तळपायांना होणारे त्रास

Last Updated: Oct 09 2019 8:32AM
Responsive image

डॉ. मयुरेश पोवार


तळपाय हा शरीराचाच भाग आहे. त्यामुळे शरीराला इतरत्र होणारे आजार तळपायांनाही होत असतात. काही आजार तळपायांना विशेष होतात. त्यातल्या दोन-तीन प्रकारच्या आजारांची आपण माहिती घेऊ.

तळपायांतून मेंदूकडे संवेदना विजेच्या प्रवाहाप्रमाणे जात असतात. या शीरांतून जाणारा विजेचा प्रवाह विशिष्ट गतीने जात असतो. मेंदूमध्ये या गतीवरून ही संवेदना कोणत्या प्रकारची आहे, हे ठरते. उदाहरणार्थ, विशिष्ट गतीने जाणारी संवेदना गरम आहे का गार, वेदना आहे का सुखदायक आहे, हा फरक मेंदूत समजतो.

शरीराच्या कुठल्याही भागातून संवेदना नेणार्‍या नसा त्या त्या भागातून विविध प्रकारच्या संवेदना मेंदूकडे पोहोचवितात. त्वचेकडून नेणार्‍या संवेदनांमध्ये उष्णता किंवा थंडी प्रामुख्याने मेंदूकडे नेली जाते.

अंतःस्थ अवयवातून बहुतांश वेदना नेली जाते. हा सगळा कारभार विद्युत रासायनिक पद्धतीने चालतो. त्वचेमध्ये विविध प्रकारच्या संवेदनांचे स्वीकारक असतात. विशिष्ट स्वीकारक त्या विशिष्ट प्रकारच्या संवेदना ओळखतात व संबंधित शीरांमार्फत मेंदूकडे पाठवतात. त्वचेकडून किंवा अवयवांकडून संवेदना नेणार्‍या शीरांचे मार्ग ठरलेले आहेत. या मार्गावर ठिकठिकाणी स्थानके असतात. या स्थानकांमध्ये या संवेदना मार्ग बदलतात. शीरांमध्ये अथवा स्थानकांमध्ये काही दोष निर्माण झाला तर मेंदूकडे जाणार्‍या संवेदना त्यांचे स्वरूप बदलतात. 

एकाच शीरेमधून एकाच मार्गाने जाणार्‍या संवेदना कोणत्या प्रकारच्या आहेत हे मेंदूच्या विविध भागांत ठरविले जाते. एकाच प्रकारच्या विजेच्या तारेतून उष्णताही वाहिली जाते आणि थंडीही वाहिली जाते. तसाच काहीसा हा प्रकार आहे. 

एक खूपच नेहमी आढळणारा दोष म्हणजे तळपायांची आग होणे. अशा प्रसंगी तळपायाच्या पेशी गरम होत नाहीत; परंतु संवेदना नेणार्‍या शीरांमधून जाणार्‍या विजेच्या ‘करंट’ची गती बदलते. मेंदू त्याचा अर्थ ठरल्याप्रमाणे बदललेला लावतो. मेंदूत अनेक भागांमध्ये सतत काम करणार्‍या पेशी रासायनिक द्रव्ये तयार करतात. ही रासायनिक द्रव्ये विशिष्ट ठिकाणी, विशिष्ट वेळात व विशिष्ट गतीने तयार होणे आवश्यक असते.

यात काही फरक झाला तर ज्या अवयवांतून हा करंट मेंदूकडे जातो. तेथे कोणताही विकार नसला तरी नको ती संवेदना निर्माण होते. 

अन्‍ननलिका ही एक पोकळ नलिका असते. तिच्या आतल्या बाजूनी जे अस्तर असते. त्यात काही बिघाड झाला तर मेंदूकडे नेणार्‍या शीरांतून जाणार्‍या विजेच्या करंटमध्ये फरक पडतो आणि व्यक्‍तीला आपल्या छातीमधे जळजळ झाल्याची भावना होते. बहुतेक वेळेला अन्‍ननलिकेत कुठलाही दोष नसताना केवळ या विजेच्या करंटमधे झालेल्या बदलामुळे छातीत आग होते व त्या माणसाला अन्‍ननलिकेत आम्ल जास्त झाले आहे, असे वाटू लागते. ही जळजळ नेमकी कशामुळे होते आहे, हे ओळखण्याकरिता ज्ञान व अनुभव लागतो. काही वेळा हृदयविकाराचा झटका आला, तरीदेखील छातीच्या मध्यभागी जळजळ होऊ लागते. उपचार करताना ही जळजळ नेमकी कशामधे होते आहे, हे ओळखण्यात चूक झाली तर हृदयविकाराचा झटका आलेल्या व्यक्‍तीला आम्ल कमी करण्याचे औषध दिले जाते. रुग्णाची तक्रार काळजीपूर्वक ऐकून होणारा त्रास कशामुळे आहे, हे ओळखता येते. त्यामुळे रुग्ण त्याची तक्रार सांगत असताना ही जळजळ कशामुळे आहे, याचा अंदाज बरोबर करता येतो. केवळ शरीर तपासून ते कारण कळेल असे नाही. तळपायाची आग होताना ती कशी सुरू झाली, केव्हा कमी/जास्त असते, सिमेंटच्या रस्त्यावर अनवाणी चालला होता का, अशी माहिती महत्त्वाची ठरते. 

तळपायांना होणारा दुसरा त्रास म्हणजे टाचा दुखणे. पावलांच्या आतमधे एक पदर असतो. प्रत्येक वेळा आपण चाललो की तो पदर ताणला जातो व परत पूर्ववत होतो. त्यामुळे हा पदर काही ठिकाणी झिजतो, पातळ होतो किंवा फाटतो. येथून निघणार्‍या शीरा टाचेतून वर पायाकडे संवेदना नेतात. त्यामुळे रुग्णाला आपली टाच दुखते आहे, अशी भावना येते. कधी कधी संबंध तळव्यालासुद्धा काही वेदना होतात असे रुग्णाला वाटते; पण प्रत्यक्ष तळवा तपासला, तर बाहेरून दिसेल, असा कोणताही दोष तिथे आढळत नाही. अशा तर्‍हेची झीज व पदर फाटणे, हे आपल्या शरीरात इतर ठिकाणीही होऊ शकते. उदाहरणार्थ, खांदा, कोपर, पाठ, छातीच्या पिंजर्‍यातील फासळ्यांच्या पुढच्या टोकाची कुर्चा. हा दोष आपोआपच दुरुस्त करण्याची यंत्रणा आपल्या शरीरात आहे. त्यामुळे नऊ महिने ते तीन वर्षांत यातला कुठलाही त्रास शमतो.

वेदनाशामक औषधांचा उपयोग काही काळ वेदना कमी करण्याकडे होतो; पण तो त्रास जात नाही. फिजिओथेरेपी ही उपचार पद्धती हे दोष लवकर बरे करू शकते. 

तळपायांच्या पंजामध्ये आपल्या हाडांच्या सांगाड्याचाच एक भाग असतो. ती हाडे बरीचशी पोकळ असतात. त्यांच्यावर अकस्मात ताण आला तर ती मोडू शकतात. सहसा पावलामधे अंगठ्यापासून दुसरे किंवा तिसरे हाड असे मोडते. याला ‘मार्च फ्रॅक्चर’ असे म्हणतात. आपण नेहमीपेक्षा पाच-सहा पटींनी जास्त चाललो, तर असा प्रकार घडतो. आपल्याला तेव्हा वेदना अस्थिभंगाप्रमाणे होत नाही; परंतु पावलावर सूज येते. हे हाडदेखील आपोआपच दुरुस्त होते. एकाच पावलावर कारण नसताना (मार लागणे, पडणे) सूज आली तर ते ‘मार्च फ्रॅक्चर’ असण्याची शक्यता असते. 

शरीरात वेदना होणे, ही गोष्ट प्रकृतीच्या दृष्टीने उपयुक्‍त असते. ज्या भागात वेदना होते, तेथे आपले लक्ष जाते व आजार नाही ना, हे पाहिले जाते. हे आजार प्राणघातक नसतात; पण वेदना सहन करावी लागते. बहुतांश ती वेदना फिजिओथेरेपीने लवकर जाते.रशियन टेनिसपटू मारिया शारापोव्हाची निवृत्ती


पुणे : बँक घोटाळा; आमदार अनिल भोसले पोलिस कोठडीत (Video)


रतन लाल यांना मिळणार 'शहिद दर्जा', राज्य सरकारकडून १ कोटींची मदत


'चंद्रपूर'च्या दारूबंदी विरोधात ९३ टक्के निवेदने 


कोल्हापूर : म्हाकवे फाट्यावरील अपघातात केनवडेचा तरूण ठार 


राज्यातील पहिली ते दहावीपर्यंतच्या सर्व माध्यमांच्या शाळांत मराठी विषय सक्तीचा


परभणी : इटाळी खून प्रकरणाचे गूढ वाढले


कोरोना : राज्यातील सर्व ९१ प्रवाशांची चाचणी निगेटिव्ह, आरोग्यमंत्र्यांची माहिती


सातारा : बीट मार्शल योजनेचा दुसरा टप्पा कार्यान्वित


डोवालांचा दिल्लीत हिंसाचारग्रस्त भागाचा दौरा; पीडितांची घोषणाबाजी