असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचा पाणउतारा करतांना ते म्हणाले की, प्राथमिक शिक्षण विभागाचे अत्यंत दिशाहीन काम आहे. शाळा भेटी देणारे केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, गट शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी हे चुकीच्या पद्धतीने काम करताहेत. शाळांची गुणवत्ता वाढण्यासाठी अधिकार्‍यांनी आधी विचार बदलणे आवश्यक आहे. शिक्षकांनी मुलांना शिकवितांना नाटक करू नये. ज्याप्रमाणे शंभर टक्के पगार शिक्षक घेतात त्याप्रमाने शंभर टक्के मुले का प्रगत होत नाहीत?, असा सवालही नंदकुमार यांनी विचारला. गरीबाच्या ताटातील अन्नातून कपात करण्यात येणार्‍या करातून तुम्हाला पगार मिलतो हे विसरू नका असा सज्जड इशारा त्यांनी दिला.