Responsive image

जोर बैठका काढूनि झाल्या...

By santosh.kanmuse | Publish Date: Nov 10 2019 8:05PM

प्रा. दिनेश डांगे

वाटत होते सगळे। होईल मनासारखे। जागा सगळ्या मिळतील आम्हालाच। राहणार नाही औषधाला। पक्ष विरोधी जाग्यावर। तळं आमचं निर्मळ। कमळं उगवतील भाराभर। जाळं आमचं एक नंबरी। मासं गावतील। शंभर नंबरी। साम, दाम, दंड, भेद। चारी नीती अवलंबून। खेचून आणले सगळे सरदार। आमच्याच एका तंबूत। युती आमची अभेद्य। सांगत सुटलो ठणकावून। स्वबळावर लढण्याची। भाषा मात्र होती आतून। आमच्यापेक्षा मित्र आमचा। धीट होता दांडगा। धमक्या त्याच्या। चालू होत्या रात्रंदिवस बाहेरून। डोक्यावर बर्फ। तोंडात खडीसाखर ठेवून। किती घेतले। आम्ही त्याला सांभाळून। तरीही एकमेकाला पाडायच्या। कारवाया आमच्या। चालू होत्या आतून। तरीही गॅरंटी होती। उभ्या महाराष्ट्राची। येऊन येऊन येणार कोण। आमच्याशिवाय हाय कोण। भाषा होती गर्वाची। मतदार आमचाच। आम्ही मतदाराचे। वाटत होते आम्हाला। हातवाले घड्याळवाले। राहिले आता नावापुरते। निकालाच्या दिवसापर्यंत। अरे आम्ही म्हणजे कोण। भाग्यविधाते महाराष्ट्राचे। आणि तुम्ही म्हणजे कोण। इतिहासजमा पान तुमचे। पण पाऊस जसा दमवायला लागला। परतीचे नाव घेईना झाला। नुसता झोडपत सुटला। मतदारांनी केली। पावसाची तुलना आमच्याशी। ‘हे’सुद्धा असेच आहेत। म्हणू लागले मनातल्या मनात। लांब कशाला। वाघासारखा मित्र आमचा। आम्हाला परतीचा पाऊस। म्हणू लागला। मित्र कसले आम्ही। म्यानात लपलेल्या तलवारी। मोका मिळताच। भिडू शकतात जिव्हारी। ज्यांना आम्ही गृहीत धरले। तेच मतदार खरे जौहरी। हिरे आणि दगड यातला फरक। त्यांनी ओळखला। कौल त्यांनी असा दिला। लटकविले त्यांनी अधांतरी। फुगा नुसताफुगलेला। टाचणी त्याला त्यांनी लावली। जोर बैठका सुरू झाल्या। बघण्यासारखी सूरत झाली। सुपारी फुटायच्या आत। घटस्फोटाची तयारी झाली। शत प्रतिशत बुद्धी आमची। ठिकाणावर आली। पण वेळ केव्हाच निघून गेली। वक्‍ते आम्ही चांगले होतो। पण नको त्या ठिकाणी। जीभ आमची घसरली। जोर बैठका काढूनि आता। गुडघे झाले निकामी। आमचापण मेंदू गुडघ्यात असतो। उशिरा का होईना। समजलो आम्ही।