Tue, Jun 25, 2019 15:31होमपेज › Aarogya › तोंडाचा कर्करोग का होतो?

तोंडाचा कर्करोग का होतो?

Published On: Feb 22 2018 1:21AM | Last Updated: Feb 21 2018 9:05PMगुटखा आणि तंबाखू खाल्ल्याने तोंडाचा कर्करोग होतो, हे आपण लहानपणापासून ऐकत आहोत. यासंदर्भात गावात, शहरात, राज्यात, देशात आणि जगभरात जनजागृती केली जाते. सिगारेटच्या पाकिटावरदेखील कर्करोगाची भयानकता दर्शविणारे चित्रही प्रसिद्ध करण्याचे बंधन आरोग्य विभागाने घातले असून त्याचेही काटेकोर पालन होते. मात्र, तंबाखू खाणार्‍यांचे आणि सिगारेट ओढणार्‍यांचे प्रमाण कमी होताना दिसून येत नाही. या व्यसनामुळे नागरिक स्वत:हून कर्करोगासारख्या आजाराला निमंत्रण देताना दिसून येतात. क्षणभराच्या नशेसाठी आणि तलफ भागवण्यासाठी तंबाखू, सिगारेटच्या आहारी जाणार्‍या मंडळींमुळे कुटुंबाचे किती नुकसान होते, ही बाब आकलनापलीकडची आहे. 

आजघडीला देशात दरवर्षी तोंडाच्या कर्करोगाची 75 ते 80 हजार नवीन प्रकरणे समोर येत आहेत. तोंडाच्या कर्करोगासंबंधी माहितीचा आणि आरोग्य सुविधांच्या अभावामुळे नागरिक अचूक आणि योग्य उपचारापासून वंचित राहतात. विशेषत: ग्रामीण भागात उपचाराची साधनी तोकडी असल्याने या आजाराची तीव्रता वाढलेली दिसून येते. तोंडाच्या कर्करोगापासून बचाव कसा करावा आणि त्याची लक्षणे काय आहेत, याबाबत माहिती येथे देता येईल.

विशेष म्हणजे भारतात तोंडाच्या कर्करोगाची प्रकरणे अधिक दिसून येतात. हा कर्करोग महिलाच्या तुलनेत पुरुषांना होण्याची शक्यता अधिक असते. तोंडाच्या कर्करोगाची ओळख ही सामान्य तपासणीतून होऊ शकते. मात्र, दुर्दैवाने तोंडाच्या कर्करोग्यांपैकी 65 ते 70 टक्के रुग्णांना शेवटच्या टप्प्यात या आजाराची माहिती कळते. यामागे अनेक कारणे असू शकतात. दरवर्षी जगभरात दोन लाखाहून अधिक नागरिकांचा मृत्यू हा तोंडाच्या कर्करोगाने होतो. एकट्या भारतात ही संख्या दरवर्षी 45 ते 50 हजार आहे. विशेष म्हणजे मध्यमवर्गीयांत या आजाराचे प्रमाण अधिक दिसून येते. एवढेच नाही तर दहा वर्षांपेक्षा कमी वयोगटातील मुलांनादेखील तोंडाचा कर्करोग झाल्याचे निदर्शनास आले आहे. 

कर्करोगाची कारणे :

तंबाखू :  तोंडाचा कर्करोग होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे तंबाखू सेवन होय. तंबाखू आणि सिगारेटच्या सेवनाने सुमारे 90 टक्के नागरिकांना तोंडाचा कर्करोग झाल्याचे प्रकार समोर आले आहे. एका आकडेवारीनुसार 15 ते 49 वयोगटातील 57 टक्के पुरुष आणि 11 टक्के महिला धूम्रपान करतात. भारतात बिडी, हुक्‍का, हुकली, घुमती याचा मोठा वापर होतो. दिवसभरात कितीतरी बिडी किंवा सिगारेट ओढल्या जातात. काही जण तर दिवसभरात सिगारेटचे पाकिटच्या पाकिट फस्त करतात. याशिवाय कितीतरी कमी वयाची मुले धूम्रपान करतात. झोपडपट्टीत राहणारे, हॉटेलमध्ये काम करणारे बालमजूर या व्यसनाला बळी पडतात आणि कर्करोगाला निमंत्रण देतात. पानमसाला, गुटखा, चघळल्या जाणार्‍या अन्य बाबी धूम्रपानच्या श्रेणीत येत नाहीत. मात्र, त्याची तलफ ही धूम्रपानपेक्षा अधिक आहे. तोंडाचा कर्करोग होण्यात बराच वेळ चघळण्यात येणारी तंबाखू आणि गुटखा हे महत्त्वाचे कारण मानले जाते. 

अल्कोहोल : तोंडाचा कर्करोग होण्यामागे हे एक प्रमुख कारण मानले जाते. धूम्रपान आणि मद्यसेवन या दोन्ही गोष्टी कर्करोग होण्याची जोखीम 30 टक्के वाढवण्याचे काम करतात. एका संशोधनानुसार जर धूम्रपान, दारू आणि तंबाखूचे सेवन सुरू ठेवले, तर तोंडाच्या कर्करोगाची शक्यता 123 पटीने वाढते. 

सुपारी : भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगला देश, तैवान आणि चीनमध्ये सुपारीचे भरपूर सेवन होते. सुपारीत एरेकोलाईन तत्त्व असल्याने कॅफिन, अल्कोहोल आणि निकोटिननंतर त्याचा उत्तेजक पदार्थात चौथ्या क्रमांक लागतो. तसे पाहिले तर सुपारीला पाचक म्हणून मानले जाते, मात्र सुपारीच्या आहारी जाणे चुकीचे ठरू शकते. 

तोंडाची निगा न राखणे : तोंडाचा कर्करोग होण्यामागे तोंडाची निगा योग्यरीतीने न राखणे हे कारण सांगितले जाते. यामुळे पुरुषात 32 टक्के आणि महिलांत 64 टक्के तोंडाचा कर्करोग होण्याची शक्यता बळावते. खराब फिटिंगचे डेंचर लावणे हे देखील कर्करोगाची जोखीम वाढवण्यास हातभार लावतात. 

खान-पानाच्या सवयी : लाल मीठ, प्रोसेस्ड उत्पादन आणि अधिक मसालेदार जेवणसुद्धा कर्करोगाचे प्रमाण वाढवण्यास हातभार लावते. कर्करोगाचे संकट कमी करण्यासाठी आहारात फळे, हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करावा. यात फायबरचे प्रमाण कमी राहते आणि नुकसान कमी होते. ग्रीन टीदेखील तोंडाचा कर्करोग रोखण्यासाठी मदत करू शकतो. 

लक्षणे :   औषध घेऊनही तोंडात अल्सर कमी न होणे  तोंडात लाल आणि पांढरे चट्टे दिसणे  सतत कान दुखणे  पाणी पिताना किंवा घास गिळताना त्रास होणे  दाताची पकड ढिली होणे किंवा डेंचरची फिटिंग खराब असणे  आवाज बदलणे  खालचे ओठ बधीर होणे  मानेत गाठ होणे

उपचाराची पद्धत : 
ऑपरेशन करणे गरजेचे आहे. रुग्ण कोणत्या स्टेजवर आहे त्यानुसार रेडिओथेरेपी आणि केमोथेरेपीची मदत घेतली जाते. या उपचारामुळे रुग्णाचा चेहरा काही प्रमाणात बिघडतो आणि त्यास बोलण्यास आणि गिळण्यास त्रास हातो. मात्र, यातून तो बाहेर पडू शकतो. आधुनिक प्लॅस्टिक अ‍ॅँड रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी, अ‍ॅनिस्थेशिया आणि इन्सेटिव्ह केअरच्या माध्यमातून चेहरा बरा करता येऊ शकतो. नवीन तंत्रज्ञानात लिक्‍विड बायप्सीदेखील प्रचलित आहे. 

लक्षात ठेवा
बायप्सीमुळे कर्करोग पसरत नाही. बायप्सीच्या प्रक्रियेदरम्यान त्याच्या विशिष्ट भागात सूज येते. मात्र, ती काही काळापुरतीच राहते. ट्यूमरचा प्रकार जाणण्यासाठी आणि उपचार व सर्जरीसाठी ही प्रक्रिया आवश्यक आहे. प्रारंभिक पातळीवर तोंडाच्या कर्करोगाची ओळख होणे आणि त्याच्या उपचाराची यशस्वीता ही 85 टक्के आहे. 

तंबाखू आणि अल्कोहोल सेवन बंद केल्याने तत्काळ कर्करोगाची जोखीम शून्य होत नाही. धूम्रपान करणार्‍या कोणत्याही व्यक्‍तीला सामान्य स्थितीत येण्यासाठी बराच कालावधी लागतो.  कमी निकोटिनची सिगारेटदेखील सुरक्षित नाही. याप्रमाणे हर्बल सिगारेटमध्येदेखील तंबाखू नसली तरी त्यात कार्बन मोनोऑक्साईड आणि टार असतो. एक तास हुक्‍का सेवन करणे हे शंभर सिगारेट ओढल्यासारखे आहे. 

डॉ. सुनिल जाधव