Responsive image

प्रासंगिक : दुष्काळमुक्‍तीकडे वाटचाल...

By prasad.mali | Publish Date: Jun 26 2019 8:13PM

सी. बी. रानडे 

गेल्या दहा वर्षांत दुष्काळाची दाहकता वाढली आहे. त्यामुळेच ‘जल है तो कल है’ हा विचार भविष्यातील परिस्थितीसाठी अगदी चपखल असाच आहे. तिसरे महायुद्ध पाण्यासाठी होणार यामध्ये तीळमात्र शंका नाही. त्यामुळे भूगर्भातील पाणीसाठा वाचविण्यासाठी आणि वाढविण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे. राज्य सरकारने 151 तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला. त्यानंतर केंद्र सरकारने 4,741 कोटी रुपये मदत जाहीर केली. 

गावकर्‍यांच्या श्रमदानातूनच महाराष्ट्र दुष्काळमुक्‍त होणार आहे, पाणीदार होणार आहे. प्रत्येक गाव एक झाल्यास समस्या सुटतील. जलसंधारणेतूनच महाराष्ट्र दुष्काळमुक्‍त होईल आणि तशी पावले या सरकारच्या काळात उचलली गेली आहेत. सर्वांनाच पाण्याचे महत्त्व पटले आहे. पाणीच शहर आणि खेड्यातले अंतर वाढवत होते. अभिनेता आमीर खान आणि किरण राव यांच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेचेही महाराष्ट्राच्या दुष्काळमुक्‍तीत मोठे स्थान असणार आहे. त्यातूनच गावे स्वतःच्या ताकदीवर दुष्काळमुक्‍तीकडे वाटचाल करत आहेत. 

राज्यात अजूनही पावसाला नीटशी सुरुवात झालेली नाही. त्यामुळे दुष्काळी भागातील पाणी टंचाईत भरच पडली आहे. 

महाराष्ट्राने आतापर्यंत 5 भीषण दुष्काळ पाहिले आहेत. त्यातील 3 अगदी अलीकडचे आहेत. 2012 मध्ये शासनाने टंचाईचा जीआर प्रसिद्ध केला होता. राज्यातील सर्व जिल्ह्यांत जलयोजना आखणे आवश्यक आहे. जलसंजीवनी प्रकल्प हाच त्यावरील एकमेव पर्याय आहे. मान्सून पुढे सरकत असल्याने दुष्काळाची तीव्रता वाढत आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्‍चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र येथील दुष्काळी परिस्थिती गंभीर होती. पाणी, रोजगार, चारा छावण्या या उपाययोजना केल्या केल्या. तथापि, फळबागा वाचविण्यासाठी विशेष उपाययोजना करावी लागेल. जलसंधारणेतून जलक्रांती शक्य आहे. जलयुक्‍त शिवार अभियान युती सरकारने चार वर्षे चालवले आहे. त्याचे यश उत्तम आहे. राज्यात साडेआठ लाख जनावरे आहेत. त्यांच्यासाठी 1,264 ठिकाणी चारा छावण्या सुरू होत्या, तर मनरेगाअंतर्गत 3 लाख 72 हजार मजुरांना काम मिळाले. 12 हजार 116 गावांमध्ये 4,074 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला गेला. दुष्काळाची परिस्थिती भीषण आणि गंभीर असली, तरी शासकीय पातळीवर त्यावरील उपाययोजना चोख होत्या. त्यामुळे दुष्काळ सुसह्य झाला, असे म्हणता येईल. सरकारच्या आणि लोकसहभागाच्या संयुक्‍त प्रयत्नांतून दुष्काळाकडे वाटचाल होत आहे. लवकरात लवकर सर्व सिंचन योजना पूर्ण झाल्यास आणि पाण्याचे समन्यायी वाटप झाल्यास दरवर्षी उद्भवणार्‍या दुष्काळी स्थितीवर बरेच नियंंत्रण येईल. ग्रामीण भागात दुष्काळाची तीव्रता नेहमीच जास्त असते. स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्यातून त्यावर मात करणे शक्य आहे. अनेक गावांनी ते शक्य करून दाखवले आहे. या प्रयत्नांतून दुष्काळमुक्‍तीच्या दिशेने होणारी वाटचाल स्तुत्य असून भविष्यात दुष्काळी परिस्थिती उद्भवू नये म्हणून नेहमी कार्यरत राहावे लागणार आहे.