Tue, Mar 19, 2019 05:37होमपेज › Ahamadnagar › सेतू, महा ऑनलाईनची केंद्रे झाली सज्ज; निकालानंतर वाढणार गर्दी

शालेय दाखल्यांसाठी १ हजार २६४ केंद्रे!

Published On: May 22 2018 1:23AM | Last Updated: May 21 2018 11:06PMनगर : प्रतिनिधी

महाराजस्व अभियानांतर्गत  वर्षांपासून जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना शाळेतच शैक्षणिक दाखल्यांचे वाटप करण्यात येत आहे. तरीही दरवर्षी दहावी, बारावीचे निकाल लागल्यानंतर सेतू, महाईसेवा केंद्रांवर शालेय दाखल्यांसाठी गर्दी होत विद्यार्थ्यांची गैरसोय होते. यावर्षी शालेय दाखले देण्यासाठी जिल्ह्यात 1 हजार 264 सेतू व महा ई सेवा केंद्रे सज्ज झाली आहेत. दहावी, बारावीचा निकाल लागल्यावर दा खल्यांसाठी गर्दी वाढणार आहे.

दोन वर्षांपूर्वी राज्य शासनाने महाराजस्व अभियान सुरु केले. त्याअंतर्गत विद्यार्थ्यांना शालेय दाखल्यांचे वाटप शाळेतच करण्यात येत आहे. शाळेत दाखल्यांचे वाटप केल्याने प्रवेशाच्या वेळी महा ई सेवा केंद्रांवर होणारी ऐनवेळची गर्दी आता कमी होण्याचा शासनाचा अंदाज होता. मात्र तरीही निकालानंतर मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहावयास मिळते.

जिल्ह्यात असलेल्या सेतू व महा ई सेवा केंद्रांमध्ये नगर शहरात 277 केंद्र आहेत. नव्याने 15 ठिकाणी सेतू केंद्र सुरु करण्यास लवकरच परवानगी देण्यात येणार आहेत. दरवर्षी विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक प्रवेशाच्या वेळेस विविध प्रकारच्या दाखल्यांसाठी महा ई सेवा, सेतू केंद्रांमध्ये वणवण फिरावे लागते. शैक्षणिक वर्षात दाखल्यांसाठी विद्यार्थ्यांचे हेलपाटे कमी व्हावेत, या उद्देशाने राज्य सरकारने महाराजस्व अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना शिबिरे घेऊन शाळेतच सर्व प्रकारचे दाखले उपलब्ध होण्यासाठी विशेष मोहीम राबवते.

या मोहिमेत विद्यार्थ्यांना जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, अधिवास दाखला, रहिवास दाखला, नॉन क्रिमीलेअर यासह अनेक दाखले देण्यात येतात. जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना ही मोहीम राबवण्याचे निर्देश होते. त्यानुसार यावर्षीही सर्व तहसीलदारांनी शिबिरे घेत मोहीम राबविली.

दहावीच्या विद्यार्थांना आता अकरावीसाठी प्रवेश घेण्यासाठी तर बारावीच्या विद्यार्थ्यांना पदवीसाठी प्रवेशाची धावपळ सुरु होईल. वास्तविक पाहता जातीच्या व नॉनक्रीमिलेयर दाखल्यांची प्रक्रिया वर्षभर सुरु असते. मात्र ऐन प्रवेशाच्या वेळेस महाविद्यालयांनी मागणी केल्यावरच दाखले काढण्यासाठी विद्यार्थ्यांची धावपळ उडते. अजून दहावी, बारावीचा निकाल येणे बाकी असले तरी विद्यार्थी व पालकांची त्यासाठी धावपळ सुरु केली आहे. यावर्षी शाळेत विद्यार्थ्यांना दाखल्यांचे वाटप करण्यात आल्याने यावर्षी महा ई सेवा केंद्रांवर होणारी गर्दी कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तरीही निकालापूर्वीच नागरिकांनी आवश्यक दाखले काढून घेण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

असे आहेत दाखल्यांचे दर

महा ई सेवा, सेतू केंद्रात विविध प्रकारचे दाखले देण्यात येतात. जिल्ह्यात एकूण 1 हजार 264 महा ई सेवा व सेतू केंद्रे सद्यस्थितीत सुरु आहेत. दाखल्यांसाठी ठराविक कालावधी ठरवून देण्यात आलेला आहे. त्यासाठी 6 ते 15 दिवसांचा जास्तीत जास्त कालावधी आहे. सर्व प्रकारच्या दाखल्यांसाठी जास्तीतजास्त 34 ते 35 रुपये शुल्क आकारण्यात येते. नवीन शासन निर्णयानुसार अधिक शुल्क घेणार्‍या सेतू, महा ई सेवा केंद्र चालकावर कारवाई करण्याचे अधिकार हे प्रांताधिकारी व तहसीलदारांना देण्यात आले आहे.