Fri, Jun 05, 2020 15:21
    ब्रेकिंग    होमपेज › Aarogya › computer वर काम करता? मग बातमी आपल्यासाठी!

computer वर काम करता? मग बातमी आपल्यासाठी!

Last Updated: Oct 12 2019 3:07PM

संग्रहित छायाचित्रविधिषा देशपांडे 

संगणकाच्या अतिवापरापायी डोळ्यांची उघडझाप करण्याचे प्रमाण कमी होणे, डोळ्यांत कोरडेपणा जाणवणे, डोळ्यांची आग होणे, थकवा जाणवणे, नजर कमी होणे आदी त्रासदायक लक्षणे प्रामुख्याने दिसून येतात. अशा कॉम्प्युटर व्हिजन सिन्ड्रोमवर उपाय काय?

आज आपण सगळेच संगणक युगात वावरत आहोत. त्याला पर्याय नाही, अशी आजची स्थिती आणि गती आहे. त्यामुळे या संगणकीय जगातले प्रश्‍न समजून घेऊन त्यापासून स्वत:ला दूर ठेवण्याची कसरत आपल्या सगळ्यांनाच करावी लागते आहे. संगणकाशी अन्योन्य पद्धतीने संबंधित असलेल्या डोळ्यासारख्या अवयवावर तर त्याचे दूरगामी परिणाम होत आहेत. हे परिणाम गुंतागुंतीचे आणि बहुपेडी आहेत. सातत्याने संगणकाच्या स्क्रीनवर लक्ष केंद्रित करून काम केल्याने नकळत डोळ्यांची उघडझाप करण्याचे प्रमाण कमी होणे, डोळ्यांतील अश्रुपटल कोरडे होऊन डोळ्यांत कोरडेपणा जाणवणे, डोळ्यांची आग होणे, थकवा जाणवणे, नजर कमी होणे आदी त्रासदायक लक्षणांनी त्रस्त झालेले अनेकजण डॉक्टरांचा सल्ला व उपचार घेत आहेत. संगणकाच्या अतिवापराने अश्रुपटल कोरडे होण्यासोबतच एका विशिष्ट अंतरावर सातत्याने नजर केंद्रित केल्याने डोळ्यांमधील बाहुलीचे स्नायू थकतात. त्यामुळेदेखील वरील त्रास जाणवायला सुरुवात होते. संगणकाच्या वापरामुळे डोळ्यांना होणार्‍या या त्रासाला कॉम्प्युटर व्हिजन सिन्ड्रोम म्हणतात.

हे टाळायचे किंवा या त्रासाची तीव्रता कमी करायची असेल तर दोन-तीन पद्धतींनी विचार करावा लागेल. एक म्हणजे मोबाईल किंवा संगणकाची स्क्रीन आणि डोळे यांमध्ये अंतर ठेवून शक्यतो काम करावे. हे अंतर काही वेळाने बदलत राहावे, जेणेकरून डोळ्यांवर शक्य तितका कमी ताण येतो. मोबाईल किंवा संगणकाच्या स्क्रीनचा प्रकाश (ब्राईटनेस) डोळ्यांना त्रासदायक ठरणार नाही इतका कमी ठेवावा. हा ब्राईटनेस अ‍ॅडजस्ट करण्याची सोय प्रत्येक मोबाईल व संगणकात असते. ती समजून घेऊन तिचा यथायोग्य वापर करावा.

दुसरी अगदी साधी, पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे- अंधारात संगणक, मोबाईल वापरू नयेत. अंधार असल्याने स्क्रीनकडे पाहताना डोळे अधिक ताठरले जातात आणि कोरडे पडण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे अंधारात संगणक, मोबाईलचा वापर करू नये. तसेच अंधारात टीव्हीदेखील पाहण्याचे टाळावे.

साधारणत: दिवसातून दोन-तीन तासांहून अधिक काळ संगणकासमोर बसून काम करणार्‍या व्यक्तींनी दर वीस-तीस मिनिटांनंतर चार-पाच मिनिटे डोळे बंद करून विश्रांती घ्यावी. हे शक्य नसल्यास कार्यालयाच्या खिडकीमधून लांबवर पाहावे. या काळात मोबाईल किंवा अन्य गॅझेट पाहू नयेत.

अगदी जाणीवपूर्वक संगणकावर काम करत असताना डोळ्यांची उघडझाप करावी. काम करण्याच्या ठिकाणी वातानुकूलित वातावरण असल्यास एसीचा झोत थेट चेहर्‍यावर येणार नाही याची काळजी घ्यावी. एसीचा झोत चेहर्‍याकडे येत असल्यास त्याची दिशा बदलावी, जेणेकरून त्यामुळे डोळ्यांना अजून कोरडेपणा येणार नाही.

या दैनंदिन सवयी बदलल्या तरी संगणकाशी संबंधित डोळ्यांचे आजार बर्‍यापैकी कमी होण्यास नक्कीच मदत होते. मग या संगणकीय युगात कॉम्प्युटर व्हिजन सिन्ड्रोमपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी एवढं करून पाहायला काय हरकत आहे?..