Fri, Dec 13, 2019 19:36होमपेज › Aarogya › पावसाळ्यातील आजारांना ठेवा दूर

पावसाळ्यातील आजारांना ठेवा दूर

Published On: Jun 20 2019 2:05AM | Last Updated: Jun 20 2019 2:05AM
डॉ. प्रशांत बोराडे

पावसाळा सुरू झाला, की त्रासदायक उष्म्यापासून दिलासा मिळतो; पण या ऋतूमध्ये प्रतिकारशक्ती कमी होते, हे तुम्हाला माहीत आहे का? आरोग्याच्या दृष्टीने अस्वच्छ झालेल्या वातावरणामुळे आणि प्रतिबंधक उपाययोजना न केल्यामुळे विविध प्रकारचे आजार होण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे लवकर निदान आणि उपचार केल्यास हे आजार दूर ठेवता येतात.
पावसाळ्यात सामान्यपणे होणारे आजार आणि ते हाताळण्याच्या काही टिप्स पुढीलप्रमाणे आहेत.

डेंग्यू : जागतिक आरोग्य संघटनेनुसार (डब्ल्यूएचओ) डेंग्यूची जगभरात अनेक ठिकाणी साथ असते. हा आजार डास चावल्यामुळे होतो. त्यामुळे फ्ल्यूसारखा आजार होतो आणि याने गंभीर स्वरूप धारण केले, तर तो प्राणघातक ठरू शकतो. स्नायूंमध्ये आणि सांध्यांमध्ये वेदना होणे, शरीरावर पुरळ उठणे, निघून जाणे, पुन्हा उठणे, खूप ताप, डोकेदुखी, डोळ्यांमागे वेदना, उलट्या आणि मळमळ ही डेंग्यूची लक्षणे आहेत. तुमचे डॉक्टर या आजारासाठी तुम्हाला औषधे लिहून देतील. डास घालविणारी साधने वापरावीत. या आजारासाठी कारणीभूत ठरणार्‍या एडीस डासांची वाढ स्वच्छ, साचलेल्या पाण्यात होते. त्यामुळे बादल्या आणि पाण्याच्या पिंपांच्या झाकणांवर पाणी साचणार नाही याची खातरजमा करा आणि झाडे लावलेल्या कुंड्यांच्या खालच्या थाळीतील अतिरिक्त पाणी काढून टाका. 

मलेरिया : हा परजीवीमुळे होणारा विकार असतो. हा परजीवी डासाच्या चाव्यातून तो माणसांच्या शरीरात जातो. ताप, हुडहुडी भरणे, डोकेदुखी, मळमळ व उलट्या, स्नायूमध्ये वेदना व थकवा, घाम येणे, छातीत किंवा पोटात दुखणे आणि खोकला येणे ही मलेरियाची लक्षणे आहेत. डास असलेल्या ठिकाणी मलेरियारोधक औषधे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून घ्यावीत. 

मलेरिया प्रतिबंधक उपाय : डासांची वाढ होऊ नये यासाठी सांडपाणी साचू देऊ नये आणि पूर्ण कपडे परिधान केल्याशिवाय बाहेर पडू नये. 

चिकनगुनिया : हा विषाणू डासांमार्फत फैलावतो. हा संसर्गजन्य रोग नाही. विषाणू असलेला डास चावल्याच्या 3-7 दिवसांनंतर या रोगाची लक्षणे दिसू लागतात. ताप व सांधेदुखी ही या रोगाची सामान्यपणे दिसून येणारी लक्षणे आहेत. त्याचप्रमाणे डोकेदुखी, स्नायूंमध्ये वेदना, सांध्यांना सूज येणे किंवा पुरळ उठणे हीसुद्धा लक्षणे दिसून येतात. तुमचे डॉक्टर तुमची तपासणी करून तुम्हाला औषधे लिहून देतील. या आजाराला प्रतिबंध करण्यासाठी पूर्ण बाह्यांचे शर्ट आणि पूर्ण लांबीच्या पँट्स घालाव्यात. वातानुकूलित यंत्रणा किंवा खिडक्यांना जाळ्या नसलेल्या ठिकाणी तुम्ही असाल तर मच्छरदाणी वापरावी. 

कावीळ : या आजारात त्वचेला पिवळी झाक येते. डोळ्यांमध्ये पिवळसरपणा दिसतो आणि मूत्रसुद्धा पिवळे असते. बिलिरुबिन हा रक्तातील अनावश्यक घटक साचल्यामुळे होणारा हा आजार आहे. यकृताला सूज आली किंवा पित्तवाहिनीमध्ये अडथळा निर्माण झाल्यास कावीळ आणि संबंधित आजार होतात. या आजारात त्वचा आणि डोळ्यांमधील पांढरा भाग पिवळसर दिसतो. मूत्र गडद रंगाचे होते आणि खाज सुटते. या आजाराच्या कारणानुसार उपचार केले जातात. 

प्रतिबंधक उपाय : सकस व संतुलित आहार घेऊन यकृत निरोगी ठेवावे. मद्यसेवन मर्यादित असावे आणि दररोज व्यायाम करावा. 

गॅस्ट्रोएंटरायटिस (स्टमक फ्लू) :  या आजारात विषाणू, जीवाणू किंवा परजीवीमुळे आतड्यांना सूज येते. त्यामुळे अतिसार आणि उलट्या होतात. जीवाणू किंवा व्हायरल टमी बगमुळे हा आजार होतो. पावसाळ्यात गॅस्ट्रोएंटरायटिस आणि अन्नातून विषबाधा होणे मोठ्या प्रमाणावर आढळते. अचानक जुलाब सुरू होणे, अशक्त वाटणे, उलट्या होणे, हलका ताप येणे, भूक मंदावणे, पोट बिघडणे, हाता-पायांत वेदना होणे आणि डोकेदुखी ही या आजाराची लक्षणे आहेत. डिहायड्रेशन आणि ताप कमी करण्यासाठी मुख्यत: उपचार करण्यात येतात. रुग्णाच्या परिस्थितीनुसार प्रतिजैविके देण्यात येतात. 

प्रतिबंधक उपाय : हायड्रेटेड राहा आणि सकस आहार घ्या, ज्यात दही आणि केळे व सफरचंदासारख्या फळांचा समावेश असेल. सॅलड खाणे टाळा. कारण, त्यातील भाज्या धुतलेल्या आहेत, स्वच्छ केलेल्या आहेत आणि योग्य तापमानात ठेवलेल्या आहेत, हे समजण्याचा काही मार्ग नसतो. रस्त्यांवर मिळणारे खाद्यपदार्थ पूर्णपणे वर्ज्य करा. कारण, त्यात दूषित पाणी असू शकते आणि अतिसाराची सुरुवात होऊन परिस्थिती गंभीर होऊ शकते. 

कॉलरा : हा संसर्गजन्य रोग आहे. यात जुलाब होतात आणि डिहायड्रेशन होते. वेळीच उपचार न केल्यास हा आजार जीवावर बेतू शकतो. व्हायब्रो कॉलरे हा जीवाणू असलेले पदार्थ खाल्ल्यामुळे किंवा पाणी प्यायल्यामुळे हा आजार होतो. डिहायड्रेशन झाल्यामुळे हृदयाच्या ठोक्यांची गती वाढते, त्वचेची तन्यता कमी होते, रक्तदाब कमी होतो. तहान लागते आणि स्नायूंमध्ये गोळे येतात. तुम्हाला कॉलरा झाला असेल तर ताबडतोब डॉक्टरशी संपर्क साधा. 

प्रतिबंधक उपाय : उकळलले पाणी प्या, दूषित पाणी टाळा आणि हाताची आणि आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असलेली स्वच्छता राखा. 

टायफॉईड : सॅल्मोनेला टायफी या जीवाणूमुळे होणारा हा आजार होतो. या आजारात खूप ताप येतो, अतिसार होतो आणि उलट्या होतात. दूषित रक्त आणि पाण्यावाटे या आजाराचे संक्रमण होते. ज्या ठिकाणी हात धुण्याची सवय नसते, त्या ठिकाणी या आजाराचे प्रमाण अधिक असते. आपल्याला या जीवाणूची लागण झाली आहे, हे माहीत नसलेल्यांकडूनही या आजाराचा फैलाव होऊ शकतो. अशक्तपणा, पोटात वेदना होणे, बद्धकोष्ठता आणि डोकेदुखी ही टायफॉईडची लक्षणे आहेत. तुमचे डॉक्टर तुम्हाला प्रतिजैविके देऊ शकतात. 

प्रतिबंधक उपाय : शुद्ध पाणी प्या, आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छता राखा आणि हात नियमितपणे धुवून स्वच्छ ठेवा.

तात्पर्य : जीवाणूचा फैलाव होऊ नये म्हणून वेगवेगळे टॉवेल वापरावेत. खोकताना किंवा शिंकताना नाकावर आणि तोंडावर रुमाल ठेवावा. फंगल स्किन इन्फेक्शन (बुरशीमुळे होणारा संसर्ग) होऊ नये, यासाठी कपडे कोरडे ठेवावेत. पावसाळ्यात घरी तयार केलेले ताजे अन्न खावे आणि रस्त्यावर मिळणारे पदार्थ वर्ज्य करावेत. चित्रपटगृहे किंवा प्रदर्शनासारखी गर्दीची ठिकाणे टाळावीत आणि हँड सॅनिटायझर्सनचा नियमित वापर करावा.