Thu, Apr 25, 2019 23:31होमपेज › Ahamadnagar › ‘सीना पूला’साठी १.५० कोटीचा निधी!

‘सीना पूला’साठी १.५० कोटीचा निधी!

Published On: Jun 19 2018 1:33AM | Last Updated: Jun 18 2018 11:41PMनगर : प्रतिनिधी

नागरी दलितवस्ती सुधार योजनेंतर्गत सक्कर चौकातील सीना नदीवर असलेल्या लोखंडी पुलाशेजारील नवीन पुलाच्या कामासाठी 1.50 कोटीचा निधी उपलब्ध झाल्याची माहिती महापौर सुरेखा कदम यांनी दिली. या योजनेतील निधीवर मिळालेल्या व्याजाची रक्कम वापरण्यास परवानगी मिळण्यासाठी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून येत्या काही महिन्यातच काम पूर्ण होऊन सदरचा रस्ता नागरिकांसाठी खुला करण्यात येईल, असा विश्‍वासही महापौर कदम यांनी व्यक्त केला आहे.

सीना नदीवरील पुलाच्या कामासाठी 6.12 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. मनपाने यापूर्वी दलितवस्ती सुधार योजनेतून 1.80 कोटी रुपये मंजूर केले होते. मात्र, या पुलाच्या कामासाठी आणखी 4.32 कोटींच्या निधीची गरज आहे. निधी उपलब्ध नसल्याने अडचणी निर्माण झाल्या होत्या. महापौर पदाचा कार्यभार घेतल्यापासून या पुलाच्या कामाला गती देण्यासाठी प्रयत्न केले आहेत.

सद्यस्थितीत पुलाच्या स्लॅबचे काम सुरु आहे. त्यामुळे या कामासाठी वाढीव निधी उपलब्ध व्हावा, यासाठी शासनाकडे मागणी केली होती. तसेच या योजनेच्या निधीवरील व्याजाचे 1.50 कोटी रुपये मनपाकडे उपलब्ध असल्याने शासनाच्या निर्णयानुसार सदरची रक्कम याच कामावर खर्च करण्यासाठी मंज़ुरी मिळावी, यासाठी प्रयत्न सुरु होते. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याशीही याबाबत चर्चा केली. त्यांनी शासनाच्या निर्णयानुसार 1.50 कोटी रुपयांच्या व्याजाची रक्कम याच कामासाठी वापरण्यास प्रशासकीय मान्यता दिल्यामुळे पुढील कामासाठी निधी उपलब्ध झाला आहे. या कामासाठी आवश्यक असलेल्या उर्वरीत निधीसाठीही शासनाकडे पाठपुरावा सुरु आहे. मात्र, दरम्यानच्या काळात काम रखडणार नाही, याबाबत दक्षता घेण्यात आल्या आहेत.

व्याजाच्या रकमांचा प्रस्ताव शासनाकडे!

महापालिकेकडे विविध योजनांपोटी प्राप्त झालेल्या निधीवरील व्याजाची कोट्यवधी रुपयांची रक्कम जमा आहे. शासन निर्णयानुसार सदरची रक्कम याच योजनेतील कामावर अथवा याच योजनेतून नवीन कामे घेण्यासाठी उपलब्ध व्हावी, यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर यांची भेट घेऊन याकडे लक्ष वेधले आहे. लवकरच या रकमांच्या वापरालाही परवानगी मिळेल, अशी अपेक्षा महापौर सुरेखा कदम यांनी व्यक्त केली.