Fri, Apr 26, 2019 15:19होमपेज › Ahamadnagar › अपहारप्रकरणी १२ अधिकारी रडारवर!

अपहारप्रकरणी १२ अधिकारी रडारवर!

Published On: May 25 2018 1:07AM | Last Updated: May 24 2018 10:28PMनगर : प्रतिनिधी

जामखेड पंचायत समितीत सेवानिवृत्त कर्मचार्‍यांचे निवृत्ती वेतन परस्पर काढून अपहार केल्याच्या प्रकारात तत्कालीन 12 अधिकारी, कर्मचारी रडारवर आहेत. या 12 जणांवर फौजदारी गुन्हा दाखल करायचा की, खातेनिहाय चौकशी करायची याबाबत प्रशासनाने निर्णय घेतलेला नाही. तब्बल 40 लाखांचा घोळ झाल्याचा निष्कर्ष तपास पथकाने काढला आहे.

गेल्या 9 मे रोजी हा प्रकार घडला होता. बारा दिवसांनंतरही प्रशासनाला अफराची रक्कम किती याची जुळवणी करता आली नव्हती. संबंधित कर्मचार्‍याने केलेल्या कृष्णकृत्यांचा अहवाल तपास पथकाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे दिला आहे. संबंधित एका कर्मचार्‍याने अपहार केल्याचे दिसून येत असले तरी, वेतन काढण्याच्या प्रक्रीयेत सहभागी असणारे तत्कालीन अधिकारीही दोषी धरले जाऊ शकतात. त्यामध्ये 2016 सालपासूनचे गटविकास अधिकारी, लेखा विभागातील कार्यालयीन अधीक्षक, तसेच लिपिक यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.

सेवानिवृत्त कर्मचार्‍यांचे निवृत्ती वेतन परस्पर लाटल्याचा प्रकार जामखेड पंचायत समितीमध्ये उघड झाल्यानंतर कक्ष अधिकार्‍यांनी सामान्य प्रशासन विभागाला सील ठोकले. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या वित्त विभागाचे पथक चौकशी करण्यासाठी जामखेड पंचायत समितीत गेले होते. पथकाने चौकशी केल्यानंतर संबंधित कर्मचार्‍याने केलेल्या अफरानुसार त्याच्यावर काय कारवाई करता येईल याचा अहवाल दिला आहे.

शासकीय कर्मचार्‍यांना निवृत्तीनंतर देण्यात येणारे निवृत्तीवेतन संबंधित कर्मचारी व त्यांच्या वारसाचा मृत्यू झाल्यावर बंद करण्यात येते. मात्र, मयत निवृत्त वेतनधारकांच्या बँक खात्यातून पैसे काढून आपल्या खात्यात वर्ग करण्याचा प्रताप पंचायत समितीचा एक कर्मचार्‍यारी गेल्या कित्येक महिन्यांपासून करत होता. यामुळे जामखेड पंचायत समितीच्या सामान्य प्रशासन विभाग कक्ष अधिकारी संजय छैलकर यांनी 9 मे रोजी पंचनामा करून सायंकाळी उशिरा कूलूप लावून सील केले होते. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी 10 मे रोजी जिल्हा परिषदेच्या वित्त विभागाचे पथक आले होते. त्यांनी सामान्य प्रशासन विभागाला लावलेले सील काढून सविस्तर चौकशी केली.

सदर कर्मचार्‍याकडे पंचायत समितीच्या अर्थ विभागाची जवाबदारी आहे. निवृत्त कर्मचार्‍यांचे पगार येथे नेमणुकीस असलेला कर्मचारी काढतो. मात्र, मयत झालेल्यांची नावे कमी न करता त्यांच्या नावे जमा होणारी रक्कम पंचायत समितीच्या खात्यातून स्वतःच्या खात्यात जमा करण्याचा प्रताप त्याने केला होता.

प्रभारी ‘चार्ज’ला वैतागले अधिकारी

पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदावर 2016 पासून प्रभारी अधिकार्‍यांचीच नेमणूक आहे. गटविकास अधिकारी पदाचा प्रभारी पदभार काही दिवस जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव यांच्याकडे होता. त्यानंतर सहायक गटविकास अधिकारी प्रज्ञा माने यांच्याकडे पदभार आला. मात्र त्या रजेवर असल्याने आता तालुका कृषी अधिकारी अशोक शेळके यांच्याकडे गटविकास अधिकारी पदाचा पदभार देण्यात आला आहे. त्यातच घोटाळ्यांचे प्रकार समोर येत असल्याने प्रभारी ‘चार्ज’ला अधिकारी वैतागले आहेत.