लेप्टोपासून सावध!

Published On: Aug 14 2019 11:26PM | Last Updated: Aug 14 2019 11:26PM
Responsive image


डॉ. अनिल मडके

सांगली, कोल्हापूर, कराड, सातारा, वाई, चिपळूण या भागांत महापुराने थैमान घातलेले आहे. अनेकजण पुरात अडकले होते आणि अडकलेले आहेत. अनेकांना त्यातून बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. अनेक कार्यकर्ते त्यांना मदत करत आहेत. बरेचजण या ना त्या कारणाने आजही पाण्यात आहेत. या पुरानंतर जे संसर्गजन्य रोग, आजार येतात, त्यातील एक महत्त्वाचा आजार म्हणजे लेप्टोस्पायरोसिस.

काय आहे लेप्टो..?

लेप्टोस्पायरोसिस हा आजार लेप्टोस्पायरा या जीवाणूमुळे होतो. हा आजार अनेक प्राण्यांच्या मूत्रामधून पसरतो जसे की, कुत्रा, मांजर, गाय, म्हैस, घोडा असे अनेक पाळीव प्राणी तसेच उंदीर, घुशी यांच्याद्वारे हा आजार पसरतो. जेव्हा पूरस्थिती निर्माण होते, तेव्हा साचलेल्या पाण्यातून हे जंतू पाण्यात पसरतात. बरेच आठवडे-बरेच महिने हे जंतू जिवंत राहिलेले असतात. जेव्हा एखादी व्यक्‍ती उघड्या पायांनी-अनवाणी त्या पाण्यात शिरते किंवा एखाद्या व्यक्‍तीच्या पायाला जखम असते, त्या व्यक्‍तीला हा आजार होऊ शकतो. 

लक्षणे कोणती?

लेप्टोचे दोन प्रकार आहेत, एक साधा आणि दुसरा तीव्र प्रकार. साध्या प्रकारात सुरुवातीला ताप येतो, थंडी वाजून येते. स्नायू दुखणे, अंग दुखणे, डोके दुखणे, उलट्या होणे, मळमळ होणे ही लक्षणे दिसतात. काही व्यक्‍तींना त्वचेवर पुरळ येतात, डोळे लालसर होतात.

जेव्हा हा आजार तीव्ररूप धारण करतो तेव्हा यकृताला सूज येते. हिपॅटायटिससारखा आजार होतो. काही व्यक्‍तींना मूत्रपिंडावर परिणाम होतो. अनेकांच्या हृदयाचे ठोके अनियमित होतात. मेंदूच्या आवरणाला सूज येऊ शकते.

अनेकांना फुफ्फुसामध्ये सूज येऊन न्यूमोनिया होतो. फुफ्फुसामध्ये रक्‍तस्राव होऊन एखाद्या वेळेस रुग्ण अत्यवस्थ होऊ शकतो. लेप्टोचे निदान रक्‍त तपासणीतून आणि मूत्रतपासणीतून करतात.

काय दक्षता घ्यावी?

लेप्टो टाळायचा असेल तर तुम्ही सर्वांनी म्हणजे ज्यांनी या पाण्यात प्रवेश केलेला आहे त्यांनी Doxycycline 200 mg ही गोळी आठवड्यातून एक घेतली तर चालते. जे लोक एकदाच पाण्यात गेलेत त्यांनी आठवड्यातून एक घेतली तर चालते. जे लोक जास्त काळ पाण्यात गेलेत किंवा ज्यांना पायाला जखम आहे, अशा व्यक्‍तींनी Doxycycline 100 mg ही गोळी सकाळी एक व संध्याकाळी एक असे पाच दिवस घ्यावी. ज्यांना जखम आहे त्यांनी आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी, पायावरील जखमेचे ड्रेसिंग करायला हवे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, गरोदर स्त्रिया आणि 12 वर्षांखालील मुले यांनी Doxycycline न घेता azithromycin 250mg ही गोळी आठवड्यातून 1 किंवा 2 घ्याव्यात. या गोळ्या फॅमिली डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्याव्यात. लेप्टो टाळण्यासाठी किंवा त्यातून होणारे संसर्गजन्य रोग टाळायचे असतील, तर पाण्यात जाताना काळजी घ्या. गमबूट वापरा. जिथे जाणे भाग आहे तिथेच जा. मुद्दाम पूर बघायला म्हणून पाण्यात पाय बुडवू नका. पाण्यातून आल्यानंतर पाय स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. पाय लगेच कोरडे करा. खूप वेळ पाण्यात पाय राहिले तर संसर्गाची भीती अधिक असते. ज्यांना जखम आहे त्यांनी जखमांची काळजी घ्यायला हवी. ड्रेसिंग करून घ्यावे. हा आजार जसा त्वचेतून आत प्रवेश करतो तसे पाणी प्यायलामुळेही होतो. म्हणून उघड्यावरील अस्वच्छ पाणी पिणे हे धोक्याचे आहे हे लक्षात घ्या. उघड्यावरील काही खाल्ले तर त्यातून आजारांचा धोका असतो. 
या सर्व गोष्टींची काळजी घ्या आणि  लेप्टोस्पायरोसिसपासून दूर राहा.