मोबाईल थोडा लांबच ठेवा!

Last Updated: Nov 07 2019 2:06AM
Responsive image


प्रा. विजया पंडित

हल्ली मोबाईलविना दिवस सुना म्हणण्याची पद्धत रूढ होत आहे. आपण वेगाने इंटरनेट, मोबाईलचे व्यसनी होत आहोत. उठता-बसता, चालता-बोलता देखील स्मार्टफोन जवळ बाळगण्याची सवय असल्याचे पाहिला मिळते; पण आता स्मार्टफोन बेडरूमपर्यंत येऊ लागले आहेत. झोपण्यापूर्वी खूप वेळ व्यक्‍ती चॅटिंग करते किंवा व्हिडीओ पाहते. त्याचा परिणाम आपल्या डोळ्यांवर आणि मेंदूवर सातत्याने होत असतो. अर्थात तोपर्यंतही ठीक होते; पण हल्ली लोक स्मार्टफोन घेऊनच झोपतात. डोक्यापाशी किंवा उशाखाली फोन ठेवून झोपण्याची सवय आपल्यापैकी बहुतेकांना जडली आहेच. त्याचे दीर्घकालीन दुष्परिणाम आहेत. ब्रिटनसह जगातील अनेक विद्यापीठांमध्ये मोबाईल फोन आणि त्याने उत्सर्जित होणारा किरणोत्सर्ग याच्या धोक्यावर अहवाल तयार झाले आहेत. त्याचे खूप भयानक परिणाम समोर येणार असल्याचे संकेत या अहवालात दिले आहेत. 

स्मार्टफोनचा जीवनशैलीवर परिणाम होतो आहेच; पण आरोग्यासाठीही तो धोकादायक आहे. स्मार्टफोनचा अतिवापर आरोग्याच्या समस्यांचे कारण ठरतो आहे. त्याविषयी काही शंका आणि वास्तविकता यांच्याविषयी जाणून घेऊया. 

नपुंसकतेचा धोका ः 2014 सालामध्ये ब्रिटनच्या एक्झिटर विद्यापीठाने केलेल्या एका संशोधनामध्ये स्मार्टफोन्समधून निघणारी इलेक्ट्रोमॅग्‍नेटिक विकिरणांचा थेट संबंध नपुंसकतेशी असल्याचे स्पष्ट झाले होते. संशोधकांनी असा इशाराही दिला होता की, पँटमध्ये स्मार्टफोन ठेवल्यास पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या कमी होतेच; पण बीज फलित होण्याची क्षमताही कमी होते. 

कर्करोगाची शक्यता ः आंतरराष्ट्रीय कर्करोग संशोधन संस्थेने मोबाईल मधून निघणार्‍या इलेक्ट्रोमॅग्‍नेटिक विकिरणांना कर्करोगकारी घटकांच्या श्रेणीत ठेवले आहे. मोबाईल फोनचा अतिवापर केल्यास मेंदू आणि कान यांच्यामध्ये ट्यूमर होण्याचे कारण ठरू शकते. त्यामुळे भविष्यात ते कर्करोगाचे काऱण ठरू शकतात. 

फोन फुटण्याचा धोका ः अनेकदा मोबाईल फोन्स अचानक तापून फुटतात, अशा अनेक बातम्याही आपण ऐकतो. फोन फुटल्याने लोक जखमी होतात, हातात असताना फुटल्यास हातावर कायमस्वरूपी डाग राहतो. त्यामुळे फोन चार्जिंगला लावताना तो लांब असावा. झोपतानाही मोबाईल लांब ठेवून झोपावे. 

अनिद्रेची समस्या ः इस्राईलच्या हाईफा विद्यापीठाने 2017 सालामध्ये केलेल्या संशोधनाने असे सांगितले आहे की, झोपण्यापूर्वी 30 मिनिटे फोन बंद करून ठेवावा. त्यामुळे झोप पूर्ण होते. संशोधकांच्या मते, कॉम्प्युटर आणि टी.व्ही. स्क्रीनमधून निघणारा निळा प्रकाश झोपेच्या हार्मोन्सचे म्हणजे मेलाटोनिनचे उत्पादन थांबवतात. त्यामुळे व्यक्‍तीला झोप लागत नाहीच; पण सकाळी उठल्यावर थकवा, अशक्‍तपणा, जडपणा यांचाही त्रास होतो. थोडक्यात काय तर आपल्या आरोग्यासाठी मोबाईललाही थोडी विश्रांती द्या.