Wed, Jun 03, 2020 07:55होमपेज › Aarogya › मान अवघडल्यास किंवा दुखू लागल्यास 'हे' आहेत उपाय! 

मान अवघडल्यास किंवा दुखू लागल्यास 'हे' आहेत उपाय! 

Last Updated: Oct 12 2019 4:26PM

संग्रहित छायाचित्रडॉ. मनोज शिंगाडे

आडवे-तिडवे झोपल्यामुळे, हात दाबून झोपल्यामुळे, सोफ्यावर मागे मान टेकून झोपल्याने, खूप जास्त वेळ फोनवर बोलणे किंवा उंच उशी घेऊन झोपल्यामुळे मान आणि खांदे यामध्ये वेदना होऊ लागतात. वेदनांची समस्या निर्माण होते. शिवाय, अनेकदा स्नायू  किंवा नसांवर दबाव येतो. त्यामुळेही मान दुखते. काही लोकांना सर्व्हायकलची समस्या असल्याने शरीरामध्ये वेदना होत राहतात. मान आखडली किंवा वेदनांच्या समस्येने त्रस्त असाल तर काही सोप्या उपायांनी या वेदनांमध्ये आराम मिळू शकतो.

सर्वप्रथम मान अवघडण्याची कारणे कशी टाळता येतील, ते पाहू या! 

फोनवर बोलताना इअरफोन लावावे : खूप जास्त वेळ फोनवर बोलावे लागत असेल तर फोन हातात पकडून, गाल चिकटवून बोलण्यापेक्षा हेडफोन्स किंवा इअरफोन्स वापरावेत. त्यामुळे मोबाईलच्या रेडिएशनमुळे बचाव होईल. तसेच मान किंवा खांद्यांच्या वेदनांची समस्या भेडसावणार नाही. 

वाकून काम करू नका : ऑफिसमध्ये काम करताना कॉम्प्युटरवर काम करत असाल तर शरीर झुकवून काम करू नये. आपल्या कॉम्प्युटर स्क्रीनची उंची डोळ्याच्या उंचीइतकी ठेवावी. जेणेकरून शरीर आणि मान खालच्या बाजूला वाकू नये. वाकून काम केल्याने मानेच्या वेदना होतातच; पण भविष्यात मणक्याच्या हाडांशी निगडीत समस्या निर्माण होतात. 

उंच उशीचा वापर नको : झोपताना उंच उशीचा वापर करीत असाल तर मानदुखी होऊ शकतो. वेदना होत असल्यास झोपताना उशी घेऊ नये. उशी वापरायची असेल तर विशेष स्वरूपाच्या सर्व्हायकल उशांचा वापर करावा. ही उशीदेखील अतिउंच नसावी किंवा अतिपातळही नसावी. या उशीचा वापर करून मानेला आराम मिळाला पाहिजे. 

खुर्ची आणि सोफा यावर योग्य पद्धतीने बसा : खुर्ची आणि सोफ्यावर आडवे-तिडवे बसू नका. त्यामुळे मानेच्या समस्या होतात. खुर्ची किंवा सोफ्यावर बसताना योग्य पद्धतीने बसावे. शक्यतो कायम ताठ बसावे, तसेच खुर्चीवर एकाच पद्धतीने बराच काळ बसू नये. मानेच्या स्नायूंना आराम मिळण्यासाठी अधूनमधून थोडा वेळ आराम करावा, मानेचे व्यायाम करावेत. 

मान दुखू लागल्यास..

बर्फाने शेकावे : मानदुखीमध्ये बर्फाने शेकल्यास लवकर आराम पडतो. त्यासाठी बर्फाचे तुकडे कापडात बांधून वेदना होणार्‍या जागी शेकावे. त्यामुळे सूज कमी होते. मान दुखत असल्यास मानेचे लिंगामेेट आणि स्नायू यांनाच इजा होते. इजेपासून आराम मिळण्यासाठी मानेला आराम द्यावा. त्यामुळे इजा झाल्यानंतर कॉलरचा वापर करावा. जेणेकरून मान वळवताना लागणार्‍या झटक्यांपासून मानेचे संरक्षण करता येईल. 

मसाज आणि शेकणे : मानेच्या वेदना होत असतील तर कोमट तेलाने मालिश करावे. त्यामुळे आराम मिळतो. मालिश करताना नेहमीच मानेकडून खांद्याच्या दिशेने करावी. मालिश केल्यानंतर गरम पाण्याच्या पिशवी किंवा काचेच्या बाटलीत गरम पाणी भरून शेकावे. शेकल्यानंतर मोकळ्या हवेत जाऊ नये किंवा थंड पाणी पिऊ नये.