Sun, Jul 21, 2019 16:55
    ब्रेकिंग    होमपेज › Aarogya › आवाज बसणे आणि आयुर्वेदीय उपचार

आवाज बसणे आणि आयुर्वेदीय उपचार

Published On: Sep 12 2018 1:48AM | Last Updated: Sep 12 2018 1:48AM1, 2 दिवस असल्यास जास्त त्रास न देणारा परंतु जास्त दिवस राहिल्यास अथवा वारंवार होऊ लागल्यास आपले काम बिघडविणारा एक विकार म्हणजे स्वभेद अर्थात आवाज बसणे. या विकारावरील आयुर्वेदीय उपचार वेळीच करून घेण्याची गरज असते. 

आवाज उत्पत्तीची क्रिया ही मुख्यतः स्वरयंत्राच्या स्वास्थ्यावर अवलंबून असते. त्यामुळे कोणत्याही कारणाने स्वरयंत्राच्या कार्यात बिघाड उत्पन्‍न झाल्यास अथवा स्वरयंत्राला आघात झाल्यास आवाज बसतो. कोणत्याही कारणाची अ‍ॅलर्जी अथवा जंतूसंसर्ग यामुळे स्वरयंत्राला सूज येणे हे कारण सामान्यपणे अधिक आढळून येते. याचबरोबर घशाला, श्‍वासनलिकेला सूज येणे, स्वरयंत्राला गाठ उत्पन्‍न होणे यामुळेही आवाज बिघडतो. अधिक मोठ्यांदा बोलणे, सातत्याने जास्त वेळ बोलणे, गायनाचा  जास्त रियाज, जास्त वेळ मोठ्यांदा रडणे, मोठ्यांदा हसणे, अतिथंड पदार्थ वारंवार खाणे यांसारख्या कारणांनी स्वरयंत्रावर ताण येऊन आवाज बिघडतो. काहीवेळा टी. बी.चा जंतूसंसर्ग हा हायपोथयरीइडीझम या विकारामुळे देखील आवाज बसतो. अतिप्रमाणात दम लागल्यानंतरही आवाज बिघडत असतो. स्वरयंत्राला आघात होणे, स्वरयंत्राच्या नाडीवर दाब उत्पन्‍न होणे, त्यामुळे स्वरयंत्राची हालचाल बिघडणे, पॅरालिसीस होणे यामुळेही आवाज बसतो. 

घसा, श्‍वासनलिका, थायराईड  ग्रंथी, अन्‍ननलिका यांच्या कॅन्सरच्या विकारांमुळे आवाज बसतो. थायराईडच्या ऑपरेशनमुळे आघात झाल्याने आवाज बसल्याचे काही रुग्ण आढळतात. अतिमद्यपानामुळे रक्‍तात विषाक्‍त परिणामामुळेही आवाज बसतो. 

स्वरभेदाचे प्रकार ः 

सामान्यपणे प्रत्यक्ष स्वरयंत्रालाच सूज आल्याने होणारा स्वरभेद आणि इतर विकारांच्या परिणाम स्वरूप होणारा स्वरभेद असे प्रकार केले जातात. आयुर्वेद शास्त्रामध्ये वातज, पित्तज, कफज, सनिपातिक, रक्‍तज, मेदज, पीनसज, कासज आणि क्षयज असे वर्गीकरण केलेले आहे. 

स्वरभेदावरील उपचार ः 

स्वरभेदावरील उपचार करताना कारणमीमांसा करणे महत्त्वाचे असते. स्वरयंत्राच्या विकृतीचे उपचार आणि त्याचबरोबर इतर विकारांमुळे उत्पन्‍न झालेला असल्यास त्या विकाराच्या उपचारांनाही महत्त्व असते. यासाठी काहीवेळा विशिष्ट तपासण्या करून घ्याव्या लागतात व त्यावरून मुख्य व्याधीचे निश्‍चित निदान करूनच उपचार केले जातात. 

स्वरभेदावरील आयुर्वेदीय उपचार ः 

रुग्णाचे वय, आहार, प्रकृती, व्यवसाय, बोलण्याचे प्रमाण, स्वर यंत्रावर ताण येणारी कारणे, पूर्वी झालेले इतर विकार, आवाज बसण्याबरोबरच होणारे इतर त्रास, इत्यादींची सखोल माहिती घेऊन स्वरभेद कोणत्या प्रकारचा आहे, त्याची निश्‍चिती करूनच उपचार सुरू केले जातात. स्वरभेदाचे  प्रमाण जास्त असेल, खूप दिवसाचे असेल, दोष प्रकोप जास्त असल्यास स्नेहन, स्वेदन, बस्ती, विरेचन, वमन हे पंचकर्म उपचार प्रथम करावे लागतात. पण ज्यावेळी स्वरभेद नुकताच उत्पन्‍न झाला असेल, दोष प्रकोप कमी असेल अशावेळी स्नेहन, स्वेदन, औषधी काढ्याने  चुळा भरणे अथवा गुळण्या करणे, आणि त्यासोबत औषधी उपचार असे स्वरूप असते. उपचारांसाठी यष्ठीमधू, कंकोळ, लवंग, वेलदोडा, दालचिनी, खदीर, हळद, वासा, कंटकारी, कटफल, गुग्गूळ, वंशलोचन, तालीसपत्र, इ. वनस्पती औषधींचा उपयोग केला जातो. अभ्रक भस्म, कुज्जली, शृंगभस्म यांचाही काहीवेळा वापर करावा लागतो. 
दोष प्रकोपानुसार वैद्य सल्ल्याने लवंगादी वटी, खदीरादीवटी, त्वक गुटी यांचा चघळण्यासाठी उपयोग करावा.

स्वरभेद असताना काय काळजी घ्यावी?

बोलण्याच्या क्रियेमुळे स्वरयंत्रावर ताण येत असल्याने शक्यतो बोलणे टाळावे कमीत कमी, हळू आवाजात कामापुरतेच बोलावे, मोठ्यांदा रडणे, हसणे, ओरडणे, दम लागेपर्यंत काम करणे, धुराशी संबंध, आईस्क्रिम, कोल्ड्रिंक्स बर्फ, मिल्कशेक, उघड्यावरील पदार्थ, तळलेले मसालेदार पदार्थ, अतिप्रमाणात वार्‍यातून प्रवास, या गोष्टी कटाक्षाने टाळाव्यात. 

आयुर्वेद उपचारांचे महत्त्व  : 

अनेकदा आवाज बसल्यानंतरही आधुनिक अँटिबायोटिक्स, स्टेरॉईडस इ. रासायनिक औषधे घेऊनही उपयोग होत नाही, असा अनुभव येतो. अशावेळी जास्त वेळ न घालवता नजीकच्या वैद्याच्या सल्ल्याने शास्त्रीय आयुर्वेद उपचार घेतल्यास या विकारात आश्‍चर्यकारक उत्तम उपयोग होतो. 

डॉ. आनंद ओक