Responsive image

काँग्रेसचा डाव, बसपचा पाडाव

By anirudha.sankpal | Publish Date: Oct 09 2019 8:14PM

मिलिंद सोलापूरकर

एके काळी देशाच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असणार्‍या बहनजी मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाला सध्या सातत्याने अपयशाचा सामना करावा लागत आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेशात शून्यावर समाधान मानावे लागल्यानंतर 2019 मध्ये अखिलेश यादव यांच्याशी जुने हाडवैर संपवून आघाडी केली; पण त्यातही फारसे यश आले नाही. त्या अपयशातून सावरत आगामी पोटनिवडणुकांची तयारी करत असतानाच राजस्थानात काँग्रेसला बाहेरून बिनशर्त पाठिंबा देणार्‍या बसपमधील सर्व आमदारांनी काँग्रेसप्रवेश केला आहे.

एके काळी देशाच्या राजकारणामध्ये बहुजन समाज पक्षाच्या सुप्रीमो मायावती यांचे नाव पंतप्रधानपदाच्या दावेदारांमध्ये असायचे. दिल्लीतील राजकारणाचा राष्ट्रीय महामार्ग जाणार्‍या उत्तर प्रदेश या राज्याच्या मुख्यमंत्री राहिलेल्या बहनजी मायावती यांना दलित आणि बहुजन समाजाने तसे पाहता भरभरून प्रेम दिले; पण या जनआशीवार्दाचा वापर करत राजकारणाची शिडी चढण्यात मायावतींना यश आले नाही. मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात स्वतःचे पुतळे उभारून आपल्या आप्तेष्टांचे आणि खुशमस्कर्‍यांचे उखळ पांढरे करण्यात त्यांनी धन्यता मानली. त्यांच्यावर गैरव्यवहाराचे, भ्रष्टाचाराचे आरोप झाले. न्यायप्रक्रियेतील उणिवांचा फायदा घेत अन्य राजकारण्यांप्रमाणे मायावतींनीही यासंदर्भातील प्रकरणे निर्णयाप्रत पोहोचणार कशी नाहीत, याची दक्षता घेतली असली तरी जनतेच्या मनातील विश्वासाला उतरती कळा लागली. परिणामी, जनाधार घटत गेला आणि मायावतींच्या राजकीय सत्तेला हादरेबसू लागले. 2014 च्या आणि यंदाच्या 2019 च्या लोकसभा निवडणुकांनी तर बसपचे आणि मायावतींच्या राजकारणातील अस्तित्वापुढेच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. यावेळच्या लोकसभा निवडणुकांमध्ये बुवा-भतीजा म्हणजेच मायावती आणि समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांनी वर्षानुवर्षाचा संघर्ष बाजूला सारत समेट घडवून आणत आघाडी केली होती. या आघाडीची चर्चा इतकी झाली की, याचा फटका बसून भाजपच्या उत्तर प्रदेशातील जागा घटतील आणि पर्यायाने मोदी सरकार पुन्हा सत्तेतही येणार नाही, असे मत राजकारणातील अभ्यासक, जाणकार म्हणवल्या जाणार्‍यांकडून व्यक्त केले गेले. 2014 पेक्षा बसपची स्थिती सुधारली खरी; पण 80 पैकी 10 जागांच्या पुढे बसपला मजल मारता आली नाही.

लोकसभेला दहा जागा पटकावल्या असल्या तरी काँग्रेससोबत आघाडी न करण्याचा निर्णय घेतल्यामुळे देशभरामध्ये बसपविषयी चुकीचा संदेश गेला. कारण, भाजपचा अश्वमेध रोखण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्रित निवडणूक लढवावी, असा काँग्रेसचा आग्रह होता; पण उत्तर प्रदेशात काँग्रेसचे राजकीय अस्तित्व फारसे नव्हते. अशा वेळी त्यांना सोबत घेऊन जागांचा वाटेकरी वाढवण्यापेक्षा काँग्रेसपासून फारकत घेण्यात मायावतींनी धन्यता मानली; पण सप-बसप स्वतंत्र लढणार असल्यामुळे भाजपविरोधी मतांचे विभाजन होणार असल्याची हाळी काँग्रेस व अन्यांनी निवडणुकांच्या काळातच ठोकली  होती. निकालांनंतरच्या पराभवाच्या विश्लेषणामध्येही काँग्रेसवासीयांनी या मुद्द्याचा पुनरुच्चार केला होता. परिणामी, बसपला भाजपची बी-टीम म्हणून पाहिले जाऊ लागले. 

उत्तर प्रदेशातील मायावतींनी घेतलेल्या भूमिकेचा राग काँग्रेसने अद्यापही मनात ठेवला होता की काय, असा सवाल आता उपस्थित होत आहे. हा प्रश्न विचारला जाण्याचे कारण म्हणजे राजस्थानमधील ताजी घडामोड. राजस्थानात बहुजन समाजवादी पक्षाच्या सर्वच्या सर्व आमदारांनी काँग्रेसमध्ये सामील होणे हा मायावतींसाठी एक खूप मोठा धक्का मानला जात आहे. तसेच मायावतींच्या राजकीय महत्त्वाकांक्षांना काँग्रेसने लावलेला सुरुंग म्हणूनही याकडे पाहिले जात आहे. या घटनेमुळे बसपच्या हत्तीची चाल मंदावल्याची आणि तो सैरभैर झाल्याचे दिसत आहे. या घडामोडीमुळे काँग्रेस आणि बसपतील सौहार्द, सलोखा, मैत्रीभाव  संपुष्टात आला आहे आणि त्याची जागा आता आरोप-प्रत्यारोप व त्वेषाने घेतली आहे. 

राजस्थानात घडलेली ही घटना राष्ट्रीय स्तरावर एका नव्या राजकीय समीकरणालाही जन्म देणारी ठरू शकते. मायावतींच्या विधानांची गांभीर्याने दखल घेतल्यास असे लक्षात येईल की, या घटनेमुळे त्या कमालीच्या आक्रमक झाल्या आहेत. याचे कारण अशा प्रकारची ही दुसरी घटना आहे. आधी मध्य प्रदेश आणि आता राजस्थानात बसपतील आमदार काँग्रेसमध्ये गेल्यामुळे मायावतींना होणारे दुःख समजून घेता येण्याजोगे आहे. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात  घेतली पाहिजे की, राजस्थानात बसपने काँग्रेसला बिनशर्त पाठिंबा दिला होता. असे असतानाही बसपच्या सर्व आमदारांना फोडून आपल्या पक्षात सामील करून घेणे हा काँग्रेसने केलेला विश्वासघात आहे, असे मायावतींचे म्हणणे असल्यास ते गैर म्हणता येणार नाही. मायावतींनी या निर्णयानंतर व्यथित होऊन काँग्रेसने नेहमीच अनुसूचित जाती-जमातीच्या आणि मागासवर्गीयांच्या विरोधातील राजकारण केले आहे असे म्हणत या तिन्ही वर्गांच्या आरक्षणासाठी काँग्रेस कधीही प्रामाणिक नव्हती. 

मायावतींच्या आरोपांचे खंडन करताना राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी बसपचे सहाच्या सहा आमदार हे स्वखुशीने काँग्रेसमध्ये आले असल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे, या आमदारांनी मांडलेला मुद्दा याहून वेगळा आहे. राज्यातील सरकारला आपण बाहेरून पाठिंबा द्यायचा आणि पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात त्यांच्याविरुद्ध लढायचे हे योग्य नाही. त्यातून जनतेमध्ये विश्वासार्हतेचा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. मतदारांकडून यासंदर्भात अनेक प्रश्न विचारले जात आहेत. त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला आहे. अर्थात, बसपचे आमदार काहीही सांगोत; पण आपल्या राजकीय भविष्याच्या काळजीनेच हे आमदार काँग्रेसच्या कंपूत सामील झाले आहेत. अशोक गेहलोत यांची राजकीय चाल यामुळे यशस्वी झाली आहे. येणार्‍या काळात बसप काँग्रेससोबत असणारे आपले राजकीय नाते पूर्णतः संपुष्टात आणण्याच्या विचारात आहे. कारण, काँग्रेसने उत्तर प्रदेशातील विस्तारासाठीही योजना आखली आहे. आगामी निवडणुकांमध्ये मुख्य विरोधी पक्ष म्हणून उतरण्याचा काँग्रेसचा प्लॅन आहे. यासाठी काँग्रेस सप-बसप यांच्या आघाडीत बिघाडा आणण्यासाठीही प्रयत्नशील आहे. त्यामुळे बसप आणि काँग्रेसमधील वितुष्ट येणार्‍या काळात वाढत जाणार आहे. 

बसपचे आमदार काँग्रेसमध्ये गेल्यामुळे राजस्थानातील काँग्रेस सरकारचा नंबर गेम आता भक्कम झाला आहे. कारण, काँग्रेसच्या आमदारांची संख्या 100 वरून 106 वर पोहोचली आहे. ही चाल यशस्वी करून गेहलोतांनी आपली ताकद दाखवून देत पक्षालाही एक प्रकारे इशारा दिला आहे. राजस्थानात आपल्याशिवाय पर्याय नाही, हे त्यांनी सिद्ध केले आहे. बसपमधून काँग्रेसमध्ये सहभागी झालेल्या आमदारांना येणार्‍या काळात मंत्रिमंडळात स्थान दिले जाण्याची शक्यता आहे; पण यामुळे काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत संघर्ष उफाळून येईल की कायस अशी भीतीही वर्तवली जात आहे. येणार्‍या काळात काय होईल हे आत्ताच सांगता येणार नाही; पण तूर्त तरी गेहलोतांनी बाजी मारली आहे, हे निश्चित. येणार्‍या पोटनिवडणुकांमध्ये आणि स्थानिक निवडणुकांमध्ये काँग्रेसला याचा फायदा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण, बसपमधून काँग्रेसवासी झालेल्या सहा विधायकांचा  त्या त्या जातींवर असणारा प्रभाव मोठा आहे. 

सहा आमदारांनी घेतलेल्या या निर्णयामुळे मायावतींच्या राजकीय विश्वासार्हतेविषयीही बोलले जात आहे. आपल्या फायद्यासाठी मायावती कोणत्याही पक्षाशी अथवा व्यक्तीशी समझोता करण्यास मागेपुढे पाहत नाहीत, असा एक समज त्यांच्या समर्थकांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये रूढ होत चालला आहे. मायावती एकाच वेळी दोनच नव्हे, तर अनेक दरडींवर पाय ठेवून चालत असतात. तसेच त्या आपल्या मनानुसार पक्ष चालवत असतात. पक्षातील इतर कोणाही नेत्या-कार्यकर्त्याला त्यांच्या निर्णयाविरोधात जराही बोलण्याची अथवा सूचना करण्याची परवानगी नसते. बसपमधील काही नेते तर त्यांच्याशी बोलायलाही घाबरतात, असे सांगितले जाते. या एककल्ली, संधिसाधू आणि सोईस्करवादी राजकारणामुळेच बसपतील नेते अन्य संधींच्या-पर्यायांच्या शोधात असतात. संधी मिळाली की टुणकन उडी मारून ते निघून जातात. राजस्थानातील सहा आमदारांनीही हेच केले!