Responsive image

बंडोबा आणि थंडोबा

By anirudha.sankpal | Publish Date: Oct 09 2019 8:14PM

अग्रलेख

कुठल्याही निवडणुकीत बंडखोरी हा अलीकडे बातमीचा विषय झाला आहे. अगदी कुठल्याही मतदारसंघात अशा बंडखोरांच्या नावांची यादीच प्रसिद्ध केली जात असते. तितकेच नाही, तर कुठल्या प्रस्थापित पक्षाला त्यामुळे तिथे त्रास होईल वा प्रतिस्पर्धी पक्षाला लाभ होईल, याचे तालुका वा जिल्हावार तपशीलही येत असतात; मात्र उमेदवारी अर्ज दाखल होण्याची मुदत असेपर्यंत जे बंडखोरीचे पेव फुटलेले असते, ते अर्ज माघारी घेण्याची मुदत संपण्यापर्यंत बर्‍याच अंशी आटोक्यात येत असते. ज्या पक्षातून नाराजाने बंडखोरी केलेली असते, त्या पक्षाचे वरिष्ठ नेते वा कोणी वजनदार व्यक्तीकडून दडपण आणले जाते आणि अशापैकी अनेक बंडखोर पक्षहित वा वैचारिक हवाले देऊन माघार घेत असतात. मग अशा बंडखोरांना थंडोबा संबोधले जाते. आताही हजारभर अशा उमेदवारांनी आधी अर्ज भरला व नंतर माघार घेतलेली आहे. त्यातले सगळेच बंडखोर होते असे अजिबात नाही. अनेकदा एकाच पक्षाचे एकाहून अधिक उमेदवार समान जागी अर्ज दाखल करतात, त्यांना डमी उमेदवारही म्हटले जाते. समजा ठरलेल्या उमेदवाराच्या किंवा पक्षाने अधिकृत नाव घोषित केलेल्या व्यक्तीचा अर्ज कुठली तरी त्रुटी निघाली म्हणून रद्दबातल झाला, तर त्याच्या जागी पर्यायी उमेदवार म्हणून मग हा डमी कायम राहतो. मग पक्षाला त्या जागी लढण्यापासून वंचित राहावे लागत नाही. तसे नाही झाले तर हा डमी उमेदवार मुदत संपण्यापूर्वीच माघार घेतो; पण सगळीकडे असे होतेच असेही नाही. आजकाल प्रत्येक राजकीय कार्यकर्त्याची महत्त्वाकांक्षा इतकी शिगेला पोहोचलेली आहे, की आपल्याला पक्षाने उमेदवारी दिली नाही, तर असा नाराज थेट अन्य पक्षात धाव घेतो आणि तिथून उमेदवारी मिळवू शकतो. मंदीतले पक्ष तशी उमेदवारी देतातही. उदाहरणार्थ, पालघर येथील शिवसेनेचे विद्यमान आमदार अमोल घोडा यांना उमेदवारी नाकारली गेली होती. त्यांनी अखेरच्या क्षणी राष्ट्रवादी काँग्रेसशी संधान बांधून तिथून उमेदवारी मिळवली; मात्र अर्ज माघारीच्या शेवटच्या क्षणी त्यांनीच शिवसेनेच्या उमेदवारासाठी माघार घेऊन राष्ट्रवादीला तोंडघशी पाडलेले आहे. असे अनेक जागी झालेले आहे. माघारीचे विविध प्रकार आहेत, तशीच वेगवेगळी कारणेही आहेत. पहिल्या दिवशी आवेशात तलवार उपसून मैदानात आलेले असे अनेक बंडखोर, दोन-चार दिवसांत तलवार म्यान करून का जातात? सामान्य माणसाला पडणारा हा प्रश्न आहे. ज्या पक्षश्रेष्ठींनी उमेदवारी नाकारली म्हणून बंडाचे निशाण फडकावले, त्यांच्याच समजूत घालण्याने बहुतांश बंडोबा थंडोबा का होतात? राजकारणाचे विविध रंग तपासले, तर त्यात कुठलेही रहस्य नाही, तर हेतू असतो आणि तो सफल झाल्यावर बंडखोरीचे कारण उरलेले नसते. म्हणून माघार घेतली जाते. बहुतांश बंडखोरी ही दुबळेपणाचे लक्षण असते. ज्यांना स्वबळावर जागा जिंकण्याची खात्री असते, अशा व्यक्तीला कुठल्याही पक्षातून उमेदवारी नाकारण्याची हिंमत पक्षश्रेष्ठीही करू शकत नाहीत. कारण, त्यांनाही पक्षाला विजयी होणारेच उमेदवार उभे करायचे असतात. साहजिकच, कसेही करून जिंकू शकणारा उमेदवार त्यांना नाकारता येत नाही. याच्या उलट जिथे पक्षामुळेच जिंकू शकणारा उमेदवार असतो, त्याच्या बंडखोरीला काहीही अर्थ नसतो. किंबहुना, पक्षाने उमेदवारी नाकारली म्हणजेच आपण एकाकी पडलो, ही जाणीव त्याला सतावत असते. त्यामुळेच बंडखोरीचा आवेश येत असतो. त्यातून पक्षाने आपला निर्णय बदलावा अशी अपेक्षा असते. नेतृत्वाने त्याला दाद दिली नाही, मग हळूहळू अशा पक्षावलंबी इच्छुकाची हिंमत खचते आणि तो माघारीला तयार होतो; पण असे करताना पक्षाला हुलकावणी दाखवून अन्य कुठले पद मिळवण्याचा प्रयत्न होत असतो. निवडणुकीची उमेदवारी नसेल, तर नंतर सत्तेत कुठले तरी अधिकारपद मिळावे, अशी त्यांची किमान अपेक्षा असते. कारण, सरकारी यंत्रणा अनेक घटकांनी बनलेली असते आणि त्यात अशा कुणालाही लहान-मोठी अधिकारपदे देण्याची सोय करून ठेवलेली आहे. सत्ता पक्षाकडे आल्यास त्यातील एक पद आपल्याला मिळावे, त्याची हमी अशा बंडखोरीतून मिळवता येत असते. म्हणूनच, उमेदवारांची यादी पक्षाने जाहीर केल्यावर बंडखोरीला पेव फुटते; मात्र एकदा श्रेष्ठी झुकत नाहीत, याची जाणीव झाल्यावर कुणी समजवायला येतो का, त्याची प्रतीक्षा सुरू होते. त्यामुळे पक्षाचे श्रेष्ठीही बंडखोरीने तत्काळ विचलित होत नाहीत. ठरावीक महत्त्वाच्या जागा किंवा तिथल्या बंडखोरीविषयी मात्र श्रेष्ठी चिंतेत असतात. तिथे झालेल्या बंडखोरीला आवरण्याची पक्षालाही गरज वाटत असते. कारण, त्या जागा धोक्यात असतात; अन्यथा बाकीच्या बंडखोरांच्या अपेक्षा श्रेष्ठींना ठाऊक असतात आणि कुठल्या तरी पदाचे गाजर दाखवून किरकोळ बंडाळी मोडण्याचा आत्मविश्वास नेत्यांपाशी असतो. म्हणूनच, निवडणूक अर्ज भरायला आरंभ झाल्यापासून माघारीचा दिवस मावळण्यापर्यंत हे नाटक रंगते आणि बंडोबा थंडोबा झाल्याच्या बातम्यांचा ओघ सुरू होतो. कधी तो पक्षांतर्गत असतो, तर कधी विविध पक्षांच्या आघाड्या-युत्या वा मित्रपक्षांच्याही बाबतीत असतो. आता विधानसभा निवडणुकीतले बरेच बंडोबा थंडावले असून उरलेले लोक कामाला लागले आहेत. अर्थात, ज्या पक्षाला सत्तेची अधिक खात्री असते, तिथेच बंडाची मोठी लागण असते. उलट, पराभवाच्या छायेत असलेल्या पक्षात बंडाची बाधा कमी असते; पण मूठभर अपवाद सोडल्यास बहुतांश बंडोबा हे थंडोबा होण्यासाठीच मैदानात उडी घेत असतात. आपापले पक्षांतर्गत सौदे साधण्याची तितकीच मोठी संधी असते ना?धुळ्याच्या सुषमा राजपूत यांचे ग्रीसच्या पंतप्रधानांकडून कौतुक 


हॉस्पिटल बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणा-यास अटक


रशियन टेनिसपटू मारिया शारापोव्हाची निवृत्ती


पुणे : बँक घोटाळा; आमदार अनिल भोसले पोलिस कोठडीत (Video)


रतन लाल यांना मिळणार 'शहिद दर्जा', राज्य सरकारकडून १ कोटींची मदत


'चंद्रपूर'च्या दारूबंदी विरोधात ९३ टक्के निवेदने 


कोल्हापूर : म्हाकवे फाट्यावरील अपघातात केनवडेचा तरूण ठार 


राज्यातील पहिली ते दहावीपर्यंतच्या सर्व माध्यमांच्या शाळांत मराठी विषय सक्तीचा


परभणी : इटाळी खून प्रकरणाचे गूढ वाढले


कोरोना : राज्यातील सर्व ९१ प्रवाशांची चाचणी निगेटिव्ह, आरोग्यमंत्र्यांची माहिती