Fri, May 24, 2019 02:41होमपेज › Ahamadnagar › 12 लाख बालकांना गोवर-रुबेला लस

12 लाख बालकांना गोवर-रुबेला लस

Published On: Aug 25 2018 1:12AM | Last Updated: Aug 25 2018 1:12AMनगर : प्रतिनिधी

नोव्हेंबरमध्ये राबविण्यात येणार्‍या गोवर रूबेला लसीकरण मोहिमेव्दारे जिल्ह्यातील जवळपास 12 लाख बालकांचे लसीकरण करण्याचे उद्दीष्ट आहे. त्यासाठी काटेकोर नियोजन करण्यात येत असून सर्व संबंधित यंत्रणांनी झोकून देवून यात काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी केले.

लहान मुलांना होणारा गोवर हा अत्यंत संक्रमक आणि घातक आजार आहे. सरकारने 2020 पर्यंत गोवर निर्मूलन व रूबेला आजाराचे नियंत्रण करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. याअंतर्गत राज्यात नोव्हेंबर महिन्यात गोवर रुबेला लसीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेच्या नियोजनासंदर्भात नगरमध्ये जिल्हाधिकारी व्दिवेदी यांच्या उपस्थितीत प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली.

या कार्यशाळेस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रदीप मुरंबीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संदीप सांगळे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बापुसाहेब नागरगोजे, जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉ.प्रकाश लाळगे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.संजीव बेळंबे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय कदम, मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अनिल बोरगे आदी उपस्थित होते.

डॉ. संदीप सांगळे म्हणाले की, 14 नोव्हेंगबरपासून गोवर व रुबेला लसीकरण मोहिम किमान 4- 5 आठवड्याच्या कालावधीमध्ये राबविण्यात येईल. ज्यात सर्व शाळांमध्ये पहिल्या 2-3 आठवड्यात लसीकरण सत्र आयोजित करण्यात येतील. त्यानंतर उर्वरीत 35-40टक्के लाभार्थ्यांचे गोवर रुबेला लसीकरण अंगणवाडी केंद्र व नियमित लसीकरण, उपकेंद्र येथे करण्यात येईल. या लसीकरण मोहिमे अंतर्गत सर्व लाभार्थ्यांना गोवर रुबेला लसीचे एक इंजेक्शन दिले जाईल.

कार्यशाळेस शिक्षणाधिकारी, समाजकल्याण अधिकारी, खाजगी वैद्यकिय महाविद्यालयांचे विभागप्रमुख, तालुका आरोग्य अधिकारी, शिक्षणाधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, वैद्यकिय अधिक्षक, अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय बालरोग तज्ञ, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.