होमपेज › Ahamadnagar › ‘रन फॉर साई’साठी धावले 11 हजार स्पर्धक

‘रन फॉर साई’साठी धावले 11 हजार स्पर्धक

Published On: Feb 12 2018 1:47AM | Last Updated: Feb 11 2018 10:53PMशिर्डी : प्रतिनिधी

साईबाबांच्या प्रचार आणि प्रसार व्हावा, या उदात्त हेतूने आयोजित करण्यात आलेल्या रन फॉन साई यासाठी वय वर्षे 14 पासून ते 70 वर्ष वयोगटापर्यंत मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत 10 हजार 600 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. भारतातील अनेक राज्यांसह केनिया, तसेच इथोपिया या देशातील स्पर्धकही स्पर्धेत सहभागी झाले होते. 

शिर्डीच्या साईनगरच्या मैदानातून सकाळी 6 वाजेच्या सुमारास स्पर्धकांना झेंडा दाखवून स्पर्धेस प्रारंभ झाला. यावेळी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, पोलिस महानिरीक्षक कृष्णप्रकाश, नगराध्यक्ष कैलास बापू कोते, साई निर्माणचे विजय कोते, विलास कोते, नगराध्यक्षा योगिता शेळके, नगरसेवक अभय शेळके, गटनेते अशोक गोंदकर उपस्थित होते.

स्पर्धेसाठी साईनगर ते काकडी विमानतळ असा मार्ग निवडण्यात आला होता. या स्पर्धेत माउंट एव्हरेस्ट सर केलेले ब्रिज शर्मा, देशात अनवानी स्पर्धेत सर्वांत जलद धावणारे थॉमस बॉबी फिलिप्स् तर संजीवनी शैक्षणिकचे अमित कोल्हे यांनीही सहभाग घेतला होता.  स्पर्धेत तीन किमी, दहा किमी, 21 किमी, आणि 42 किमी साठी वयाच्या 14 ते 70 वयोगटाच्या स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत विजयी होणार्‍या 114 स्पर्धकांना पारितोषिके देऊन, तर सुमारे 10 लाख रुपयांचे बक्षिसे देण्यात येणार आहेत. 

इन्लाईट मॅरेथॉन स्पर्धेत केनियाचे इल्फेज रुटो आणि जॉन रिप्रोझेल केनिगे यांनी प्रथम, द्वितीय क्रमांक पटकावले. याचा अनौपचारिक सत्कार करण्यात आला. विदेशी स्पर्धक म्हणून ते या स्पर्धेचे खास आर्कषण राहिले. विजेत्यांना पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम लवकरच अयोजित करण्यात येणार असून पुढील वर्षीही ही स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे.बक्षीस वितरणप्रसंगी ना. विखे म्हणाले की, साईबाबा समाधी शताब्दी सोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘रन फॉर साई’ या मॅरेथॉन इतक्या मोठ्या प्रमाणात यशस्वी होण्याचे खरे श्रेय हे भारतातून तसेच देशाबाहेरून आलेल्या खेळांडूचे आहे. त्यामुळे साईबाबांचे आशिर्वाद आणि धावपट्टूंच्या सहभागानेच मॅरेथॉन यशस्वी झाल्याचे त्यांनी सांगितले. 

ही स्पर्धा पाहण्यासाठी शिर्डीत मोठी गर्दी झाली होती. ज्येष्ठ नागरिकांच्या सहभागाने सगळेच अवाक झाले.