Responsive image

काय आहे बांगलादेशचे विकास मॉडेल?

By arun.patil | Publish Date: Sep 13 2019 8:34PM

डॉ. शैलेंद्र देवळाणकर

सध्या भारतात विकास दरातील घसरणीची, आर्थिक मंदीची चर्चा सुरू आहे. पण, त्याच वेळी भारताचा शेजारी असलेला आणि भारताच्या प्रयत्नांमुळेच उदयास आलेला बांगलादेश मात्र आर्थिक विकास दरात पाकिस्तानलाच नव्हे, तर भारताला मागे टाकून पुढे गेला आहे. बांगलादेशचे परकॅपिटा उत्पन्न पाकिस्तानपेक्षाही जास्त म्हणजे 1800 डॉलर एवढे आहे.


बांगलादेश हा भारताच्या शेजारी असलेला एक छोटासा देश. या देशाची भारतासोबत 4000 किलोमीटरची सीमारेषा आहे. 16 कोटी लोकसंख्या असलेल्या या देशाला स्वातंत्र्य मिळून अद्याप 50 वर्षेही पूर्ण झालेली नाहीत. 1971 मध्ये बांगलादेशचा उदय झाला. त्यांचा स्वातंत्र्य संघर्षही अत्यंत रक्तरंजित राहिला. त्याबरोबर प्रचंड गरिबी, बेरोजगारी, तसेच कुपोषणाच्या समस्यांना तोंड द्यावे लागले. लष्करी हुकूमशाहीदेखील लादली गेली. तरीही या देशाने आपली वाटचाल सुरू ठेवली आणि आज आशिया खंडातील सर्वात वेगवान आर्थिक विकास दर असलेला देश म्हणून बांगलादेश नावारूपाला आला आहे. साहजिकच, या देशाचा कायापालट कसा झाला हे समजून घेणे गरजेचे आहे.

आजघडीला बांगलादेशचे परकॅपिटा उत्पन्न 1800 डॉलर एवढे म्हणजेच पाकिस्तानपेक्षाही जास्त आहे. आर्थिक विकासाच्या दराबाबत त्यांनी पाकिस्तानला केव्हाच मागे टाकले आहे. गेल्या चार-पाच महिन्यांचा विचार करता त्यांनी भारतालाही आर्थिक विकासदरात मागे टाकले आहे. त्यामुळे बांगलादेश हा दक्षिण आशियातील देशांसाठी आदर्श बनलेला आहे.

काही वर्षांपूर्वी संयुक्त राष्ट्र संघटनेने जाहीर केलेल्या ‘लिस्ट इकोनॉमिक डेव्हलपड् कंट्री’ म्हणजेच सर्वात कमी आर्थिक विकासदर असणार्‍या देशांच्या यादीमध्ये बांगलादेशाचा समावेश होता. तिथपासून प्रवास करत बांगलादेशाला विकसनशील अर्थव्यवस्था म्हणून घोषित केले आहे. अत्यल्प विकसित देश ते विकसनशील देश हा बांगलादेशचा प्रवास अत्यंत वाखाणण्यासारखा आणि नेत्रदीपक आहे. 

याबाबत आपण काही आकडेवारी पाहू या. आजघडीला बांगलादेशची एकूण निर्यात पाकिस्तानलाही मागे टाकणारी आहे. 2019 मध्ये बांगलादेशची निर्यात 39 अब्ज डॉलर्स एवढी आहे. 2021 पर्यंत ती 50 अब्ज डॉलर्सपर्यंत घेऊन जाण्याचा त्यांचा मानस आहे. आणखी दोन वर्षांनी 2021 मध्ये बांगलादेशच्या स्वातंत्र्याला 50 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे 2021 हे त्यांच्यासाठी महत्त्वाचे वर्ष आहे; परंतु 2009 ते 2019 या दहा वर्षांत या देशांने हा आर्थिक विकास गाठला आहे. या दहा वर्षांत असे काय घडले? वास्तविक, त्यापूर्वीच्या काळात बांगलादेशात खालिदा झिया यांचा शासनकाळ होता. त्या काळात तिथे धार्मिक कट्टरतावाद वाढीला लागला होता. तिथे लष्करी शासन होते. मग शेख हसीना यांनी काय परिवर्तन घडवून आणले हे आपण जाणून घेतले पाहिजे. कारण, त्यातून काही गोष्टींचा धडा भारत घेऊ शकतो. 

2009 मध्ये बांगलादेशच्या पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर शेख हसीना यांनी मूलभूत सुधारणा, संरक्षण सुधारणांवर भर दिला. अर्थव्यवस्थेचा विकासदर वाढवण्यासाठी केवळ परकीय गुंतवणूक आकर्षित करणे, उद्योगधंद्यांना आकर्षित करणे, उद्योगधंद्याना चालना देणे किंवा कररचनेत सुधारणा एवढेच सामील नसते. अर्थव्यवस्थेला खर्‍या अर्थाने उभारी द्यायची असेल, तर काही मूलभूत गोष्टींपासून सुरुवात करावी लागते. त्यातील मुख्य भाग म्हणजे शिक्षण. हे लक्षात घेऊन हसीना यांनी शिक्षणावर भर दिला. तिथल्या तरुणांना पाश्चिमात्य देशांत - खास करून अमेरिकेत जाण्यासाठी, तिथल्या प्रगत विद्यापीठांमधून अर्थशास्त्राचा, व्यवस्थापनाचा, माहिती तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी पाठवले. त्यासाठी खूप मोठे प्रोत्साहन दिले, प्रेरणा दिली. तसेच प्रगत राष्ट्रांमधून शिकून परत आलेल्या तरुणांना त्यांनी व्यवस्थापनात सामील केले. त्यांना सल्लागार म्हणून नेमले. त्यांच्याकडूनच हसीना यांनी पुढील दहा वर्षांच्या योजना बनवून घेतल्या. 

 दुसरी गोष्ट म्हणजे, बांगलादेशच्या एकूण 16 कोटी लोकसंख्येपैकी 50 टक्के लोकसंख्या ही महिलांची आहे. जगभरातील चित्र पाहिले तर इस्लामिक देशांमध्ये महिलांना अनेक प्रकारचे निर्बंध असतात; पण हसीना यांनी महिलांच्या सबलीकरणावर भर दिला. महिलांना परदेशी जाऊन शिकण्याला प्राधान्य दिले. उद्योगांंमध्ये महिलांचा समावेश करण्यासाठी भर दिला. 50 टक्के लोकसंख्या जी केवळ चूल आणि मूल यामध्ये अडकली होती आणि ज्यांनी कडव्या शरीया नियमांना बांधून घातले होते त्या महिलांना हसीना यांनी जोखडातून मुक्त केले. साहजिकच, त्यामुळे महिलांचा एकंदर अर्थव्यवस्थेतील सहभाग वाढला. बांगलादेशात आयुर्मानाचा दर भारत आणि पाकिस्तान यांच्यापेक्षाही जास्त आहे. याचाच अर्थ त्यांनी आरोग्य क्षेत्रातही सुधारणा घडवून आणल्या आहेत. 

भारताप्रमाणेच बांगलादेशातही कृषिप्रधान अर्थव्यवस्था होती. त्याचप्रमाणे बेरोजगारीचा प्रश्न होता, अकुशल कामगारांचा प्रश्न होता. या सर्वांवर मात करण्यासाठी हसीना यांनी एक महत्त्वाची गोष्ट केली. दक्षिण कोरिया आणि दक्षिणपूर्व आशियाई देश यांनी ज्याप्रकारे उत्पादनक्रांतीच्या मदतीने आर्थिक परिवर्तन घडवून आणले आणि बेरोजगारीवर मात केली, तशाच प्रकारे हसीना यांनीही प्रयत्न केले. बांगलादेश हा दक्षिणपूर्व आशियाई देशांशी जोडला गेलेला देश आहे. तसेच तो म्यानमारशी जोडलेला देश आहे. बांगलादेश आसियान संघटनेचा सदस्य देश आहे. दक्षिणपूर्व आशियाई देशांकडून धडा घेत हसीना यांनी उत्पादनक्षेत्राला चालना दिली. त्यासाठी त्यांनी वस्त्रोद्योगाचे क्षेत्र निवडले. आज बांगलादेशात गारमेंट इंडस्ट्री इतक्या मोठ्या प्रमाणावर विकसित झालेली आहे की, तयार कपड्यांच्या क्षेत्रात हा सर्वात मोठा देश आहे. बांगलादेशच्या 16 कोटी लोकसंख्येतील जवळपास साडेचार लाख लोक कापड उद्योगात गुंतलेले आहेत. तेथे 80 टक्के निर्यात ही तयार कपड्यांची होते. कापड उद्योगाकडून नियमित तयार कपडे निर्मितीला चालना कशी देता येईल, त्यासाठी जमीन, वीज, करसवलती, अन्य सुविधा, अत्याधुनिक तंत्रज्ञान कसे आणता येऊ शकेल, यावर हसीना यांनी कमालीचा भर दिला. तसेच कपडे निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजना राबवल्या. त्यातून बांगलादेशच्या तयार कपड्यांची निर्यात इतकी वाढली की, त्यांनी चीनला त्यांनी आव्हान द्यायला सुरुवात केली. आज आशिया खंडात चीननंतर तयार कपड्यांचा सर्वात मोठा उद्योग हा बांगलादेशात आहे. 

केवळ वस्त्रोद्योगच नव्हे, तर एकंदरीतच उत्पादनक्षेत्राला चालना देण्यासाठी विशेष आर्थिक परिक्षेत्रांची निर्मिती केली. बांगलादेशात अशा प्रकारचे 100 आर्थिक परिक्षेत्र आहेत. हा सगळा प्रवास सुरू असताना त्यांनी निर्यात वाढवण्यावर भर दिला. 2009 मध्ये बांगलादेशाची निर्यात 10 अब्ज डॉलर्स होती. ती 2019 मध्ये 39 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली. आता त्यांनी 50 अब्ज डॉलर्सपर्यंत निर्यातीचे उद्दिष्ट ठेवले आहे. 

बांगलादेशाच्या आर्थिक विकासामध्ये सर्वात मोठे योगदान राहिले बाहेरच्या देशांत राहणार्‍या बांगलादेशी नागरिकांचे. आजमितीला जवळपास 25 लाख बांगलादेशी इतर देशांमध्ये राहतात. ते दरवर्षी 18 अब्ज डॉलर्स एवढी मोठी रक्कम ते मायदेशात पाठवतात. त्यांचा फार मोठा आधार बांगलादेशच्या अर्थव्यवस्थेला मिळत आहे. तसेच त्यांच्या माध्यमातून माहिती तंत्रज्ञान, भांडवल, प्रगत तंत्रज्ञान बांगलादेशात येण्यास मदत होते. आता औषधनिर्माण, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातही बांगलादेश प्रगती करत आहे. या सर्वांचा परिणाम म्हणजे आज बांगलादेशाच्या जीडीपीमध्ये उद्योग क्षेत्राचा वाटा 50 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. तेथे सेवा क्षेत्र फारसे विकसित झाले नसले तरीही फारशा अडचणी नाहीत. कारण, उद्योग क्षेत्रामुळे रोजगाराचा प्रश्न सुटला आहे. त्यांची निर्यात वाढली आहे. आर्थिक विकासाचा दरही वाढला आहे. 

2009 नंतर बांगलादेशने ही प्रगती केली आहे. 2009 नंतर शेख हसीना यांनी महत्त्वाचे मोठे उपक्रम सुरू केले. तिथे डिजिटल बांगलादेश असा उपक्रम होता. त्याचप्रमाणे व्यवस्थितरीत्या पाच-पाच वर्षांचे आराखडे तयार करण्यात आले. त्याचा खूप मोठा फायदा बांगलादेशाला झाला. येत्या काळात त्यांच्यापुढे दोन महत्त्वाची आव्हाने आहेत. एक म्हणजे, तिथल्या धार्मिक मूलतत्त्ववाद्यांचे. कारण, या मूलतत्त्ववाद्यांना बांगलादेश हा पुन्हा मागास करायचा आहे. कडवे शरियाचे शासन आणायचे आहे. महिलांना काम करू द्यायचे नाहीये. हसीना यांना या गोष्टीचा सामना करावा लागणार आहे. त्यांचा प्रभाव वाढता कामा नये. कारण, जर दहशतवादी हल्ले झाले, तर बांगलादेशात गुंतवणूकदार येणार नाहीत. त्यामुळे ही काळजी घ्यावी लागेल.