Responsive image

प्रासंगिक : आदर्श घ्या नॉर्डिक देशांचा!

By santosh.kanmuse | Publish Date: Mar 27 2020 7:35PM

- जॉर्ज लेकी (निवृत्त प्राध्यापक, पेनिसिलव्हेनिया)

नॉर्डिक म्हणजे उत्तर युरोपातील देशांनी करोना विषाणूंपासून बचावासाठी ज्या उपाययोजना वेळेवर केल्या, त्यामुळे तेथे या विषाणूंचा प्रकोप फारसा झाला नाही. विशेषतः, नॉर्वेमध्ये अत्यंत जलद हालचाली सरकारने केल्या आणि नागरिकांनीही त्यास झटपट प्रतिसाद दिला.  

करोना विषाणूने बाधित रुग्णांची संख्या वाढू लागल्यावर 12 मार्च रोजी नॉर्वेमधील लोकांनी स्वतःला लॉकडाउन करून घेतले. सरकारने त्वरित आणि प्रभावी पावले उचलली आणि शाळा, विद्यापीठे बंद केली. सांस्कृतिक आणि क्रीडा महोत्सव रद्द करण्यात आले. बार आणि रेस्टॉरंट, जिम, स्वीमिंग पूलसह टॅटू पार्लर आणि हेअर ड्रेसर्स यासारखे खासगी व्यवसायही बंद करण्यात आले. किराणा आणि औषधे वगळता उर्वरित किरकोळ व्यापार्‍यांची दुकानेही बंद करण्यात आली. हे सर्व निर्णय कोविड-19 या आजाराने जेव्हा देशातील पहिला बळी घेतला, त्याच्या पूर्वीच उचलण्यात आली होती. हे निर्णय जाहीर केले, त्याच दिवशी संध्याकाळी पहिल्या रुग्णाचा मृत्यू झाला आणि त्यानंतर 16 मार्चला नॉर्वेमध्ये आणखी दोन लोकांचा मृत्यू झाला. यादरम्यानच्या काळात कार्यालयेही बंद करण्यात आली होती आणि लोक आपापल्या घरातून काम करू शकतील, अशी व्यवस्था करण्यात आली होती. नॉर्वेमधील हजारो उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत आणि अगदी अपरिहार्य कामांसाठीची सेवा वगळता सर्व क्रूझ नौकाही बंद करण्यात आल्या आहेत. अशाच उपाययोजना स्वीडन आणि डेन्मार्कमध्येही योजण्यात आल्या आहेत. अर्थात, या दोन्ही देशांमध्ये विषाणूचा प्रसार नॉर्वेच्या तुलनेत खूपच कमी आहे.

नॉर्वेमधील लोकांनी इतक्या जलदगतीने प्रतिसाद दिल्यामुळेच हे शक्य झाले. या तातडीने प्रतिसाद देण्याच्या वृत्तीला अर्थतज्ज्ञ ‘नॉर्डिक मॉडेल’ म्हणून ओळखतात. हे मॉडेल अमेरिकी मॉडेलपेक्षा खूपच वेगळे आहे. दरम्यान, अमेरिकेच्या फर्स्ट नॅशनल बँक ऑफ ओहामाने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की, अमेरिकेतील 49 टक्के लोकांना उपजीविकेपुरतेच वेतन मिळते. अशा स्थितीत नोकरी गेल्यास काय करायचे? या संदर्भाने ‘सेल्फ क्वारंटाइन’ची संकल्पना प्रत्यक्षात कशी उतरवायची? त्याचप्रमाणे ज्यांच्या हातात काम नाही आणि ज्यांना दोन वेळचे अन्न मिळविण्यासाठीसुद्धा संघर्ष करावा लागतो, अशा व्यक्तींचे काय करणार? अशा व्यक्तींमध्ये कॉलेजमध्ये शिकणारे असंख्य विद्यार्थी असून, त्यांची महाविद्यालये बंद होत आहेत. नॉर्वेत अशी परिस्थिती कल्पनेतसुद्धा येऊ शकत नाही. कारण, तेथे सामाजिक सुरक्षिततेला सर्वाधिक महत्त्व देण्यात आले आहे. सुमारे शंभर वर्षांपूर्वी तेथे गरिबी मोठ्या प्रमाणावर होती; परंतु 1959 च्या सुमारास तेथील गरिबी जवळजवळ संपुष्टात आली होती आणि प्रत्येकाला पायाभूत सुविधा मिळू लागल्या होत्या.

आरोग्यविषयक आणीबाणीच्या परिस्थितीशी दोन हात करण्याची नॉर्वेची तयारी ही त्या देशाने आखून घेतलेल्या प्राधान्यक्रमांतून आलेली आहे. व्यापक दृष्टीने लोकांचे आरोग्य चांगले राखणे हा तेथील सरकारचा प्राधान्यक्रम आहे. 1970 च्या दशकाच्या अखेरीस तेलाचा शोध आणि दोहन सुरू होण्यापूर्वी नॉर्वे हा श्रीमंत देश नव्हता. तथापि, 1940 च्या दशकातच या देशाने आपली एकल स्वास्थ्य प्रणाली सुरू केली होती; परंतु केवळ दंतसेवा या योजनेस जोडण्यास हा देश असमर्थ होता. त्यावेळचा नॉर्वेतील कामगारवर्ग खराब दातांसाठी ओळखला जात असे. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे तसे घडत असे. कारण, दूध महाग होते. त्यानंतर देशाने दुधासाठी अनुदान देण्यास सुरुवात केली. 

आरोग्यासंबंधीच्या योजनांमध्ये प्राथमिक अवस्थेतच केलेल्या गुंतवणुकीचे परिणाम आता या देशात दिसून येत आहेत. आजमितीस नॉर्वेमध्ये अमेरिकेच्या तुलनेत डॉक्टरांचे प्रमाण अधिक आहे आणि त्याचे कारण म्हणजे नॉर्वेमध्ये वैद्यकीय शिक्षण निःशुल्क आहे. तेथील डॉक्टर खासगी विमा कंपन्यांच्या दबावाखाली राहत नाहीत. परिणामी, नॉर्वेची एकल स्वास्थ्य प्रणाली अमेरिकेच्या तुलनेत अधिक सक्षम आणि कमी खर्चाची आहे. त्यामुळेच करोना विषाणूची तपासणी आणि उपचार नॉर्वेत विनामूल्य होत आहे. अमेरिकेचे माजी अध्यक्ष फ्रँकलिन रूझवेल्ट यांनी म्हटले होते की, प्रत्येक व्यक्तीला चार प्रकारचे स्वातंत्र्य मिळायला हवे- बोलण्याचे स्वातंत्र्य, उपासनेचे स्वातंत्र्य, इच्छेचे स्वातंत्र्य आणि भयमुक्त जगण्याचे स्वातंत्र्य. हे सूत्र नॉर्डिक देश आज प्रत्यक्षात उतरविताना दिसत आहेत.var UNIQUE_ARTICLE_ID ='4743'; var SECTION_TAGS = 'pudhari prasangik, ideal, Nordic, countries'; var ARTICLE_TITLE = 'प्रासंगिक : आदर्श घ्या नॉर्डिक देशांचा!';