डॉ. वर्धमान कांकरिया
दरवर्षी ऑक्टोबर महिन्यातील दुसरा गुरुवार जागतिक दृष्टी दिन म्हणून पाळला जातो. यानिमित्ताने डोळ्यांच्या आरोग्याबाबत जनजागृती केली जाते. जगभरात लहान मुलांत, तरुणांमध्ये, काम करणार्या वर्गात बुब्बुळावर टीक पडून अंधत्व येणे, ही समस्या आढळून येते. भारतात सुमारे 25 लाख लोकांमध्ये अंधत्वाचे हे कारण असून जगात सर्वात जास्त अंध व्यक्ती भारतात राहतात. ज्या वयात काम करून राष्ट्र उभारणीत आपले योगदान द्यावे, त्या वयात या तरुणांनी समाजावर व राष्ट्रावर भार टाकावा, परावलंबी जीवन जगावे, ही गोष्ट देशासाठी भूषणावह नाही. या लोकांना नवी दृष्टी देण्यासाठी नेत्रदानाशिवाय पर्याय नाही.
आज जागतिक दृष्टी दिन. आपल्या जीवनात शरीरातील पाच ज्ञानेंद्रियांचे विशेष महत्त्व आहे. डोळा, नाक, कान, जीभ आणि त्वचा या पाच ज्ञानेंद्रियांमुळेच आपण जगातील सर्व गोष्टींचा अनुभव घेऊ शकतो. या ज्ञानेंद्रियांमध्ये डोळा हे सर्वात महत्त्वाचे ज्ञानेंद्रिय आहे. आपण सभोवतालच्या गोष्टींचे ग्रहण करण्यासाठी डोळ्यांचा 80 टक्के वापर करतो; परंतु अलीकडील काळात नेत्रविकारांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. दृष्टिदोषांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे किंवा अन्य काही कारणांमुळे दृष्टीहीन झालेल्यांची, अंधत्व आलेल्यांची संख्या मोठी आहे; परंतु अशा व्यक्तींना नेत्ररोपणाच्या साहाय्याने नवी दृष्टी मिळू शकते. यासाठी नेत्रदानाची चळवळ अधिक व्यापक करण्याची गरज आहे. आपल्या भारतीय संस्कृतीत दान देण्यास अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्या जवळील एखादी वस्तू ज्यांच्याकडे त्याची कमतरता आहे, अशा व्यक्तीस दान देण्यात जे आत्मिक समाधान लाभते, त्याची कल्पना करता येणार नाही.जुन्या काळी राजे, श्रीमंत, वगैरे धन, कपडे, अन्नदान करीत असत व गरीब लोकांचा दुवा घेत. आजच्या युगात लोकांचा जीव वाचविण्यासाठी ‘रक्तदान,’ अंध लोकांना दृष्टी प्राप्त होण्यासाठी ‘नेत्रदान,’ वैद्यकीय ज्ञानासाठी व संशोधनासाठी मरणोत्तर ‘देहदान,’ एखाद्या गरजू व्यक्तीस ‘किडनी दान’ इ. नवीन संकल्पना रूढ होत आहेत व यास अनन्यसाधारण महत्त्व आहे.
नेत्रदानाचा विचार करता, आजघडीला जगातील 8 कोटी अंध व्यक्तींपैकी भारतात जवळपास 1/4 अंधव्यक्ती भारतात आहेत. कुपोषण, ‘अ’ जीवनसत्त्वाचा अभाव, डोळ्यात कचरा अथवा रसायन गेल्यामुळे, गोवर, कांजिण्या किंवा इतर अन्य कारणांमुळे टीक पडून लहान वयात अथवा तारुण्यात दृष्टी गमावलेल्या रुग्णांची संख्या 25 लाखांपर्यंत आहे. यास Corneaopacity अथवा टीक अथवा फूल पडणे, असे म्हणतात. अशा व्यक्तीच्या आयुष्यासमोर किर्रर्र काळोख पसरलेला असतो. सभोवतालच्या जगाचा रंगीबेरंगी आस्वाद घेण्याचे भाग्य, पदोपदी ठेचकाळत या निराशेच्या अंधारात चालणार्या निष्पाप जिवांकडे नसते. यातील बर्याच नेत्ररुग्णांना बुब्बुळावरील आवरण जे पांढरे झाले आहे (कॉर्निया) त्याची शस्त्रक्रिया करून जर त्या जागी निरोगी पारदर्शक बुब्बळ बसवण्यात आले तर गेलेली दृष्टी बर्याच अंशी परत लाभू शकते.
सन 1924 साली अमेरिकेत अशी कल्पना सुचली व ती यशस्वी झाली आणि अंधकारात एका प्रकाशाचा झोत आला. या शस्त्रक्रियेस ‘नेत्ररोपण’ असे म्हणतात. मृत व्यक्तीने स्वेच्छेने केलेले नेत्रदान जिवंत व्यक्तींना डोळस बनवू लागले; परंतु दुर्दैवाने आजही ही चळवळ अंधाचे अश्रू पुसण्यासाठी फारच अपुरी आहे. जितक्या प्रमाणात नेत्रदान व्हावयास हवे तितकी जागृती आजही आपल्या समाजात आली नाही. भारतामध्ये दर वर्षी एक लाख डोळ्यांची गरज भासते; परंतु फक्त पन्नास हजार डोळे नेत्रदानामुळे उपलब्ध होतात. आज श्रीलंकेसारख्या देशात डोळे काढण्याचा अधिकार सरकारचा आहे. म्हणून श्रीलंका हा देश स्वत:ची गरज पूर्ण करून संपूर्ण जगात अतिरिक्त डोळे उपलब्ध करून देतो.
नेत्रदान म्हणजे कुणाही व्यक्तीने स्वच्छेने मृत्यूनंतर आपले डोळे काढून कुणाही परिचित किंवा अपरिचित व्यक्तीला दृष्टी मिळावी म्हणून अथवा संशोधनासाठी वापरावयास दिलेली परवानगी. कुणीही जाती-धर्म, वंशभेद, वर्णभेद, गरीब, श्रीमंत, स्त्री-पुरुष, लहान-मोठा मरणोत्तर नेत्रदान करू शकतो. वय साधारण 1 वर्षापुढे ते सुमारे 70-80 वर्षांपर्यंत. मृत व्यक्ती जर जाँडिस (Ineffective Hepatitis) व्हायरल मोनंनजायटिस, कॅन्सर, डोळ्यास पूर्वी काही शस्त्रक्रिया झाली असल्यास, एड्स, बुडून मृत्यू आल्यामुळे, फाशी घेतल्यामुळे इ. काही कारणे असू शकतात. म्हणून रुग्णांचे मृत्यू निदान (Death Certificate) डोळे काढण्यापूर्वी होणे आवश्यक आहे.
यासाठी आपण मरणोत्तर नेत्रदान करू इच्छिता याची आपल्या नातेवाईकांस माहिती द्यावी व आवश्यक ते फॉर्मस् जवळच्या नेत्रपेढीत भरून द्यावे. असे इच्छापत्र भरलेल्या रुग्णांचा मृत्यू झाल्यास त्याच्या जवळच्या नातेवाईकांनी लगेच मृत्यू कारणमीमांसा करून घ्यावी व जवळच्या नेत्रपेढीस कळवावे. मृत व्यक्तीचे डोळे बंद करून त्यावर बर्फाच्या पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात व अधूनमधून अँटिबायोटिक थेंबाची औषधे डोळ्यांत टाकावीत. खोलीतील पंखे बंद करावेत. यामुळे डोळे वाळणार नाहीत.
नेत्रपेढी (आय बँक) ही एक समाजसेवी संस्था असून ती मरणोत्तर नेत्रदानाची जपणूक करून गरजू रुग्णांना डोळे उपलब्ध करून देते. नेत्रदाता व गरजू रुग्ण यांची सूची तयार करणे, संपर्क साधणे, नेत्रदान घडवून आणणे व मिळालेल्या डोळ्याचा सांभाळ करणे व ते गरजूंना उपलब्ध करून देणे, नेत्रदानाबाबत चळवळ चालवणे, विविध संशोधन करणे. इ. प्रमुख कार्ये या संस्थेतर्फे केली जातात.
मृत्यूनंतर साधारण 4-6 तासांत डोळे काढणे गरजेचे असते. अशा डोळ्यांचे ‘नेत्ररोपण’ हे साधारणपणे 24-48 तासांत करावे लागते. अलीकडील काळात काही कल्चर मीडिया, लिक्वीड नायट्रोजन व अन्य रासायनिक प्रक्रियेमुळे महिना-दोन महिनेदेखील असे डोळे वापरता येतात. काढलेला डोळा हा संपूर्ण कधीच बसविला जात नाही. त्यातील बुब्बुळाचा भागच (कॉर्निया) फक्त बदलला जातो. सर्व गोष्टी योग्य प्रकारे घडल्यावर सर्वसाधारण 70 टक्के शस्त्रक्रिया यशस्वी होतात. जर दाता व गरजू दोन्हीही तरुण असल्यास व डोळे काढणे व शस्त्रक्रिया यात जास्त वेळ गेला नाही तर यशस्वितेचे प्रमाण सर्वाधिक असते. जर दाता व गरजू यांच्या पेशी एकमेकांस अनुरूप न झाल्यास (Tissue Rejection) अशा शस्त्रक्रिया अयशस्वी होऊ शकतात. एका व्यक्तीच्या नेत्रदानाने दोन अंध व्यक्तीस दृष्टी लाभ होतो.
बुब्बुळावर टीक पडून अंधत्व येणे ही समस्या दुर्दैवाने लहान मुलांत, तरुणांमध्ये, काम करणार्या वर्गात आढळून येते. भारतात सुमारे 25 लाख लोकांमध्ये अंधत्वाचे हे कारण असून जगात सर्वात जास्त अंध व्यक्ती भारतात राहतात. ज्या वयात काम करून राष्ट्र उभारणीत आपले योगदान द्यावे, त्या वयात या तरुणांनी समाजावर व राष्ट्रावर भार टाकावा. परावलंबी जीवन जगावे, ही गोष्ट देशासाठी भूषणावह नाही. या लोकांना नवी दृष्टी देण्यासाठी नेत्रदानाशिवाय पर्याय नाही; पण 25 लाख गरजू आणि नेत्रदान फक्त 35 ते 40 हजार हे फारच व्यस्त प्रमाण आहे. अंधश्रद्धा व अज्ञान यामुळे नेत्रदानाचे प्रमाण भारतात कमी आहे.
याबाबत आपण श्रीलंका या आपल्या शेजारील छोट्याशा देशाकडे पाहायला हवे. श्रीलंकेत मोठ्या प्रमाणात नेत्रदान होते. हा देश आपली गरज भागवून जगातील अनेक देशांना डोळे निर्यात करतो. म्हणूनच भारतामध्ये नेत्रपेढीच्या संख्येत वाढ व्हायला हवी; पण यासाठीच्या सुविधा अतिशय अपुर्या आहेत. आता नेत्रदान केलेल्या बुब्बुळाचे वेगवेगळे विभाग दोन किंवा अंध व्यक्तींना वापरता येतात. यावर जगात मोठ्या प्रमाणत संशोधन चालू आहे. भारतात याचे प्रमाण कमी आहे. नेत्रपेढ्या उभारण्यावर मोठा खर्च येतो. त्यासाठी सेवाभावी संस्थांनी पुढे यावे. सरकारनेही आर्थिक मदत करावी. या प्रकारचे अंधत्व गरीब लोकांमध्ये अधिक आहे. शस्त्रक्रियेचा खर्च त्यांना झेपणार नाही. त्यामुळेच सरकारने यासाठी काही आर्थिक मदत करण्याची गरज आहे. तरच व्यापक प्रमाणात ही मोहीम राबविता येईल.