हिमोग्लोबिन आणि आरोग्य

Last Updated: Mar 18 2020 8:57PM
Responsive image


डॉ. मनोज कुंभार

बोनमॅरोमधील रंगपेशींना लोह आणि ऑक्सिजनचा पुरवठा करणारे रंगद्रव्य म्हणजे हिमोग्लोबिन. याचा रंग लाल असतो. हिमोग्लोबिन म्हणजे प्रथिनांचे एक जटिल रूप आहे. ज्यामध्ये 96 टक्के ग्लोबिन आणि 4 टक्के हिम असते. 

हिमोग्लोबिनचे कार्य ः फुफ्फुसांतून उतींना ऑक्सिजन पुरवणे आणि उतींमधून कार्बनडायऑक्साईड फुफ्फुसांमध्ये पोहोचवणे हे हिमोग्लोबिनचे महत्त्वाचे कार्य आहे. हिमोग्लोबिनमधला हिम हा भाग 
फुफ्फुसांतील ऑक्सिजनचे परिवर्तन ऑक्सिहिमोग्लोबिनमध्ये करते. उतीमध्ये हे ऑक्सिहिमोग्लोबिन पोचल्यावर ऑक्सिजनचा दाब जिथे कमी असेल आणि कार्बनडायऑक्साईडचा दाब वाढला असेल तिथून ऑक्सिजन मुक्‍त होतो. त्यानंतर कार्बनडायऑक्साईडबरोबर संयोग होऊन फुफ्फुसांपर्यंत पोहोचतो. त्यानंतर कार्बनडायऑक्साईट वेगळा होतो आणि उच्छ्वासाद्वारे शरीराबाहेर पडतो. हिमोग्लोबिनमार्फत ऑक्सिजन घेणे आणि सोडणे ही प्रक्रिया सतत सुरू असते.

हिमोग्लोबिनशी निगडीत समस्या

* सामान्यपणे रक्‍ताल्पता, पोषण कमी, रक्‍तवाहिन्यांच्या समस्या, ट्युमर आदी समस्या हिमोग्लोबिनच्या पातळीशी निगडित असतात. 
* रक्‍ताल्पता हा हिमोग्लोबिनशी निगडित रोग सामान्यपणे पाहायला मिळतो. 

रक्‍तामधील हिमोग्लोबिनचे प्रमाण

पुरुष ः  14 ते 17 ग्रॅम प्रति 100 मिली
स्त्री ः  13 ते 15 ग्रॅम प्रति 100 मिली
लहान मुले ः 14 ते 20 ग्रॅम प्रति 100 मिली

हिमोग्लोबिन वाढण्यासाठी 

दिवसाकाठी एक सफरचंद खाल्ल्यास हिमोग्लोबिनचे प्रमाण कायम राहते. लीची हे फळ आरोग्यास अतिशय लाभदायक आहे. लीचीमध्ये बीटा कॅरोटीन, राईबोफ्लेबिन, नियासीन आणि फॉलिक अ‍ॅसिड किंवा बी जीवनसत्त्वाचे प्रमाण जास्त असल्यामुळे रक्‍तपेशी वाढतात, तसेच पचनही सुलभ होते. लाल रक्‍तपेशींच्या वाढीसाठी ही जीवनसत्त्वे शरीरास मिळणे अत्यावश्यक आहेत. 

आहारात बीटाचा समावेश अवश्य करावा. त्यामुळे हिमोग्लोबिनची पातळी वाढते. त्यात फॉलिक अ‍ॅसिड, आयर्न, तंतुमय पदार्थ आणि पोटॅशिअमचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे लाल रक्‍तपेशींची संख्या वाढते. त्याशिवाय डाळिंबामध्येही लोह आणि कॅल्शियमसह प्रथिने, कार्बोहायड्रेट आणि तंतुमय पदार्थ यांचे प्रमाण जास्त असते. घरात वापरला जाणार गूळ हादेखील हिमोग्लोबिन वाढवण्याचा उत्तम उपाय आहे. गुळामध्ये लोह आणि फॉलिक अ‍ॅसिडसह इतरही बी जीवनसत्त्वाचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे लाल रक्‍तपेशींचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढते. नियमित व्यायामामुळे शरीर स्वतःच हिमोग्लोबिनची निर्मिती करते. कॉफी, चहा, कोकाकोला, वाईन, बीअर यांच्यामुळे शरीरात लोह शोषण्याचे प्रमाण कमी होते. हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असेल तर या पदार्थांचे सेवन कमी करा. क जीवनसत्त्वाची कमतरता असेल तर हिमोग्लोबिनची पातळी खालावू शकते. कारण, सी जीवनसत्त्वाची कमतरता असेल तर लोह शोषले जात नाही. त्यामुळे सी जीवनसत्त्व असणारे पदार्थ खाल्ल्यास हिमोग्लोबिनची पातळीत वाढ होते. 

आपल्या आहारात पोषण तत्त्वांची कमतरता असल्यास हिमोग्लोबिनच्या पातळीत झपाट्याने घट होते. त्यासाठी प्रथिने आणि लोह हे घटक असणार्‍या पदार्थांचे सेवन करावे. अंडे, डाळ, ज्यूस यांचे नियमित सेवन केल्यास रक्‍ताल्पता कमी होते. धूम्रपान आणि दारू पिणे या गोष्टींपासून दूर राहिल्यास हिमोग्लोबिनची पातळी राखता येते. सकाळच्या ताज्या स्वच्छ हवेत व्यायाम केल्यासही आरोग्य चांगले राहते. वजनाच्या प्रमाणात माणसाच्या शरीरात लोहाचे प्रमाण हे तीन ते पाच ग्रॅम असते; पण हे प्रमाण कमी झाले तर शरीराला हिमोग्लोबिनची कमतरता भासते. त्यामुळे शरीरातील पेशींना मिळणारा ऑक्सिजन कमी होतो. त्यामुळे शरीराराला पुरेशी ऊर्जा मिळत नाही. त्यामुळे व्यक्‍ती अ‍ॅनिमियाग्रस्त होते. त्याशिवाय बी 12 जीवनसत्त्वाची कमतरता आणि फॉलिक अ‍ॅसिडची कमतरता असल्यासही व्यक्‍ती अ‍ॅनिमियाग्रस्त होते. पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये अ‍ॅनिमियाचे प्रमाण जास्त असते. लवकर थकवा येणे, चक्‍कर येणे, त्वचा पिवळी पडणे, सततची डोकेदुखी ही अ‍ॅनिमियाची लक्षणे असतात. 

अ‍ॅनिमिया किंवा रक्‍तपांढरीवर घरगुती उपाय

पालक ः पालकामध्ये बी 12 हे जीवनसत्त्व आणि लोहाचे प्रमाण जास्त आहे. तसेच फॉलिक अ‍ॅसिडचाही तो मोठा स्रोत आहे. त्यामुळे पालकाचे सेवन केल्यास रक्‍ताची कमतरता भरून निघते. पालक सूप, पालकाची भाजी यांचा रोजच्या आहारात समावेश केला पाहिजे. 

डाळिंब ः डाळिंब खाल्ल्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वेगाने वाढते. कार्बोहायड्रेट आणि प्रथिने यांचे प्रमाण डाळिंबामध्ये खूप जास्त असते. काही प्रमाणात लोह आणि कॅल्शियम यांचे प्रमाणही जास्त आहे. त्यामुळे हिमोग्लोबिनचे प्रमाण झटपट वाढते आणि रक्‍तप्रवाहही योग्य राहतो. सकाळी अनुशापोटी डाळिंब खाल्ल्यास किंवा डाळिंबांचा रस प्यायल्यास अ‍ॅनिमियामध्ये फायदा होतो. 

बीट आणि सफरचंदाचा ज्यूस ः बीटामध्य  फॉलिक अ‍ॅसिड मोठ्या प्रमाणात असते तर सफरचंदात लोहाचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे अ‍ॅनिमियामध्ये त्याचा फायदा होतो. अ‍ॅनिमियाच्या रोगात एका बीटाचे रस आणि एक सफरचंदाचा रस यांच्यामध्ये दोन चमचे मध मिसळून दिवसातून दोनदा प्यायल्याने फायदा होतो. 

टोमॅटो ः शरीरातील लोहाचे जास्त प्रमाण गरजेचे असते; पण ते लोह शरीरात शोषले जाणे ही महत्त्वाचे आहे. टोमॅटोमुळे लोह शोषले जाते. रोजच्या रोज दोन टोमॅटो खाणे आणि एक ग्लास टोमॅटोचा ज्यूस पिणे हितकारक असते. त्याशिवाय सॅलड आणि स्वयंपाकातही टोमॅटोचा वापर अधिक प्रमाणात केला पाहिजे. 

खजूर ः खजुरामध्ये अधिक प्रमाणात लोहाचे प्रमाण असते. शंभर ग्रॅम खजुरामध्ये 90 मिलिग्रॅम लोहाचे प्रमाण असते. दुधात दोन खजूर रात्रभर भिजवून सकाळी अनशापोटी चावून चावून खाऊन आणि दूधही प्यावे. त्याशिवाय खजूर गरम पाण्यात भिजवूनही खाल्ल्यास फायदा होतो. ज्या व्यक्‍तींना लॅक्टोजची अ‍ॅलर्जी आहे, त्यांच्यासाठी पाण्यात भिजवलेले खजूर हा उत्तम पर्याय आहे. 

बेदाणे ः बेदाण्यामध्ये लोह, प्रथिने, फायबर आणि सोडियम यांचे अधिक प्रमाण असते. त्यामुळे अ‍ॅनिमियामध्ये फायदा होतो. दहा ते बारा बेदाणे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावेत. सकाळी त्या पाण्यात मध टाकून ते खाऊन टाकावे आणि पाणी पिऊन टाकावे. 

मध ः लोह आणि बी 12 जीवनसत्त्वाचे प्रमाण मधामध्ये जास्त असते. त्यामुळे रोज मध खाल्ल्यास त्याचा नक्‍कीच फायदा होतो. फळांचे तुकडे, दूध यात मध मिसळून खाल्ल्यास अ‍ॅनिमियातील रक्‍तातली कमतरता पूर्ण होते.