Thu, May 28, 2020 16:59होमपेज › Aarogya › गंभीर आजारांचे मोठे आव्हान 

गंभीर आजारांचे मोठे आव्हान 

Published On: Sep 12 2019 1:43AM | Last Updated: Sep 12 2019 1:43AM
डॉ. संतोष काळे

भारताची निम्म्याहून अधिक लोकसंख्या श्‍वसनाशी संबंधित आजारांनी आणि फुफ्फुसांशी संबंधित तक्रारींनी ग्रस्त आहे. हृदयाशी संबंधित विकारांनी ग्रस्त असलेल्या लोकांची संख्या 54 लाखांवर पोहोचली आहे. वाढत्या आजारांवर नियंत्रण मिळविणे भारताला शक्य झाले नाही, तर भारत हा एक ‘आजारी देश’ म्हणून ओळखला जाण्याचा दिवस दूर नाही. या पार्श्‍वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरू केलेल्या ‘फिट इंडिया’ मोहिमेचा विचार होण्याची गरज आहे.

भारतात हृदयविकाराने होणार्‍या मृत्यूंमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून, हे चिंतेचे कारण आहे. एका आकडेवारीनुसार, सध्या देशातील 54 लाख लोक हृदयाशी संबंधित आजारांनी ग्रस्त आहेत. हृदयरुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. हृदयाचे आजार इतरही अनेक आजारांना जन्म देत आहेत. पुणे येथील चेस्ट रिसर्च फाउंडेशन आणि नवी दिल्ली येथील इन्स्टिट्यूट ऑफ जिनेमिक्स अँड इंटिग्रेटेड बायोलॉजी या संस्थांच्या माहितीनुसार, भारतातील अर्ध्याहून अधिक लोकसंख्येला श्‍वसनाशी संबंधित आजारांनी आणि फुफ्फुसांशी संबंधित तक्रारींनी ग्रासले आहे. दररोज सुमारे साडेतीन कोटी लोक आरोग्यविषयक तक्रारी घेऊन डॉक्टरांकडे जातात. हा निष्कर्ष 800 पेक्षा अधिक शहरांमध्ये व्यापक सर्वेक्षण करून काढण्यात आला आहे. 

या अध्ययनात असे दिसून आले आहे की, देशाची 21 टक्के लोकसंख्या आता हृदयविकार आणि उच्च रक्‍तदाबाच्या समस्येने ग्रासली आहे. फुफ्फुसांच्या आजारांव्यतिरिक्‍त दमा आणि ब्राँकायटिससारखे आजार वाढत असल्याचा निष्कर्षही काढण्यात आला आहे. जगाची एकूण लोकसंख्या 7.3 अब्ज असून, त्यातील 1.2 अब्ज लोकसंख्या भारताची आहे; मात्र दरवर्षी होणार्‍या मृत्यूंचे प्रमाण मात्र भारतात जगाच्या 18 टक्के एवढे आहे. संयुक्‍त राष्ट्राच्या जागतिक अहवालातसुद्धा असे म्हटले आहे की, संसर्गजन्य नसणार्‍या आजारांमुळे म्हणजेच हृदयरोग, मधुमेह आणि कर्करोग यासारख्या आजारांमुळे आगामी काळात भारताच्या अर्थव्यवस्थेवर प्रचंड प्रतिकूल परिणाम होईल. अहवालात म्हटले आहे की, 2012 ते 2030 या कालावधीत या आजारांवरील उपचारांवर 6.2 लाख कोटी डॉलर म्हणजे 41 लाख कोटी रुपये खर्च होतील. हा अहवाल शहरी लोकसंख्येच्या आरोग्यावर होत असलेल्या परिणामांवर आधारित आहे. 

वाढते शहरीकरण, बदलती कामकाजाची पद्धत आणि जीवनशैली या गोष्टींच या आजारांना कारणीभूत ठरत आहेत. संयुक्‍त राष्ट्राच्या अहवालानुसार, 2014 ते 2050 या कालावधीत भारतात 40 कोटींपेक्षा अधिक लोकसंख्या शहरी असेल. या स्थित्यंतरांमुळे भारतातील शहरांमध्ये अनियोजित विकासाचे जे चित्र उभे राहील ते सामाजिक आणि पर्यावरणीयदृष्ट्या अत्यंत घातक असेल. आकडेवारीवर नजर टाकल्यास असे दिसते की, देशभरात दरवर्षी होणार्‍या एकंदर मृत्यूंपैकी सहा टक्के लोकांचा मृत्यू कर्करोगाने होतो. मृत्यूंचा हा आकडा जगभरात दरवर्षी कर्करोगामुळे होणार्‍या मृत्यूंच्या आठ टक्के आहे. त्याचप्रमाणे भारतात सहा कोटींपेक्षा अधिक लोक मधुमेहाने ग्रस्त आहेत. भारतातील अर्ध्याहून अधिक लोकसंख्या श्‍वसनाशी संबंधित आणि फुफ्फुसांशी संबंधित विकारांनी ग्रस्त आहे. आजारांचे सर्वाधिक ओझे वाहणारा देश म्हणून जगात भारताची छबी निर्माण होत आहे, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. आजारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी तातडीने प्रयत्न न केल्यास भारत हा एक ‘आजारी देश’ म्हणून ओळखला जाण्याचा दिवस दूर नाही.

जानेवारी 2015 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूटीओ) असे जाहीर केले की संसर्गजन्य नसलेल्या आजारांमुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या जगात वाढत आहे. जगभरात दरवर्षी दीड कोटी लोक कर्करोग, मधुमेह आणि हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्युमुखी पडतात. वेळेवर उपचार मिळाल्यास यापैकी अनेकांचा जीव वाचविता येऊ शकतो. अहवालानुसार, भारतात संसर्गजन्य नसलेल्या आजारांमुळे तीस ते सत्तर वर्षे वयोगटातील लोकांच्या मृत्यूची शक्यता 26.2 टक्के एवढी झाली आहे. आशिया आणि आफ्रिकेतील काही देशांच्या तुलनेतसुद्धा ही आकडेवारी अधिक आहे. डब्ल्यूटीओच्या मते, पी-5 देशांमध्ये (चीन, फ्रान्स, रशिया, ब्रिटन आणि अमेरिका) केवळ रशियाची स्थिती भारतापेक्षा खालावलेली असून, तिथे संसर्गजन्य नसलेल्या आजारांमुळे मृत्युमुखी पडणार्‍या व्यक्‍तींचे प्रमाण 29.2 टक्के आहे. 2012 मध्ये भारतात 52.2 टक्के लोकांचा मृत्यू संसर्गजन्य नसलेल्या आजारांमुळे झाला होता.

जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, कर्करोग, मधुमेह, हृदयरोग आणि श्‍वास घेण्यात अडथळे येण्याशी संबंधित आजार अशा चार प्रमुख आजारांचे प्रमाण संसर्गजन्य नसलेल्या आजारांमध्ये प्रामुख्याने अधिक दिसून येते. काही वर्षांपूर्वी डब्ल्यूटीओने आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने लोकांच्या जीवनशैलीत सुधारणा घडविण्यासाठी व्यापक करारावर सहमती दर्शविली होती. त्यावेळी असे वाटले होते की, अशा प्रकारचे आजार कमी होण्यास मदत होईल; परंतु दुर्दैवाने या दिशेने अद्याप कोणतीही पावले टाकण्यात आलेली नाहीत. अशा संसर्गजन्य नसलेल्या आजारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी योग्य दिशेने प्रयत्न केले नाहीत तर, 2020 च्या अखेरपर्यंत या आजारांमुळे मृत्यू पावणार्‍यांची संख्या सहा कोटींपर्यंत पोहोचेल, असे सांगण्यात येते. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या मते, 21 व्या शतकात अशा आजारांवर नियंत्रण मिळविणे हे सर्वात मोठे आव्हान असणार आहे. वेगाने बदलत असलेली जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयी आणि शारीरिक व्यायामाची कमतरता यामुळे आपल्या जीवनाला धोका निर्माण झाला आहे. या आजारांमुळे अनेक लोक काळाच्या उदरात गडप झाले आहेत. संसर्गजन्य नसलेल्या या आजारांमुळे जगातील एक तृतीयांश लोकसंख्येचे जीवन वेळेपूर्वीच संपुष्टात येत आहे. कर्करोग, मधुमेह, हृदयरोग आणि श्‍वसनरोग याबरोबरच मानसिक आजारांचे निर्मूलन करण्यासाठीही आतापर्यंत ठोस पावले उचलली गेलेली नाहीत.

हृदयरोग, कर्करोग, मधुमेह किंवा ब्रेन स्ट्रोकमुळे मृत्युमुखी पडणार्‍यांची सर्वाधिक संख्या भारतातच आहे, ही दुर्दैवाची बाब आहे. अशा स्वरूपाच्या संसर्गजन्य नसलेल्या आजारांचा मुकाबला करण्यासाठी भारत सरकार मोठी रक्‍कम खर्च करते; मात्र त्याचे अपेक्षित परिणाम दिसून येत नाहीत. या आजारांवर लवकरात लवकर नियंत्रण मिळविता आले नाही तर, लवकरच एक भयावह परिस्थिती आपल्या देशात निर्माण होऊ शकते. तीस वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या व्यक्‍तींमध्ये अशा स्वरूपाच्या आजारांविषयी जागरूकता निर्माण व्हावी आणि या आजारांसंबंधी या आजारांच्या चाचण्यांच्या अधिकाधिक सुविधा निर्माण व्हाव्यात, असे सरकारचे प्रयत्न आहेत. ही एक चांगली सुरुवात ठरू शकते. ही योजना योग्य प्रकारे राबविली गेल्यास एका मोठ्या लोकसंख्येला आरोग्याविषयी जागरूक करण्यात यश मिळू शकते. भारतात 35 ते 64 वयोगटातील जेवढ्या व्यक्‍तींचे मृत्यू होतात, त्यापैकी 42 टक्के मृत्यूंचे कारण संसर्गजन्य नसलेले आजार हेच असते. कर्करोगावर जितक्या लवकर उपचार सुरू होतील, तेवढे अधिक फलदायी ठरतात, असे सांगितले जाते. गेल्या काही वर्षांत कर्करोगावरील उपचारांसाठी नवीन तंत्रज्ञान आणि औषधांचा शोध लागला आहे; परंतु ही औषधे इतकी महाग आहेत की, सर्वसामान्य रुग्णांच्या ती आवाक्याबाहेरची आहेत.

आज भारतातील ग्रामीण भागात आरोग्य व्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला आहे. गावांमधील रुग्णालये आणि आरोग्य केंद्रे जर्जर अवस्थेत आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आणि ग्रामीण रुग्णालयांमध्ये ना डॉक्टर आहेत ना औषधे मिळतात. अशा स्थितीत या आजारांचा मुकाबला करणार तरी कसा? ग्रामीण भागातील प्रमुख समस्या अशी की, आजार खूप बळावेपर्यंत रुग्णाला किंवा त्याच्या नातेवाइकांना त्याची माहितीच होऊ शकत नाही. जेव्हा विशिष्ट आजार झाल्याचे निष्पन्‍न होते, तेव्हा वेळ निघून गेलेली असते. गावात उपचारांच्या सुविधा नसल्यामुळे रुग्णांना घेऊन शहरात येणे त्यांच्या नातेवाइकांना भाग पडते. सरकारने जागतिक आरोग्य संघटनेच्या सहकार्याने अशा स्वरूपाच्या गंभीर आजारांशी मुकाबला करण्यासाठी एक ठोस कृती कार्यक्रम तयार करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे, हीच काळाची गरज आहे.