Fri, Dec 13, 2019 18:27होमपेज › Aarogya › रोगनिवारणासाठी जलचिकित्सा

रोगनिवारणासाठी जलचिकित्सा

Published On: Aug 01 2019 1:22AM | Last Updated: Aug 01 2019 1:22AM
डॉ. भारत लुणावत

आजारी पडलो की आपण लगेचच डॉक्टरकडे औषधोपचारासाठी धाव घेतो. अर्थात, काही वेळा घरगुती उपायही त्यावर लागू होतात. आपल्याकडे विविध नैसर्गिक उपायांनी रोगोपचार करण्याची पद्धत ऋषीमुनींच्या काळापासून चालत आलेली आहे. अंघोळ हेदेखील रोगनिवारणाचे साधन होऊ शकते, असा विचार आपण कधी केला आहे का? पण, नेहमीच्या अंघोळीव्यतिरिक्त  स्नानाचे विविध प्रकार आहेत. त्याचा प्रभाव लवकर पडतो आणि मोठमोठे रोग त्यामुळे बरे होण्यास मदत होते. 

व्यक्ती आजारी पडली, की त्यावर औषध घेणे हा उपाय सर्वमान्य आहेच; पण आयुर्वेदात किंवा नैसर्गिक उपचारांमध्ये विविध प्रकारच्या स्नानांचा वापर विकार बरे होण्यासाठी केला जातो. या स्नानांचा लवकर उपयोग होतो आणि मोठ्या आजारांमध्ये किंवा विकारांमध्ये थोड्या काळात त्याचा प्रभाव जाणवतो. 

कटिस्नान किंवा हिपबाथ ः नावाप्रमाणेच कंबरेइतक्या पाण्यातच हे स्नान करायचे असते. त्यासाठी बाजारात विशिष्ट पद्धतीने टबही मिळतात. या टबचा मागचा भाग खुर्चीप्रमाणे असतो ज्याचा पाठीला आधार मिळतो. हे स्नान करताना रुग्णाला पूर्ण कपडे काढून बसावे लागणार असते. दोन्ही पाय बाहेर असतात आणि केवळ नाभीच्या खालपर्यंतचा म्हणजे कटिप्रदेशापर्यंतचा भागच पाण्यात असतो. पाण्यात बसून हाताने मांड्या, जांघा, कंबर चोळावी. यात व्यक्तीला सहन होईल इतकेच पाणी असावे. रुग्ण जर अशक्त असेल किंवा थंडीचा मोसम असेल, तर कंबरेचा वरचा भाग कांबळ्याने झाकून घ्यावा. सुरुवातीला हे स्नान पाच ते दहा मिनिटेच करावे. त्यानंतर हळूहळू हा कालावधी अर्धा तासापर्यंत वाढवू शकतो. 

मेरूडदंड स्नान ः अर्थात मणक्यावर पाणी टाकणे. हे स्नान करताना नळाखाली असे बसावे की मणक्यावर नळाची धार सुटेल किंवा दुसर्‍या पद्धतीत टॉवेल पाण्यात भिजवून त्याने मणक्यावर जोर लावून घासले पाहिजे. 

या दोन्ही स्नानांनंतर शरीराचा काही भाग ओला होतो. तो स्वच्छ कोरडा पुसावा. एकुणात शरीराला उष्णता मिळावी म्हणून काही वेळ फिरावे किंवा हलका व्यायाम करावा किंवा ऋतुमान चांगले असेल तर थोडा वेळ उन्हात उभे राहावे. 

कटिस्नान ः पोटाच्या काही समस्या जसे पोट जड असणे किंवा बद्धकोष्ठता यामध्ये कटिस्नानाचा उपचार केला जातो. कारण, पोटाच्या समस्येत शरीरातील दोषविकार हे खालच्या बाजूला जमा झालेले असतात. कटिस्नान म्हणजे कंबरेपर्यंतच्या भागावर त्याचे उपचार होतात. पोटाचे दोषविकार दूर होण्यासाठी कटिस्नान केल्याने या भागात चैतन्य येते. त्यामुळे शरीरातील जुना, सडलेला मल सुटण्यास मदत होते. केवळ कटिस्नानाने समस्या सुटणार नसेल किंवा अधिक कठीण अवस्था असेल तर कटिस्नान आणि एनिमा दोन्हीचा प्रयोग एकत्र केला जातो. त्यामुळे शरीरशुद्धी लवकर होते. पुरुष आणि स्त्रिया यांच्यामध्ये अवयवाचा पुढील भाग नाडी परीक्षा विज्ञानातील संपूर्ण स्नायविक नाडी केंद्र म्हणजे नाडी केंद्र मानले गेले आहे. कटिस्नान केल्यामुळे नाडीच्या या केंद्राला शीतलता मिळते. शरीरातील हानिकारक उष्णता शरीराबाहेर टाकून संपूर्ण शरीराला ऊर्जा, स्फूर्ती मिळते. शरीरात जे ज्ञानतंतू असतात, तेही मणक्यांमधून जातात. त्यामुळे मणक्यांवर पाण्याची धार किंवा कापडाच्या पट्टीने थंडावा प्रदान केल्यानंतर मेंदूला आलेली निष्क्रियता दूर होते. ओली चादर गुंडाळण्याचा प्रभाव संपूर्ण शरीरावर पडतो. ताप, गोवर, कांजिण्या, दमा, क्षयरोग, सूज, खाज इत्यादी रोगांवर कटिस्नानाचा सकारात्मक प्रभाव दिसून येतो. 

वाफेचे स्नान ः थंड आणि गरम पाणी यांचे स्नान करून अनेक विकार दूर करू शकतो, तसेच वाफेचा वापर करूनही अनेक विकार दूर करू शकतो. संपूर्ण शरीरात काही विकार जडला असेल, तर रुग्णाला दोरीने विणलेल्या खाटेवर झोपवतात. मग खाटेखाली उकळत्या पाण्याची तीन पातेली ठेवावीत. रुग्णाच्या अंगावर उबदार मोठे रग किंवा कांबळे अशा प्रकारे टाकावे की संपूर्ण खाट तोंडाचा भाग वगळता झाकली जाईल. जेणेकरून वाफ बाहेर पडू शकणार नाही. असे केल्याने व्यक्तीला खूप घाम येतो आणि घामावाटे अनेक विकार शरीराबाहेर टाकले जातात. त्यामुळे संपूर्ण शरीरात काही विकार उद्भवले असतील, तर त्या दोषांची शुद्धी होते. 

हे झाले संपूर्ण शरीरासाठीचे; पण एखाद्या अवयवालाच वाफ द्यायची असेल, तर वाफ येणार्‍या भांड्यावर तो अवयव धरावा. वरून एखादे कापड टाकावे जेणेकरून भांडे आणि शरीर झाकले जाईल. जे अवयव असे वाफेवर धरणे शक्य नाही, त्यांना शेक देण्यासाठी अंगावर सुती कापड टाकावे. पाण्यात उबदार किंवा लोकरीचे कापड टाकून पिळून ते वेदना होणार्‍या अवयवावर कपड्यावर ठेवावे. कापड थंड होऊ लागले, की दुसरे कापड पाण्यात पिळून ठेवून वाफ द्यावी. अंगावर आधी सुती कापड टाकल्याने गरम शेक घेताना अंगाला गार हवा लागू नये. तसेच लोकरीचे कापड वापरत असू तर त्याचा थेट त्वचेला चटका बसू शकतो. त्यामुळे सुती कापड त्वचेवर ठेवूनच अशा प्रकारचा शेक द्यायला पाहिजे. 

या सर्व स्नानांच्या पद्धतीत परिस्थितीनुसार काही बदल करू शकतो; पण रुग्णाच्या दुखर्‍या अवयवाला वाफेने शेकल्यास त्याचे फायदे जरूर होतात. गरम पाण्याचे स्नान, वाफेचे स्नान केल्यानंतर थंड पाण्याने अंघोळ करावी. त्यामुळे रक्ताभिसरणाची गती योग्य राहाते. 

थंड पाण्याची प्रतिक्रिया ः वरील सर्व प्रकारच्या स्नानांचा फायदा होतो. कारण, थंड पाण्याची प्रतिक्रिया. जेव्हा आपण उघड्या अंगावर पाणी उडवतो तेव्हा शिरशिरी येते आणि अंगावर काटा येतो आणि रक्ताभिसरणाचा वेग वाढतो. अशाच प्रकारे ही विविध स्नाने, पट्ट्या ठेवणे यामध्ये शरीराला थंड पाण्याचा स्पर्श होतो. त्यामुळे पहिले काम होते, ते म्हणजे शरीरातील उष्णता कमी होते. मग उष्णतेची कमतरता पूर्ण करण्यासाठी रक्ताभिसरणाचा वेग त्या दिशेने वाढू लागतो. रक्ताभिसरणाचा वेग वाढल्यानंतर दूषित विजातीय द्रव्य वाहून मलाशयाच्या दिशेने जातात. पाण्याच्या प्रभावामुळे रोगांचे निवारण होते आणि जे अवयव सुस्तावलेले तसेच शक्तीहीन होतात, त्यांना नवी ऊर्जा मिळते. 

बहुतांश रोगांचे मूळ हे पोटाच्या आरोग्याशी निगडित असते. बद्धकोष्ठता, जड पोट हे अनेक विकारांचे मूळ आहे. त्यामुळे पोटाच्या खालच्या भागातच दोषांचे मूळ असते. कटिस्नान केल्याने पोटाचा हा खालचा भाग उत्तेजित होतो किंवा त्याला ऊर्जा मिळते. त्यामुळे जुनाट आणि कुजलेला मळ बाहेर पडण्यास मदत होते.