Sun, Jul 21, 2019 16:12
    ब्रेकिंग    होमपेज › Ahamadnagar › ‘लिटरबिन्स’ खरेदीबाबत लक्षवेधी!

‘लिटरबिन्स’ खरेदीबाबत लक्षवेधी!

Published On: Mar 06 2018 11:03PM | Last Updated: Mar 06 2018 10:48PMनगर : प्रतिनिधी

‘लिटरबिन्स’ खरेदीसाठी पदाधिकार्‍याच्या मर्जीतल्या ठेकेदाराची लाखो रुपयांनी जादा दर असलेली निविदा मंजूर करण्यासाठी प्रक्रियेत होत असलेला राजकीय हस्तक्षेप ‘पुढारी’ने चव्हाट्यावर आणल्यानंतर या प्रकरणी आ. संग्राम जगताप यांनी काल (दि.6) ‘लक्षवेधी’द्वारे शासनाचे लक्ष वेधले आहे. याबाबत शासनाची भूमिका व प्रतिक्रीया काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

शहरातील महत्वाच्या रस्त्यांवर कचरा टाकण्यासाठी लिटरबिन्स बसविण्यात येणार आहेत. त्यासाठी मागविण्यात आलेली पहिली निविदा रद्द करण्यात आली. त्यानंतर पुन्हा निविदा मागविण्यात आल्या आहेत. या निविदेतील प्रपत्रात कामासाठी वापरावयाच्या साहित्याचा तपशीलच चुकीचा दिलेला असल्याचे पुढे आले आहे. लोखंडी लिटरबिन्सची खरेदी प्रस्तावित असतांना यात ‘स्टेनलेस स्टील’च्या (एसएस) साहित्याच्या वापराचा पर्याय प्रशासनाकडून देण्यात आला आहे. लोखंडी व स्टीलच्या लिटरबिन्सच्या दरात मोठी तफावत असल्याने निविदेचे दर भरतांना संभ्रम निर्माण झाला असून याचा फायदा घेत एका पदाधिकार्‍याच्या मर्जीतील ठेकेदाराची जादा दराची निविदा मंजूर करण्यासाठी महापालिकेत राजकीय हस्तक्षेप सुरु झाला आहे. ‘पुढारी’ने 5 मार्च रोजी याबाबत वृत्त प्रसिध्द करुन मनपावर लाखो रुपयांचा बोजा टाकण्यासाठी सुरु असलेल्या हालचाली समोर आणल्या होत्या. 

आ. जगताप यांनी या प्रकरणी विधीमंडळात लक्षवेधी सूचना मांडत शासनाचे लक्ष वेधले आहे. राजकीय हस्तक्षेपामुळे संशयाच्या भोवर्‍या सापडलेली निविदा प्रक्रिया, ई-निविदा प्रक्रियेचा उद्देशाला फासली जाणारी हरताळ यासह नुकतीच पथदिवे घोटाळ्यातून मनपाची 34 लाखांची झालेली फसवणूक ताजी असतांनाच पदाधिकारी, अधिकारी व ठेकेदाराच्या संगनमतातून मनपावर आर्थिक बोजा टाकण्यासाठी सुरु असलेला प्रयत्न व यामुळे जनतेमध्ये निर्माण झालेला असंतोष आदींबाबत शासनाची प्रतिक्रिया व भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी आ. जगताप यांनी ‘लक्षवेधी’द्वारे शासनाकडे केली आहे.