Thu, Jul 16, 2020 22:35होमपेज › Aarogya › डोकेदुखीचा ताप

डोकेदुखीचा ताप

Published On: May 16 2019 2:00AM | Last Updated: May 16 2019 2:00AM
डॉ. संजय गायकवाड

डोकेदुखीचा त्रास वयाच्या कुठल्या टप्प्यावर सुरू होईल, काही सांगता येत नाही आणि अनेकदा सुरुवातीला डोकेदुखी कशामुळे होतेय, हेही उलगडत नाही. काही वेळा डोकेदुखी थोड्या वेळासाठीच होते आणि आपोआप बरी होऊन जाते; पण फारच दुखत असेल, तर त्याबाबतीत हयगय न करणेच योग्य!

आपल्यातल्या जवळपास प्रत्येकाने कधी ना कधी डोकेदुखीचा अनुभव घेतलेलाच असतो. अर्थात, प्रत्येक डोकेदुखीकरिता वैद्यकीय हस्तक्षेपाची गरज पडतेच असे नाही. काही प्रकारची डोकेदुखी जेवण न घेतल्याने, स्नायूंचा ताण यांच्यामुळेही होते आणि तिच्यावरचा औषधोपचार घरीच केला जाऊ शकतो; परंतु काही प्रकारची डोकेदुखी गंभीर बाबींशी संबंधित असू शकते आणि त्यामध्ये वैद्यकीय मदतीची गरज भासते. डोकेदुखीत शुद्ध हरपत असेल, गोंधळायला होत असेल, दृष्टीत फरक पडत असेल, शारीरिक अशक्तपणा येत असेल किंवा तापाबरोबर डोकेदुखी होत असेल, तर डॉक्टरी सल्ल्याची तुम्हाला गरज आहे, हे समजून घ्यायला हवे.

डोकेदुखी एकाच प्रकारची असत नाही. ताण (टेन्शन), मायग्रेन (अर्धशिशी) आणि क्लस्टर हे डोकेदुखीचे प्रकार आहेत. मायग्रेन व क्लस्टर हे व्हॅस्न्युलर डोकेदुखीचे प्रकार आहेत. यात शारीरिक श्रम जास्त त्रासाचे ठरतात. डोक्याच्या पेशींमधील रक्तवाहिन्या यात सुजतात किंवा पसरतात. त्यामुळे ठणका लागून डोके दुखते.

अलीकडे अनेक जणांच्या बोलण्यात मायग्रेनचा उल्लेख येतो. अशी डोकेदुखी जिचे वर्णनच करता येत नाही, असा ठणका लागतो, की काही विचारता सोय नाही, असेही काही जण सांगतात. वैद्यकीय संदर्भाने विचार केला तर, मायग्रेन डोकेदुखीचा प्रकार प्रत्येकासाठी वेगवेगळा असू शकतो; पण सामान्यात: याच्या लक्षणांमध्ये डोक्याच्या दोन्ही किंवा एका बाजूला खूपच दुखणे आणि मळमळ किंवा उलटी होणे, प्रकाश सहन न होणे, दृष्टीत गोंधळ, चक्कर येणे, ताप व थंडी वाजणे, अशीही लक्षणे आढळतात.

मायग्रेन डोकेदुखीला अनेकविध गोष्टी कारणीभूत ठरू शकतात. काही लोकांना विशिष्ट प्रकारच्या आहाराचे वावडे असते. त्यामुळे त्यांच्या डोक्यास ठणका लागतो. काहींना वाइन, चॉकलेट, जुने चीज, प्रक्रिया केलेले मांस तसेच कॉफीन व अल्कोहोलमुळेदेखील मायग्रेन उद्भवते. आपल्याला नेमका कशापायी डोकेदुखीचा त्रास होतो आहे, याचे सजगपणे निरीक्षण केल्यास उपायांची दिशा सापडू शकते.

क्लस्टर डोकेदुखी ही मायग्रेनपेक्षा जास्त प्रमाणात आढळते. ती सामान्यत: पुन्हा पुन्हा होत राहते. कधी आठवडाभर, तर कधी काही महिनेदेखील टिकू शकते. सामान्यत: पुरुषांमध्ये ही क्लस्टर डोकेदुखी मोठ्या प्रमाणात आढळते आणि ती अत्यंत वेदनादायी असते. तसे पाहिल्यास साधारणपणे ही डोकेदुखी गंभीर प्रकारची नसते आणि सर्वसाधारण औषधांनी बरी होते; पण मायग्रेन किंवा इतर प्रकारच्या गंभीर डोकेदुखीमध्येे वैद्यकीय मदत आणि निरीक्षणाची गरज पडतेच पडते.

मानसिक ताणामुळे किंवा स्नायूंच्या आकुंचनामुळे होणारी डोकेदुखी हीदेखील सर्वत्र आढळणारी. त्यामुळे सामान्य प्रकारची मानली जाणारी डोकेदुखी असते आणि ताणाच्या काळाबरोबर तीदेखील वाढत जाते. मानसिक ताणामुळे होणारी डोकेदुखी बहुतेक स्थिर व कमी त्रासदायक असते. ही दुखी कपाळ, कानशिले आणि मानेच्या मागील बाजूला जाणवते. मानसिक ताणामुळे होणारी डोकेदुखी इतर कुठल्याही लक्षणांशी निगडित नसते आणि मायग्रेन डोकेदुखीमध्ये कोणत्याही प्रकारची पूर्वलक्षणे दिसून येत नाहीत. सर्व प्रकारच्या डोकेदुखींमागचे कारण 90 टक्के वेळा मानसिक ताणामुळे होणारी डोकेदुखीच असू शकते.

सायनस डोकेदुखी हासुद्धा एक वेगळा प्रकार आहे. सायनस डोकेदुखी ही सायनस संसर्ग किंवा अ‍ॅलर्जीमुळे होते. सायनस डोकेदुखीची सामान्य लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत ः डोळे, गाल आणि कपाळावर दबाव पडतो आणि खूप दुखते, वरच्या दातांमध्ये दुखल्यासारखे वाटते, ताप व थंडी वाजून येणे, चेहर्‍यावर सूज येणे इत्यादी. सर्दी किंवा फ्ल्यू यानंतर होणारी ही डोकेदुखी नाकाच्याच वर आणि मागे असलेल्या हाडांच्या पोकळीतल्या सायनस मार्गात सूज आल्याने होते. सायनस तुंबल्यास किंवा त्यांना संसर्ग झाल्यास तो ताण डोक्यावर पडतो आणि डोकेदुखी होते. हे दुखणे फार गंभीर व निरंतर असते. सकाळी सुरू होते आणि वाकलात तर आणखीनच जास्त जाणवते.

मायग्रेन, सायनस, मानसिक ताणातून उद्भवणारी डोकेदुखी; प्रकार कुठलाही असो, हा त्रास वयाच्या कुठल्या टप्प्यावर सुरू होईल, काही सांगता येत नाही आणि अनेकदा सुरुवातीला डोकेदुखी कशामुळे होतेय, हेही उलगडत नाही; पण फारच आणि वारंवार डोके दुखत असेल तर त्याबाबतीत हयगय न करणेच योग्य!