Sat, May 25, 2019 22:59होमपेज › Ahamadnagar › वणव्यात 125 हेक्टर जंगल खाक 

वणव्यात 125 हेक्टर जंगल खाक 

Published On: May 09 2018 1:52AM | Last Updated: May 09 2018 12:05AMश्रीगोंदा : प्रतिनिधी 

तालुक्यातील भानगाव कोथुळ या गावच्या शिवेवर असलेल्या जंगलास सोमवारी (दि.7) रात्री लागलेल्या आगीत 25 हेक्टर जंगल  व वनखात्याने वाटप केलेले 100 हेक्टर क्षेत्र जळून खाक झाले. आगीचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. या आगीत लाखो रूपयांच्या वनसंपत्तीचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, एवढी मोठी आग लागूनही वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी फिरकले नाहीत.सध्या उन्हाची दाहकता मोठी आहे. सोमवारी रात्री 8 च्या सुमारास या भागात आग लागली. आगीची तीव्रता अधिक असल्याने त्यावर नियंत्रण मिळविता आले नाही. दूरवर पसरत गेलेल्या या आगीत अंदाजे 125 हेक्टर क्षेत्रावर विखुरलेल्या जंगलातील शेकडो झाडे जळून खाक झाली. 

या भागात काम करणारे वनपाल एच. पी. गारूडकर यांनी सांगितले की, रात्री आठच्या दरम्यान ही आग लागली. आम्ही ती रात्री 11च्या दरम्यान विझवली. जंगल आणि वन विभागाची वाटप केलेली जमीन अशा एकूण 125 हेक्टरवर ही आग लागली होती. याबाबत वरिष्ठ अधिकार्‍यांना कल्पना दिली आहे.आग रात्रीच्या वेळी लागल्याने विसाव्यासाठी जंगलात आलेल्या पशु पक्ष्यांना याचा अंदाज आला नाही. त्यामुळे या आगीत अनेक पशुपक्षी मृत्युमुखी पडले असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र, याबाबत वनविभागाच्या अधिकार्‍यांनी अधिकृत कुठलीही माहिती दिली नाही. 

आगीचे कारण अस्पष्टच...

याबाबत परिक्षेत्र वन अधिकारी वर्षा दिघे यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या, मी बैठकीसाठी पुण्याला गेले होते. अद्याप घटनास्थळी भेट दिलेली नाही. घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केल्यानंतरच नुकसानीचा आकडा सांगता येईल. वनपरिक्षेत्र अधिकारी पुण्याला बैठकीला असल्यातरी, एवढी मोठी दुर्घटना पाहता वनविभागाच्या इतर अधिकार्‍यांनी पाहणी करणे आवश्यक होते. ही आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी धुम्रपान करणार्‍या मंडळीमुळे ती लागली असण्याची शक्यता व्यक्‍त केली जात आहे.