Fri, Apr 19, 2019 12:07होमपेज › Ahamadnagar › ऑनलाईन प्रणालीमुळे 1.83 कोटी रुपये बचत

ऑनलाईन प्रणालीमुळे 1.83 कोटी रुपये बचत

Published On: Sep 02 2018 1:09AM | Last Updated: Sep 02 2018 1:09AMनगर : प्रतिनिधी

सार्वजनिक वितरण व्यवस्थेत ऑनलाईन प्रणालीने पारदर्शकता आली आहे.  ई-पॉस मशीन्सद्वारे शिधापत्रिकांवर मिळणारे अन्नधान्य गरजू आणि योग्य लाभार्थींपर्यंत मिळू लागले आहे. संगणकीकरण व आधुनिकतेमुळे जिल्ह्यातील अन्नधान्याची मागणी दरमहा तब्बल 7 हजार 500 मेट्रीक टन कमी झाली असून, शासनाची तब्बल 1 कोटी 83 लाख 97 हजार रुपयांची बचत झाल्याची माहिती पालकमंत्री राम शिंदे यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात त्यांनी सार्वजनिक वितरण व्यवस्था दक्षता समितीची बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे, प्र. जिल्हा पुरवठा अधिकारी वाघ, सहायक पुरवठा अधिकारी जितेंद्र इंगळे यांच्यासह अशासकीय सदस्यांची उपस्थिती होती.

यावेळी ना. शिंदे यांनी जिल्ह्यातील शिधापत्रिकेद्वारे वितरित होणार्‍या अन्नधान्य आणि केरोसीन वाटपाचा आढावा घेतला. ज्याठिकाणी केरोसीन तसेच स्वस्त धान्य दुकाने बंद आहेत, त्याठिकाणी नव्याने जाहीरनामे काढण्याची प्रक्रिया आठ दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी पुरवठा विभागाला दिले.

राज्य शासनाने एप्रिल 2018 पासून एपीडीएस अंतर्गत ई-पॉस मशीन्सद्वारे शिधापत्रिकांवर अन्नधान्य वितरणास सुरुवात केली आहे. ई-पॉस मशीन्सचा अवलंब करण्यापूर्वी जिल्ह्याची अन्नधान्याची मागणी दरमहा 17 हजार 500 मेट्रिक टन इतकी होती. आता ऑगस्ट 2018 मध्ये ही मागणी केवळ 10 हजार मेट्रीक टनांवर आली आहे. त्यामुळे शासनाचे साधारण 7 हजार 500 मेट्रीक टन धान्य कमी झाले असून, ते इतरत्र योग्य लाभार्थ्यांपर्यंत जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

केरोसीनची मागणीही घटली आहे. उज्ज्वला योजनेमुळे काही गावांनी आता ‘केरोसीन नको’ असे सांगून केरोसीनमुक्त गावाकडे वाटचाल सुरु केली आहे. जिल्ह्याचे मार्च 2018 साठी मंजूर असणारे केरोसीनचे नियतन हे 3 हजार 120 किलोलीटर (260 टँकर) असे होते. मात्र ऑगस्ट महिन्यात त्याची मागणी केवळ 780 के. एल. (65 टँकर) एवढी घटली आहे. तब्बल 195 टँकर केरोसीनची मागणी कमी झाली असल्याचे शिंदे म्हणाले.