Sat, Apr 20, 2019 07:51होमपेज › Ahamadnagar › मुलीचा विवाह रोखला

मुलीचा विवाह रोखला

Published On: Dec 15 2017 2:42AM | Last Updated: Dec 14 2017 11:01PM

बुकमार्क करा

श्रीगोंदा :  प्रतिनिधी 

एका 13 वर्षीय मुलीचा केडगाव ( ता. दौंड) येथे पार पडणारा  विवाह दक्षता समितीच्या महिलांनी रोखला. ही अल्पवयीन मुलगी श्रीगोंदा तालुक्यातील असून, मुलगाही तालुक्यातीलच आहे. तालुक्यातील  एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह नात्यातील एका मुलाशी निश्चित करण्यात आला होता. हा विवाह  मुलीच्या काही नातेवाईकांना मान्य नव्हता, मात्र नाइलाजाने हा विवाह निश्चित करण्यात आला होता. मुलगी अल्पवयीन असल्याने हा विवाह तालुक्यात न करता केडगाव येथे करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार कालची तारीख नक्की करण्यात आली होती. 

अल्पवयीन मुलीचा विवाह होणार असल्याची माहिती दक्षता समितीच्या मीराताई शिंदे व सुनीता पालीवाल, चांदनी खेतमाळीस  यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी हा सर्व प्रकार पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांच्या कानावर घातला. त्यांनी तात्काळ यवत पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक धन्यकुमार गोडसे यांच्याशी संपर्क साधत माहिती दिली. 

गुरुवारी (दि. 14) सायंकाळी सव्वाचार वाजता हा विवाह लावला जाणार होता. विवाहाची पूर्ण तयारी झाली. वधू- वर मंडपस्थळी येताच दक्षता समितीच्या सदस्यासह पोलिस पथक दाखल झाले. पोलिस का आले आहेत  हे थोडा वेळ कुणालाच समजेना. पोलिसांनी वर आणि वधू यांना वयाबाबत विचारले असता ते दोघेही अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी वर- वधू आणि दोन्ही बाजूचे नातेवाईक यांना सोबत घेऊन पोलिस ठाणे गाठले. सगळ्या मंडळीचे जबाब नोंदवून घेत वयाची अट पूर्ण झाल्याशिवाय लग्न करणार नाही अशा स्वरूपाचे जबाब नोंदविण्यात आले.