होमपेज › Ahamadnagar › कापूस खरेदीने गाठला दीडशे कोटींचा टप्पा

कापूस खरेदीने गाठला दीडशे कोटींचा टप्पा

Published On: May 24 2018 1:30AM | Last Updated: May 23 2018 11:17PMशेवगाव : रमेश चौधरी

कापूस खरेदीने दीडशे कोटींचा टप्पा पार केला आहे. परभणी, केज भागातून  कापूस येथे विक्रीला आल्याने जिनिंग तरल्या आहेत तर बाजार समितीला दीड कोटींचा शेष मिळाला आहे. बोंडअळीने झालेल्या कपाशी नुकसानीची भरपाई मिळणार असल्याने शेतकर्‍यांसाठी ‘बुडत्याला काडीचा आधार’ होणार आहे.

शेवगाव तालुक्यातील शेतकरी कपाशी उत्पन्नाने मालामाल होतो, हा ग्रह गत तीन ते चार वर्षांपासून बदलत जाऊन नुकसानीने येथील शेतकरी हालाहाल होत आहे. ही केवळ निसर्गाचीच अवकृपा नसून बोगस बियाणेही यास दोषी ठरले आहे. आता उत्पन्नात बदल करावा, अशी मानसिकता शेतकर्‍यांत तयार झाली असली तरी ऐनवेळी कोणते पिक हा प्रश्‍न पुढे उभा करून पुन्हा कपाशीकडेच वळणार यात शंका नाही. परंतु जून महिन्यातच या पिकाची लागवड करण्यायोग्य पाऊस झाला तरच हे क्षेत्र टिकून राहणार आहे, अन्यथा कपाशी पिक क्षेत्रात कमालीची घट होण्याची शक्यता आहे.

गेल्या सहा ते सात वर्षांपूर्वी येथे कपाशी पिक चांगले साधत गेल्याने दोन ते तीन वर्षात 17 ते 18 जिनिंग उभ्या राहिल्या. कालातरांने निसर्गाची अवकृपा सुरू झाली व काही जिनिंग बंद राहत गेल्या. परिणामी कोट्यवधी रुपयांच्या भांडवलीची गुंतणूक या व्यापार्‍यांवर आता पश्चातापाची वेळ आली. खासगी व्यापार्‍यांचा तर काटाच झाला. शेतकर्‍यांची यापेक्षा वाईट अवस्था झाली आहे. दरवर्षीच खर्च करून उत्पन्नापासून वंचित राहण्याची वेळ आली. गतवर्षी बोंडअळी रोगाच्या प्रार्दुभावाने कपाशी पिकांबरोबर शेतकरीही गळाला गेला.

तालुक्यात दीडशे कोटी रुपयांचा टप्पा पार करून यंदा जिनिंगमध्ये 3 लाख 75 हजार 760 क्विंटल कापूस खरेदी झाली असली तरी शेवगाव, पाथर्डी, नेवासा, पैठण, गेवराई बरोबर केज व परभणी येथून जिनिंगसाठी कापूस आणणे भाग पडल्याने हा खरेदीचा आकडा वाढला गेला आहे. वास्तविक शेवगाव, पाथर्डी तालुक्यातून निचांकी आवक झाली आहे. यास व्यापार्‍यांनीही दुजोरा दिला आहे. 

सर्वात जास्त सन 2014-15 मधे 5 लाख 60 हजार 873 क्विंटल व सन 2016-17 मध्ये 5 लाख 13 हजार 118 क्विंटल कपाशी आवक झाली होती. सर्वात कमी 2013-14 मधे 1 लाख 5 हजार 69 क्विंटल व सन 2015-16 मध्ये 1 लाख 80 हजार 588 क्विंटल कपाशी आवक येथे झाली होती. सन 2012-13 मधे 3 लाख 96 हजार 94 नंतर आता 2017-18 मधे 3 लाख 75 हजार 760 क्विंटल एवढी बरोबरीची आवक झाली आहे.

गतवर्षी नुकसान झाल्याने अडचणीत आलेला शेतकरी पावसाळा जवळ आल्यामुळे बी- बियाणे खरेदीच्या काळजीत पडला होता. शासनाने नुकसान झालेल्या कपाशी उत्पन्नाची 6 हजार 800 रुपये प्रति हेक्टर भरपाई उपलब्ध करून दिल्याने ती बुडत्याला काडीचा आधार होणार आहे परंतु ही भरपाई पाऊस होण्याअगोदर शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा झाली तरच ती शेतीयोग्य कारणी खर्च होण्यास हातभार लागणार आहे.