Wed, Mar 27, 2019 05:56होमपेज › Ahamadnagar › ७५ दिवसांचा तपास अन् सामाजिक दबाव

कोपर्डी : ७५ दिवसांचा तपास अन् सामाजिक दबाव

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

 नगर : गणेश शेंडगे

कोपर्डीच्या घटनेनंतर राज्यभरातील जनप्रक्षोप अनावर झाला होता. दररोज हजारो लोक कोपर्डीत येत होते. अशा परिस्थितीत वेळेत तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करणे, हे पोलिस यंत्रणेसमोर मोठे आव्हान होते. एकीकडे पोलिस यंत्रणा कोपर्डीतील सुरक्षा व्यवस्था व कायदा-सुव्यवस्था हाताळत होती, तर दुसरीकडे विशेष तपास पथक तपास करीत होते. सलग 75 दिवस तपास सुरू होता. 89 व्या दिवशी दोषारोपपत्र दाखल होईपर्यंत तपास पथक तणावाखाली होते. 

13 जुलै रोजी सायंकाळी कोपर्डीतील ‘निर्भया’वर अत्याचार झाला, घटनेची माहिती मिळाल्यानंतर कर्जत पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शिवाजी गवारे हे पोलिस फौजफाट्यासह कुळधरण प्राथमिक आरोग्य केंद्र व कोपर्डीत दाखल झाले. मुख्य आरोपी पप्पू शिंदे याला घटनास्थळावरून पळून जाताना पाहिलेले असल्याने पीडितेच्या नातेवाईकाने त्याचे नाव पोलिसांना सांगितले. पोलिसांनी तात्काळ त्यांचा शोध सुरू केला. मध्यरात्री पीडितेच्या चुलतभावाने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

रात्री अंधार असल्याने दुसर्‍या दिवशी सकाळी पोलिस निरीक्षक गवारे यांनी घटनास्थळ पंचनामा केला. तत्कालिन पोलिस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी, अपर पोलिस अधीक्षक घनश्याम पाटील, पोलिस उपअधीक्षक धीरज पाटील आदी वरिष्ठ अधिकार्‍यांसह पोलिस फौजफाटा कोपर्डीत दाखल झाला. गावाला पोलिस छावणीचे स्वरुप प्राप्त झाले. 15 जुलै रोजी पहाटेच्या सुमारास मुख्य आरोपी शिंदे हा श्रीगोंद्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या हाती सापडला. 

दरम्यान, या घटनेची माहिती राज्यभरात पसरताच राज्यभरातील नेते, सामाजिक संघटना, नेते कोपर्डीकडे येऊ लागले. कर्जतला केलेल्या रास्ता-रोको आंदोलनात सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्यात मागणी करण्यात आली. अतिशय क्रूर पद्धतीने अत्याचार व खुनाची घटना घडलेली असल्याने  वातावरण संतप्त झाले होते. निषेध मोर्चे, आंदोलने सुरू झाली. कोपर्डीत दररोज हजारो लोक येत होते. अशा परिस्थितीत साक्षीदारांच्या साक्षी घेणे, प्रत्यक्ष गुन्हा करताना कोणीही नसताना परिस्थितीजन्य पुराव्यांची साखळी निर्माण करून आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्याचे मोठे आव्हान पोलिस यंत्रणेसमोर होते.

कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक डॉ. त्रिपाठी यांनी हा तपास कर्जत पोलिस ठाण्याकडून 20 जुलै रोजी स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला व त्याच्यासाठी विशेष तपास पथक नियुक्त केले. पोलिस निरीक्षक शशिराज पाटोळे, सहाय्यक निरीक्षक डॉ. शरद गोर्डे, राहुलकुमार पवार, सहाय्यक फौजदार कृष्णा वाघमारे, पोलिस हवालदार विष्णू घोडेचोर, पोलिस नाईक मनोज गोसावी, सुरज वाबळे आदींचे पथक पूर्णवेळ गुन्ह्याचा तपास करून दोषारोपपत्र तयार करण्याचे काम करीत होते. दिवसात कोपर्डीत तपास करणे व रात्री कागदपत्रांची जुळवाजुळव अशी कसोटी लागली होती.
कोपर्डीतील कायदा-सुव्यवस्थवेर पोलिस अधीक्षकांपासून सर्व वरिष्ठ अधिकारी, कर्जत पोलिस ठाणे लक्ष ठेवून होते. तर विशेष तपास पथक रात्रंदिवस फक्त तपासावर लक्ष केंद्रीत करून होते.

गावात किती गर्दी आहे, कोण काय स्टेटमेंट करतेय, टीव्हीला काय न्यूज चालली आहे, याकडे दुर्लक्ष करून हे तपास पथक जबाब नोंदविणे, पंचनामे, वैद्यकीय चाचण्या करण्यावर पूर्णपणे लक्ष केंद्रीत करून होते. फिर्यादीनुसार पुराव्यांची साखळी तयार करण्याचे काम तपास पथकाकडून सुरू होते. दुसरीकडून सामाजिक संघटनांकडून दररोज वेगवेगळ्या मागण्या सुरू होत्या. राजकीय विधाने सुरू होती. लवकरच दोषारोपपत्र दाखल करण्याचे दबाव सुरू होता. या सामाजिक दबावासोबतच पोलिस महासंचालक, अपर पोलिस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था), विशेष पोलिस महानिरीक्षकांकडून तेथील परिस्थितीचा अंदाज माहिती नसतानाच सामाजिक वातावरणावरून तपासाबाबत वेगवेगळ्या सूचना दिल्या जात होत्या. 

आरोपींच्या मानशास्त्रीय चाचण्याही घेण्यात आल्या. त्यातून खास काही निष्पन्न झालेले नव्हते. मुख्य आरोपी शिंदे याने पीडितेच्या अंगावर चावे घेऊन तिच्यावर बलात्कार केला, खून केला व साक्षीदारांच्या साक्षीवरून आरोपी संतोष भवाळ व नितीन भैलुमे हे त्याच्यासोबत पाळत ठेवण्यासाठी होते, त्याला प्रोत्साहन देत असल्याचे सिद्ध करण्याइतपत पुरावे पोलिसांकडे होते. आठवड्याभरात जबाब नोंदविण्याचे काम झाले होते. विविध चाचण्यांचे अहवाल येण्यास विलंब झाल्याने बाकीचे काम सुरू होते. 75 दिवसांत तपास पूर्ण झाला. परंतु, सर्व परिस्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पोलिस महासंचालक लक्ष ठेवून असल्याने दोषारोपपत्र दाखल झाले नव्हते. तत्कालिन पोलिस अधीक्षक डॉ. त्रिपाठी यांच्यासह तपास पथकाचे मुंबई दौरेही वारंवार सुरू होते. अखेर 90 दिवस पूर्ण होण्याच्या आदल्या दिवशी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.