Responsive image

प्रयत्नांचा परमेश्वर

By santosh.kanmuse | Publish Date: Mar 27 2020 7:35PM

पुढारी अग्रलेख

22 मार्च रोजी देशात सर्वत्र चौदा तासांचा जनता कर्फ्यू पाळला गेला, तेव्हा त्याची टवाळी करणारे शहाणे खूप होते; पण अशा संकटकाळात किती समजूतदार असावे, त्याचाही साक्षात्कार अनेक ज्येष्ठ अनुभवी नेत्यांनी घडवलेला आहे. त्यांचे गुणगान होण्याची गरज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी वा सत्ताधारी भाजपचे विरोधक असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार संध्याकाळी पाच वाजता आपल्या कुटुंबासह निवासस्थानाच्या बाहेर आले. ठरावीक अंतर राखून पवार कुटुंबीयांनी टाळ्यांच्या गजरात कर्तव्यदक्ष सरकारी, निमसरकारी सेवकांचे अभिनंदन केले. नुसते आपल्यापुरते कर्तव्य बजावून पवार थांबले नाहीत. त्यांनी आपल्या कृतीचे चित्रण करून ते जनतेपर्यंत पोहोचेल, याचीही काळजी घेतली. त्यामागचा हेतू किती जणांना समजू शकला आहे? इतरांचे सोडून द्या, खुद्द पवारांचे अनुयायी वा समर्थक मानल्या जाणार्‍यांना आपल्या नेत्याच्या अशा वर्तनातला आशय कितपत समजला आहे? त्यात मोदींचे समर्थन नव्हते, तर अशा संकटकाळी प्रत्येक नागरिकाने सर्व मतभेद गुंडाळून एकदिलाने कसे वागावे, याचा वस्तुपाठ होता व आहे. तेच ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनीही केले. देशातल्या विविध पक्षीय नेत्यांनी केले. कारण, जे संकट जगाला भेडसावते आहे, ते वैचारिक नसून मानव वंशाच्या अस्तित्वाची लढाई आहे. अशा लढाईत सेनापतीचे आदेश नि:शंक मनाने पाळण्याला प्राधान्य असते. या क्षणी देशाचा प्रमुख नेता असतो, त्याच्याविषयी शंका घेणे वा मतभेदाचे प्रदर्शन मांडणे म्हणजे आपल्याच गोटात अस्वस्थता निर्माण करून शत्रूच्या प्रयत्नांना हातभार लावणे असते. त्यातले दोष, उणिवा किंवा त्रुटींची चर्चा नंतर होऊ शकते. त्यासाठी ही वेळ नाही. सामान्य जनतेलाही तितके भान असते, म्हणून कितीही प्रतिकूल परिस्थितीत कोट्यवधी लोक आपापल्या घरात वा ज्याला फक्त डोक्यावरचे छप्पर-निवारा म्हणता येईल, अशा जागी जगापासून अलिप्त अवस्थेत स्वयंनिर्बंधाने सरकारला सहकार्य देत आहेत. ज्या तुटपुंज्या व्यवस्था व सुविधा आज उपलब्ध आहेत, त्यावर भागवण्याचे कष्ट प्रत्येक जण आपल्या परीने उचलतो आहे. 130 कोटी लोकसंख्येला बंदिस्त करणे व बडगा उगारून घरात बसवणे जगातल्या कुठल्याही लष्करी वा पोलिस यंत्रणेच्या आवाक्यातली गोष्ट नाही. हे ज्याला विरोधी पक्षात बसूनही समजू शकते, त्याला म्हणूनच नेता म्हणता येईल. कारण, सवाल आपल्याला मिळणार्‍या सुविधा वा सोयींचा नसून, फक्त काही काळ विपरीत परिस्थितीत जगण्याचा आहे. कुठूनही आपला जीव कोरोनापासून वाचवण्याला महत्त्व आहे. ते शक्य झाले तर उद्या त्रुटी, दोष वा चुकांवर पोटभर बोलता येईल.

भांडणे करायला वा राजकीय वैचारिक लढाईसाठी संपूर्ण आयुष्य पडलेले आहे. ते जगलो तर भांडण्यासाठी सवड मिळणार आहे. अशा कामात आपले जीव धोक्यात घालूनही त्या अपुर्‍या सुविधा व यंत्रणा कार्यरत राखू बघणार्‍या कर्मचारी व अधिकार्‍यांना म्हणूनच आपले सहकार्य हवे आहे. सगळे जग बंदिस्त होत असताना आपल्या कुटुंबीय मंडळींना शेजार्‍यांच्या भरवशावर सोडून हे कर्मचारी बाहेर पडलेले आहेत. पुरवठा व अत्यावश्यक सेवा पुरवीत आहेत. त्यांचा बोजा हलका होण्याचा प्रत्येकाने विचार केला तरी मोठे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले जाऊ शकते. त्यांचे कुठे चुकते वा त्या सेवा कुठे अपुर्‍या पडतात, त्यावर बोट ठेवणे शहाणपणाचे नाही. त्यातल्या त्रुटी भरून काढायला आपण कुठले योगदान देऊ शकतो, त्याच्या कल्पना मांडणे अगत्याचे आहे. अनेक दुकानदारांनी समोर येणार्‍या ग्राहकाने एकमेकांत अंतर राखावे, म्हणून पाच-सात फुटांचे अंतर राखून आखलेली वर्तुळे कोणा जाणकार वा वैद्यकविशारदाने सुचवलेला उपाय नाही. कोणी तरी ही कल्पना सुरू केली आणि टीव्हीवर बघताच इतरत्रच्या दुकानदार व्यापार्‍यांनी त्याचे अनुकरण केलेले आहे. सरकारचा त्यात काडीमात्र संबंध नाही. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा योग्य प्रकारे मिळावा म्हणून कोणी फोनद्वारे किंवा अन्य संपर्कातून दुकानात येण्याच्या वेळा ठरवून दिल्या आणि खरेदीला उडणारी झुंबड रोखली गेली आहे. त्याला नागरी कर्तव्य म्हणतात. त्यांनाही सरकारच्या सूचनांची प्रतीक्षा करता आली असती किंवा सुविधा अपुर्‍या म्हणून झोड उठवता आली असती; पण त्यांनी तो मोह टाळून आपल्या परीने उपाय शोधले आणि इतरांनी त्यांचे अनुकरण केलेले आहे. शरद पवार यांच्यापासून अशा सामान्य दुकानदार माणसापर्यंत अनेकांमध्ये दिसणारे हे प्रसंगावधान, कोरोनावरचा खरा जालीम उपाय आहे. कारण, रोगाची लागण रोखणे व त्यासाठी दोन माणसांमधला शारीरिक दुरावा अगत्याचा आहे. आपण ते पर्याय शोधणे, त्याचा अवलंब करणे आणि त्यासाठी इतरांना प्रवृत्त करणे म्हणूनच प्रभावी हत्यार आहे. मोदी वा भारत सरकारमुळे कोरोनाचा भारतात प्रादुर्भाव कमी झालेला नाही. तर अशा राष्ट्रीय भावनेने प्रवृत्त असलेल्या सामान्य कोट्यवधी जनतेच्या जागरूक प्रतिसादामुळे जग भारताकडे अपेक्षेने बघत आहे. कोरोनाही इथे दोन महिने उलटून गेल्यावर हतबल झाला आहे; मात्र तो पूर्णपणे नेस्तनाबूत झालेला नाही. म्हणूनच, आणखी थोड्या संयमाची व सोशिकतेची गरज आहे. तेच प्रभावी औषध आहे, तोच निर्णायक उपचार आहे. शंकासुरांपेक्षा प्रयत्नांचा परमेश्वर आपल्याला त्यामध्ये साथ देऊ शकतो. दीर्घकालीन आयुष्याचे वरदान देऊ शकतो. त्या प्रयत्नांचा परमेश्वर आपल्याच मनात आणि बुद्धीत वसलेला आहे. त्याचीच आराधना केली तर कोरोनावर मात करणे अवघड नाही.var UNIQUE_ARTICLE_ID ='4745'; var SECTION_TAGS = 'अग्रलेख, Lord, hearts, minds, efforts'; var ARTICLE_TITLE = 'प्रयत्नांचा परमेश्वर';